09 July 2020

News Flash

पाचव्या पर्वातील शक्यता..

सध्याचे कुठलेही डिजिटल तंत्रज्ञान हे दोन प्रमुख गोष्टींमध्ये विभागलेले असते.

(संग्रहित छायाचित्र)

हृषिकेश दत्ताराम शेर्लेकर

‘५-जी’ म्हणजे टेलिकॉम विश्वातील मोबाइल तंत्रज्ञानाचे पाचवे पर्व.. ते कोणते बदल घडवून आणणार आहे?

मागील लेखात आपण ‘क्लाऊड’ तंत्रज्ञानाबद्दल थोडक्यात चर्चा केली. सध्याचे कुठलेही डिजिटल तंत्रज्ञान हे दोन प्रमुख गोष्टींमध्ये विभागलेले असते. एक म्हणजे, आपण वापरण्याचे उपकरण- जसे मोबाइल फोन, लॅपटॉप, आयओटी सेन्सर, इत्यादी; आणि दुसरे, क्लाऊडवरील विविध अ‍ॅप्लिकेशन्स- जसे ईमेल, गूगल ड्राइव्ह, ऑनलाइन बँकिंग, इत्यादी. आपल्या हातातील उपकरणात विदा (डेटा) साठवण्याचे प्रमाण जवळजवळ बादच होत चाललेय. उदा. पूर्वी- म्हणजे अगदी दशकभरापूर्वी- आपण फोनवर किंवा संगणकावर गाणी स्टोअर करून ती ऐकायचो. हल्ली ती आपण ‘गाना’, ‘सावन’ यांसारख्या म्युझिक अ‍ॅप्सद्वारा ऑनलाइन ऐकतो. हे सर्व शक्य व्हायला एकंदरीत डिजिटल क्रांती जेवढी कारणीभूत असेल, तेवढाच यशाचा वाटा जातो जगभरातील टेलिकॉम क्रांतीला. तेव्हा आजचा लेख ‘५-जी’, ‘फायबर-नेटवर्क’ या विषयावर.

टेलीकॉम क्षेत्र ‘२-जी’पासून ‘३-जी’पर्यंत वाटचाल करत सध्या येऊन पोहोचलेय ‘५-जी’च्या उंबरठय़ावर आणि दुसरीकडे हाय स्पीड फायबर-नेटवर्क घरोघरी, गावोगावी पोहोचतेय. आपण कितीही नाके मुरडत असलो, तरी आजच्या घडीला भारतातील दूरसंचार किमती (टेलीकॉम व्हॉइस/डेटा पॅक) जगातील सर्वात कमी आहेत.

मोबाइल व इतर विना-केबलजोडणीची उपकरणे ‘वायरलेस नेटवर्क’ वापरून व्हॉइस/डेटाची देवाणघेवाण करतात, तर घरातील लँडलाइन फोन, वायफाय-केबल राऊटर आदी ‘वायरलाइन नेटवर्क’ वापरतात. वायरलेस नेटवर्क्‍स अनेक प्रकारची असून त्यातील प्रमुख म्हणजे- ‘जीएसएम मोबाइल नेटवर्क’! १९९६ च्या आसपास भारतात मोबाइल सेवा सर्वप्रथम सुरू झाली तेव्हा २-जी नेटवर्क प्रचलित होते, त्यापुढे

३-जी, ४-जी आले आणि हल्ली जगभरात ५-जीच्या चाचण्या सुरू आहेत. यातील ‘जी’ म्हणजे ‘जनरेशन’ (पिढी) आणि १-५ आकडे टेलीकॉम वायरलेस तंत्रज्ञानातील एक महत्त्वाचे पर्व सुरू झाल्याचे दर्शवतात. ५-जी म्हणजे टेलीकॉम विश्वातील मोबाइल तंत्रज्ञानाचे पाचवे पर्व. इथे प्रत्येक नवीन पर्व म्हणजे जास्त क्षमता, वेग, व्याप्ती, अद्ययावत तंत्रज्ञान आणि कमी खर्च. तेव्हा जसे ३-जीने २-जीला, ४-जीने ३-जीला हद्दपार केले, तसेच हळूहळू ५-जी करेल. आता प्रत्येक पर्वात काय काय घडले, ते पाहू :

१-जी : टेलीकॉम पर्वातील प्राथमिक पायरी आणि मोबाइल फोनची संकल्पना प्रत्यक्षात उतरली.

२-जी : मोबाइल फोनमध्ये व्हॉइस-कॉलव्यतिरिक्त एसएमएस सुविधाही सुरू झाली.

३-जी : इंटरनेटचा वापर मोबाइलमध्ये आणण्यास कारणीभूत आणि डिजिटल क्रांती जनसामान्यांच्या हाती येण्यास सुरुवात झाली.

