विरामचिन्हांचे जनक कँडी (२)

मेजर थॉमस कँडी हे जन्माने ब्रिटिश असलेले लष्करी अधिकारी भारतीय भाषापंडित होते.

मेजर थॉमस कँडी हे जन्माने ब्रिटिश असलेले लष्करी अधिकारी भारतीय भाषापंडित होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीत असलेले थॉमस त्यांच्या आयुष्याची शेवटची पंचावन्न वष्रे भारतातच राहिले. संस्कृत, मराठी या भाषांचा, त्यांच्या व्याकरणाचा आणि तत्कालीन प्रचलित बोली मराठीचा सखोल अभ्यास केलेल्या थॉमस कँडी यांनी भावाच्या मदतीने कॅप्टन मोल्सवर्थचे अर्धवट राहिलेले इंग्रजी-मराठी शब्दकोशाचे काम पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी चर्चच्या शाळांमधील क्रमिक पुस्तके मराठीत लिहून ती छापून घेतली. ब्रिटिश सरकारकडे भारतीय भाषांमधील अनुवाद करण्याची पुस्तके किंवा मराठीत नवीन पुस्तकांचे जे काम येई ते सर्व थॉमस कँडींकडे प्रथम पसंतीसाठी येत असे. थॉमस तो सर्व मजकूर नीट तपासून त्याविषयी निष्पक्षपातीपणे अभिप्राय देत असे. हे काम करताना त्यांना लिखाणातील चुका दाखवून त्यातील दुरुस्त्या सुचवाव्या लागत, लेखकांविषयी प्रतिकूल अहवाल, अभिप्रायही द्यावे लागत. तत्कालीन अनेक नामवंत, विद्वान लेखकांच्या लिखाणातूनही थॉमसनी अनेक वेळा चुका दाखविल्यामुळे अनेक वेळा जाहीररीत्या आणि वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल द्वेष आणि निंदा होत असे. अशा लेखकांबद्दल थॉमसचे म्हणणे असे होते की, त्यांचे इंग्रजीचे ज्ञान बरे आहे पण मातृभाषेचे मराठीचे ज्ञान कमी पडते!

थॉमस कँडीने इंडियन पिनल कोड, इंडियन सिव्हिल प्रोसिजर कोड याची मराठीत भाषांतरे केली. भाषांतरकारांना त्यांनी अनेकदा सुधारणा सुचविल्या. १९व्या शतकापर्यंत मराठी लिखाणात विरामचिन्हांशिवाय लेखन होई. थॉमसने ‘विरामचिन्हांची भाषा’ हे पुस्तक लिहून त्यांची कशी आवश्यकता आहे हे दाखवून दिले. १८६०च्या अखेरीस ब्रिटिश सरकारने थॉमस यांची प्रमुख भाषांतरकार या पदावर नेमणूक केली. थॉमसनी मराठी भाषेची सेवा विविध स्तरांवर केली. पुणे संस्कृत कॉलेजचे ते मुख्याधिकारी होते, डेक्कन कॉलेजचे प्राचार्य होते, दक्षिण महाराष्ट्रातील शाळांचे ते अधीक्षकही होते. नोकरीतून निवृत्त झाल्यावरही ते भारतातच राहिले. ब्रिटिश भारत सरकारने थॉमस कँडी यांना ‘कंपॅनियन ऑफ द स्टार ऑफ इंडिया’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. १८७७ साली थॉमस यांचे महाबळेश्वर येथे निधन झाले.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Thomas candy

ताज्या बातम्या