15 August 2020

News Flash

पडसाद

निर्णय विवेकानेच घ्यायचा म्हटल्यावर किती लोकांची अनुमती आहे, हा मुद्दा गौण ठरतो.

(संग्रहित छायाचित्र)

सार्वजनिक हितापेक्षा स्वार्थच प्रभावी!

‘लोकरंग’मधील (२६ ऑगस्ट) ‘केरळनंतर कोणाचा क्रमांक?’ हा डॉ. माधव गाडगीळ यांचा लेख वाचला. ‘विवेकाने आणि लोकांना जे हवे ते करत हस्तक्षेप करणे, हेच विकासाचे जनआंदोलन ठरेल’ असे डॉ. गाडगीळ म्हणतात. परंतु विवेकाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात लोकांना काही विपरीत ‘हवे’ असेल, तर ‘आणि’ ही स्थिती अंतर्विरोध निर्माण करते. निर्णय विवेकानेच घ्यायचा म्हटल्यावर किती लोकांची अनुमती आहे, हा मुद्दा गौण ठरतो.

पुराबद्दल ते म्हणतात, ‘धरणे पावसाळा निम्म्यावर आला असतानाच तुडुंब भरली. त्यानंतर जोरदार पाऊस आल्यामुळे पाणी एकदम सोडले गेले.’ याचा अर्थ असा वाटतो, की धरणाची क्षमता निश्चित करताना कधीतरी घडू शकणारी संभाव्यता लक्षात घेतली नव्हती. ‘विवेकी विकासा’साठी आवश्यक तेवढय़ा पाण्याचा साठा करण्यासाठी धरणाची प्रत्यक्ष क्षमता बरीच मोठी असावी लागेल. त्यामुळे विवेकी विकासासाठी आवश्यक धरणे कोणती, तेथे आवश्यक साठा किती व त्यांची धारणक्षमता किती आवश्यक आहे, याची चर्चा व्हावी. तसेच ‘एकुणात आपल्या देशात मोठय़ा प्रमाणावर धरणे केवळ ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठीच बांधली जातात असे चित्र आहे’- या म्हणण्यात अतिशयोक्ती नसली तरी या मानसिकतेची चर्चा होणे आवश्यक आहे.

राष्ट्रीयत्वाची भावना भांडवलशाहीत आली. ब्रिटिश आल्यानंतर गावगाडय़ाच्या जागी काही प्रमाणात भांडवलशाहीतील राष्ट्रीयत्वाची अर्थव्यवस्था आणि जाणीव आली; पण अंशत:च. त्यामुळे ‘परकीय सत्तेच्या विरोधात आलेली एकराष्ट्रीय भावना परस्परविरोधी हितसंबंधांना नियंत्रणात ठेवते, पण स्वातंत्र्य मिळताच प्रादेशिक वा इतर गटांचे हितसंबंध पुन्हा बलवत्तर होतात’ असे झाले. (‘तौलनिक परिप्रेक्ष्यात भारतीय नागरी समाजाचे परिशीलन’ – प्रा. विठ्ठल दहिफळे, ‘नवभारत’, मार्च- २०१४)

सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव राष्ट्रीयत्वाच्या जाणिवेशी निगडित असते. इतरांचे काय वाट्टेल ते होऊ  दे; पण ‘मला’ मोक्ष मिळू दे, ‘मला’ चांगले, तत्त्वनिष्ठ म्हणा.. या मध्ययुगीन विचारांवर एकनाथ ‘एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला’ अशी टिप्पणी करतात. ‘देवपूजेपेक्षा गाढवाला पाणी पाजणे महत्त्वाचे’ ही कथा किंवा देवपूजेपेक्षा कौटुंबिक-सामाजिक उत्तरदायित्व महत्त्वाचे हे सांगणारी ‘खुलभर दुधाची कहाणी’ याकडे समाजाने दुर्लक्षच केले.

वाहतूक व्यवस्था, बांधकामे, खाणी, जंगलतोड, औष्णिक विद्युतनिर्मिती आदींच्या आखणीत सार्वजनिक हितापेक्षा वैयक्तिक स्वार्थ प्रभावी ठरतो. यामागे सामाजिक उत्तरदायित्वापेक्षा ‘स्वत:’च्या हिताला प्राधान्य दिले जाणे, जनसामान्य उदासीन आणि निष्क्रिय वा प्रभावहीन राहणे याचा मुख्य वाटा आहे. उदा. अनधिकृत बांधकामांवर राजकीय नेत्यांनी वरदहस्त ठेवला, भूखंडमाफिया आणि विकासक यांनी राजकारणाचा ताबा घेतला तरी जनसामान्य उदासीन आणि निष्क्रिय वा प्रभावहीन राहिले. नियोजन तज्ज्ञांच्या सूचना व इशारे धाब्यावर बसवून विद्यमान सरकारही शहराचा विनाश अधिक प्रभावी करण्याचे मनसुबे आणि ‘विकास (!)’ आराखडे मंजूर करते. या मध्ययुगीन मानसिकतेविरुद्ध उपायांसाठी दीर्घकालीन प्रयत्न आवश्यक आहेत.