४-जी : २००८ मध्ये आलेले अद्ययावत तंत्रज्ञान, ज्यामुळे मोबाइल इंटरनेट वेग- क्षमता- शाश्वती प्रचंड वाढून मोबाइलवर व्हिडीओ कॉन्फरन्स, ऑनलाइन गेमिंग, सिनेमा बघणे शक्य झाले (१०० एमबीपीएस वेग).

५-जी : त्याही पुढील पायरी, ज्याच्या जगभर चाचण्या सुरू आहेत. कायम नेटवर्क चालू राहण्याची शाश्वती, नगण्य विलंब आणि ४-जीच्या मानाने प्रचंड वेग (दहा हजार एमबीपीएस) असे अहवाल येतायेत. तुलनामत्कदृष्टय़ा ४-जी वेग जर एक सिनेमा इंटरनेटवरून डाऊनलोड करायला सहा मिनिटे लावेल, तिथे ५-जी फक्त चार सेकंद! हे सर्व शक्य होतेय ५-जीच्या एक मिलिसेकंदपेक्षा कमी देवाणघेवाण विलंबामुळे.

४-जी आणि ५-जी यांच्यातील प्रमुख फरक म्हणजे- ‘मोबाइल टॉवर विरुद्ध लहान सेल संकल्पना’! ४-जी मोबाइल टॉवर फार दूरवर मोबाइल नेटवर्क पोहोचवू शकतात. परंतु हल्लीच्या वाढत्या मागणीच्या तुलनेत त्यांची क्षमता, वेग कमी पडू लागला आहे. तसेच नवीन मोबाइल टॉवर उभारणे आर्थिकदृष्टय़ा अशक्य आणि प्रचंड वेळखाऊही आहे. त्याउलट, ५-जी तंत्रज्ञानामध्ये मोबाइल टॉवर बाद होऊन लहान लहान सेल (वायफाय राऊटरच्या आकाराचे) उभारले जातात. ४-जी मोबाइल टॉवर काही किलोमीटपर्यंत नेटवर्क पोहोचवू शकतात, तर ५-जी सेल फक्त २५० फुटांपर्यंत. परंतु ४-जी मोबाइल टॉवर हे काही कोटी रुपयांचे आणि पाच-सहा महिन्यांचे प्रकल्प, त्यात त्यांची देखरेख, वीज खर्चही प्रचंड; मात्र छोटे छोटे ५-जी सेल काही हजारांचे, काही तासांत उभे करता येण्याजोगे आणि देखभाल, वीज खर्चही अत्यंत वाजवी. मुख्य म्हणजे, मागणीनुसार नवीन ५-जी सेल उभारण्याची मुभा. थोडक्यात, भांडवली खर्च विरुद्ध परिचालन खर्च.

परंतु ४-जी मोबाइल टॉवर असो की ५-जी सेल; दोघांच्या तळाशी असतात हाय स्पीड फायबर-नेटवर्क! तुमच्या मोबाइलपासून व्हॉइस/डेटा दुसऱ्या मोबाइल वा इंटरनेटवरील संकेतस्थळापर्यंत पोहोचतो. ही प्रक्रिया कशी असते? तर, प्रथम मोबाइलपासून तुमच्या घराजवळील मोबाइल टॉवपर्यंत (आणि भविष्यात ५-जी सेल); तिथून पुढे फायबर-नेटवर्कमधून ज्यांच्याशी तुम्ही बोलताय, त्या मोबाइलधारी व्यक्तीच्या सर्वात जवळील मोबाइल टॉवपर्यंत आणि तिथून पुढे त्याच्या मोबाइलपर्यंत. संशोधन असे सांगते, की जगभरातील मोबाइल नेटवर्क फक्त ११ टक्के ट्रॅफिक देवाणघेवाण करते, इतर ८९ टक्के ट्रॅफिक फायबर नेटवर्कमधून जाते.

मोबाइलच्या ठिकाणी लॅपटॉप वा संगणकाचा विचार केल्यास, त्यांना जोडलेले लॅन केबल किंवा तुमच्या घरातील वायफायमधील केबलदेखील हाय स्पीड फायबर-नेटवर्कद्वारा डेटा देवाणघेवाण करते. म्हणूनच ५-जीचा हाय स्पीड फायबर-नेटवर्कशी घट्ट संबंध आहे, किंबहुना ते एकमेकांस पूरक आहेत. कारण छोटे छोटे ५-जी सेल जागोजागी उभारायचे, म्हणजे त्या-त्या ठिकाणी फायबर-नेटवर्क उपलब्ध हवे; नाही तर ५-जी सेल जोडायचे कोणाशी?

