बालुचारी साडी जशी बंगालची ओळख देते तशीच ओळख टान्ट साडीपण देते. टान्ट साडय़ा मोगल राजवटीत भारतभर खूप लोकप्रिय झाल्या. टान्ट साडय़ा बंगाल प्रांतभर विणल्या जात असल्या तरी भारतात हुगळी, नादिया आणि मुíशदाबाद तर बांगलादेशात ढाका आणि तंगल ही या साडीची मुख्य उत्पादन केंद्रे आहेत. पारंपरिक पद्धतीने विणल्या जाणाऱ्या या साडीचे वैशिष्टय़ म्हणजे ती हलकी आणि रंगीबेरंगी असते. या साडय़ा मुख्यत: सुती धागे वापरून विणल्या जातात. तसेच त्या वजनाला हलक्या आणि काही प्रमाणात पारदर्शक असतात.
बालुचारी साडय़ांप्रमाणेच टान्ट साडय़ांमध्ये कालानुरूप बदल घडून आले आहेत. या बदलामुळे त्या साडय़ांची लोकप्रियता वाढली आहे. याचे कारण आताच्या टान्ट साडय़ांनी वेगवेगळे डिझाइनचे प्रकार स्वीकारले आहेत आणि त्यापकी काही आधुनिक कलेशी नाते सांगणारे आहेत. त्यामुळेच या साडय़ा अजूनही सर्व स्त्रियांना हव्या हव्याशा वाटतात.
टान्ट साडय़ांचे उत्पादन करताना कापसाच्या सुताचा वापर केला जातो. त्यामुळे रेशमी साडय़ांपेक्षा त्यांची किंमत कमी असते. याच कारणाने त्या साडय़ा सर्वाना परवडतात. कापसाच्या घाम शोषून घेण्याच्या अंगभूत गुणधर्मामुळे भारतातल्या दमट आणि गरम हवेत वापरायला त्या सुखकारक ठरतात. अर्थात तलम सुतामुळे या साडीची काळजीही तशीच व्यवस्थित घ्यावी लागते. पहिल्या धुलाईपूर्वी कोमट पाण्यात खडे मीठ घालून त्यामध्ये साडी भिजवून ठेवावी. यामुळे गडद रंग फिके होण्याच्या प्रक्रियेला चांगला अटकाव होतो. धुलाई करतानासुद्धा सौम्य निर्मलकाचा वापर करावा आणि साडी सावलीत वाळत घालावी. या साडय़ा ६ मीटर लांबीच्या असतात. आल्हाददायक रंग ही बंगाली साडीची खासियत टान्ट साडीतही पाहायला मिळते.
बंगाल सरकारच्या मदतीने या साडय़ा विणणाऱ्या विणकरांचे पुनर्वसन झाले. त्यांनी बंगालची ही कला टिकवून ठेवली. पूर्वी हातमागावर विणली जाणारी ही साडी आता यंत्रमागावर विणली जाते. रुंद काठ आणि नक्षीदार पदर ही या साडीची वैशिष्टय़े आहेत. पाना-फुलांची नक्षी आणि कलाकुसर या साडीवर पाहायला मिळते. छपाई करणे, हाताने रंगवणे आणि भरतकाम करणे या मार्गानेही या साडीत नक्षीची विविधता आणतात. पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्रीही टान्ट साडी परिधान करतात, ती धनिमाखली येथे विणलेली असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिलीप हेर्लेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org

 
संस्थानांची बखर

संस्थान पुदुक्कोटा

तामीळनाडूतील तिरुचिरापल्ली पासून ५५ कि.मी. अंतरावर असलेले जिल्ह्याचे ठिकाण पुदुक्कोटाइ हे इ.स. १६८० ते १९४८ या काळात पुदुक्कोटाइ संस्थानाचे प्रमुख ठाणे होते.
‘पुदुक्कोटा’ म्हणजे नवीन किल्ला. मूळचे कालभ्रा या जमातीच्या लोकांची वस्ती असलेल्या पुदुक्कोटा परिसरावर सहाव्या ते चौदाव्या शतकाच्या दरम्यान मुथरैयर, चोळ आणि पांडय़ राजांची सत्ता होती. पुढे अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलीक कपूर याने पांडियनांचा पराभव करून पुदुक्कोटा खिलजीच्या सल्तनतमध्ये सामील केले. पन्नास वष्रे मुस्लीम सुलतानाचा अंमल टिकल्यावर पुदुक्कोटा विजयनगरच्या अमलाखाली आले. विजयनगरच्या अस्तानंतर हे राज्य मदुराईच्या नायकांनी बळकाविले. १६८० मध्ये हे राज्य रामनाडच्या शासकांनी घेऊन रघुनाथ तोंडैमान याला पुदुक्कोटाइचा आपला सुभेदार म्हणून नियुक्त केले. पुढे तोंडैमानला हा प्रदेश इनाम मिळाला. रघुनाथ राया तोंडैमानची कारकीर्द १६८६ ते १७३० अशी झाली. रघुनाथने इनाम मिळालेल्या परगाण्याचे एका छोटय़ा राज्यात रूपांतर करून काही सन्य उभे केले. राज्य विस्तार करताना त्याने तंजावर, मदुराई आणि थिरुकट्टपल्ली या शेजारी राज्यांच्या प्रदेशातील काही भाग घेऊन पुदुक्कोटाइ राज्याला बळकटी आणली.
रघुनाथ नंतर १७३० साली गादीवर आलेल्या विजय राजा याचे आपला शेजारी म्हैसूरचा हैदरअली याच्याशी संबंध चांगले नव्हते. हैदरने पुदुक्कोटाइवर केलेले आक्रमण थोपवून धरण्यात विजय जरी यशस्वी झाला तरी हैदरसारख्या प्रबळ शत्रूचा शेजार असल्याने त्याची कारकीर्द अस्थिर झाली. अखेर विजय रघुनाथ तोंडैमान राजाने १८०० साली कंपनी सरकारबरोबर संरक्षणात्मक करार करून त्यांची तनाती फौज राखली.
१८०० साली एक ब्रिटिशअंकित संस्थान बनलेल्या पुदुक्कोटा राज्याचे क्षेत्रफळ ३००० चौ.कि.मी. आणि १९०१ साली लोकसंख्या ३८ हजार होती.

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tant saree
First published on: 04-12-2015 at 02:16 IST