आता पाहू, हाय स्पीड फायबर-नेटवर्क म्हणजे नक्की काय? हाय स्पीड फायबर-नेटवर्कच्या संरचनेची तुलना आपल्या रक्तवाहिन्यांच्या विस्तृत जाळ्यांशी केली गेलीय. पूर्वीच्या काळी तांब्याच्या तारांमधून दूरसंचार व्हायचा. तांब्याच्या तारा गंजणे, पाण्यामुळे शॉर्ट होणे आणि मुख्य म्हणजे ३०० फुटांपर्यंतच त्यांची क्षमता असल्यामुळे सिग्नल कमी होणे, वगैरे आव्हाने होती. फायबरची तार चक्क एक प्रकारचे प्लास्टिक तंतू असून त्यांच्यात प्रकाश लहरींमार्फत देवाणघेवाण होते.

असल्या महाकाय फायबर ऑप्टिक केबलचे जाळे केवळ जगभरात जमिनीवर नसून समुद्राखालीदेखील आहे. त्यांना ‘अंडर-सी केबल’ म्हटले जाते. एका भूखंडातून दुसऱ्या भूखंडापर्यंत दूरसंचार याच मार्गाने पोहोचतो. तिथून असले जाळे जमिनीमार्गे मग शेवटी मोबाइल टॉवपर्यंत जोडले जाते. उदा. टाटा कम्युनिकेशन्स अंडर-सी केबलचा प्रचंड व्यवसाय असलेली जगातील अव्वल कंपनी म्हणून ओळखली जाते. हाय स्पीड फायबर-नेटवर्क आपल्या घरी वा कार्यालयापर्यंत येण्याचे काही पर्याय पुढीलप्रमाणे :

(१) एफटीटीपी (फायबर टु द प्रीमाइसेस) : फायबर ऑप्टिक केबलची जोडणी तुमच्या घर-कार्यालयाबाहेर रस्त्यावर संपून शेवटचे काही फूट जुनी तांब्याची तारजोडणी. स्वस्त, कमी वेळखाऊ, सरकारी प्रकल्पासाठी उपयुक्त.

(२) एफटीटीबी (फायबर टु द बेसमेंट) : फायबर ऑप्टिक केबलची जोडणी तुमच्या घर-कार्यालयाच्या तळामजल्यावर संपून तिथून पुढे काही मीटर जुनी तांब्याची तारजोडणी. स्वस्त, कमी वेळखाऊ  आणि शहरांमध्ये सर्वाधिक वापर.

(३) एफटीटीएच (फायबर टु द होम) : फायबर ऑप्टिक केबलची जोडणी तुमच्या घर-कार्यालयाच्या आत. तुलनेने महाग, वेळखाऊ  आणि हळूहळू प्रसार होतोय. ५-जी आल्यामुळे या पर्यायाचा येत्या काळात कदाचित मार्ग बंद होण्याची शक्यता.

पुढील वाटचाल..

५-जीचा फायदा भारतातील सर्वाना व्हायचा असल्यास सर्वात आधी गावोगावी फायबर ऑप्टिक केबलचे जाळे निर्माण होणे गरजेचे आहे. त्यांच्या शेवटच्या टोकाला २५० फुटांवर ५-जी सेल लावणे तसे सोपे काम. रिलायन्स जिओ, टाटा-स्काय, एअरटेल आणि सरकारी कंपनी रेलटेल आदींनी देशभर फायबर ऑप्टिक केबलचे जाळे उभे करायला सुरुवात केली असून प्रचंड गुंतवणूक केली आहे. त्यामुळे काही वर्षांतच ५-जीचे आमूलाग्र फायदे अनुभवायला मिळतील.

आता शेवटी करिअर व व्यवसाय मार्गदर्शन : फायबर ऑप्टिक, ५-जी सेल कौशल्य असलेले फिल्ड-टेक्निशियन्सना येत्या काळात प्रचंड मागणी असणार आहे. इथे छोटे कंत्राटी व्यवसाय उभारण्यासदेखील वाव आहे. अभियांत्रिकी पदवी घेतलेल्यांना फायबर आणि ३/४/५-जीचे कौशल्य मिळवून टेलीकॉम कंपनीच्या नेटवर्क ऑपरेशन्स सेंटरमध्ये रोजगार संधी मिळू शकतात. थोडक्यात, हे प्रचंड आर्थिक उलाढाल असलेले क्षेत्र असून इथे अनेक नवीन व्यवसाय, रोजगार निर्माण होणार आहेत.

लेखक टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये साहाय्यक उपाध्यक्ष आणि सध्या अ‍ॅनालिटिक्स आणि इनसाइट्सच्या यूएसए सेंटरचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

hrishikesh.sherlekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 12:10 am

Web Title: 5g mobile technology telecom world abn 97
Next Stories
1 ‘क्लाऊड’चे जाळे..
2 विदा, प्रज्ञा आणि कृती
3 विदा-विश्लेषणाचे मासले
Just Now!
X