– राजीव जोशी, नेरळ

संस्कृती’ हा शब्द मूळचा भारतीय नव्हे!

‘धारणांचे धागे’ या हेमंत राजोपाध्ये यांच्या सदरातील ‘नव्या वळणांकडे जाण्यापूर्वी’ (२६ ऑगस्ट) हा लेख वाचला. त्यातील ‘संस्कृत’ आणि ‘संस्कृती’ या शब्दांबद्दल..

‘संस्कृती’ हा शब्द मूळचा भारतीय नव्हे. संस्कृत वाङ्मयात किंवा शब्दकोशातही हा सापडायचा नाही. आपण हा शब्द मुद्दामहून बनविलेला आहे. दुर्गाबाई भागवतांच्या मते, इतिहासाचार्य राजवाडे यांनी हा शब्द प्रथम वापरला. इंग्रजी ‘कल्चर’ या शब्दाचा अनुवाद त्यांनी ‘संस्कृती’ असा केला. त्यांच्यानंतर रवींद्रनाथ टागोरांनी हा शब्द वापरला. आ. ह. साळुंखे यांच्या मते, ज्या भाषेवर संस्कार होतात ती संस्कृत. वैदिकांनी प्राकृत भाषेतून शब्द घेतले व आपल्या भाषेतील शब्द वगैरेंबरोबर त्यांचे मिश्रण करून आपली संस्कृत वाढवली. संस्कृत भाषेत ‘कृ’ या धातूला ‘सं’ हा उपसर्ग लावला असता ‘संकर’ असे नाम तयार होते. ‘सं’ आणि ‘कृ’ यापासून ‘संकृत’ असे विशेषण बनू शकते. याचा अर्थ संकराने युक्त! वैदिक लोक आपल्या भाषेला ‘संकृत’ असे नाव देऊ  शकले असते. पण ‘संकर’ हा शब्द तिरस्करणीय त्यामुळे त्यांनी व्याकरणाचा नवा नियम करून संकृतचे ‘संस्कृत’ हे नवे विशेषण बनवले. अधिक माहितीसाठी जिज्ञासूनी पुढील संदर्भ   पाहावेत :

(अ) ‘ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी’ – प्रतिभा रानडे,  प्रकरण १, राजहंस प्रकाशन.

(ब) ‘बळीवंश’ – डॉ. आ. ह. साळुंखे, पृष्ठ २४७, लोकायत प्रकाशन, सातारा.

– जया नातू, बेळगाव

मीनाकुमारी, नर्गिस.. आणि एक कामगार

‘ये है मुंबई मेरी जान!’ या कुलवंतसिंग कोहली यांच्या सदरातील अभिनेत्री मीनाकुमारी यांच्यावरील दोन लेख (१९ व २६ ऑगस्ट) वाचले. मीनाकुमारी या सिनेजगताच्या आदरणीय नि आवडत्या अभिनेत्री. हे लेख वाचून आमच्या कंपनीत काम करणारा एक कामगार आठवला. मीनाकुमारी या त्याच्यासाठी देवताच! एकदा मीनाकुमारींचा विषय निघाला तेव्हा तो म्हणाला, ‘‘त्या गेल्यावर त्यांच्या स्मरणार्थ एक इस्पितळ बांधले जावे असे त्यांच्या शोकसभेत ठरले. अभिनेत्री नर्गिस यांनी पैसे जमविण्यात पुढाकार घेतला होता असे ऐकले होते. त्या पाच मिनिटांसाठी कबरीतून बाहेर येणार असतील तर त्यांच्यासाठी मी कायमचा जमिनीत गाडून घ्यायला तयार होतो. मला तेव्हा जेमतेम अडीच रुपये रोजी मिळत होती. युनियनमुळे आयुष्यातील पहिला बोनस मिळाला. मी ते पाकीट उघडूनही पाहिले नाही. एका मध्यस्थामार्फत नर्गिसजींच्या घरी पोहोचलो. त्यांच्या हाती पाकीट सोपवले. त्यांनी विचारले, ‘रक्कम किती आहे?’ मी सर्व हकीकत सांगितली. त्यांनी पाकिटातील फक्त १०० रुपये ठेवून घेतले व उरलेले पैसे मला परत केले. म्हणाल्या, ‘तुझ्या भावनांचा मी आदर करते. पण तू एक सामान्य कामगार. त्या सभेला नि अंत्ययात्रेला चित्रपटसृष्टीतील अनेक धनवान नि मीनाजींनी विश्वासाने ज्यांना आपले मानले असे लोक आले होते. त्यापैकी किती जणांना ते तेथे कशासाठी आले होते हे विचारले असते तर सांगता आले असते की नाही, शंका आहे.’’ असो. कोहली यांच्या लेखामुळे तो कामगार नि त्याचा दिलदारपणा आठवला.

– श्रीधर गांगल, ठाणे

माहिती अधिकार : जाणीवजागृतीची गरज

‘लोकरंग’मधील विवेक वेलणकर यांचा ‘‘माहिती अधिकार’ धोक्यात?’ हा लेख वाचला. वेलणकर यांनी सजग नागरिक  आणि जागल्याच्या भूमिकेतून एक परमकर्तव्य पार पाडले आहे. काळाची गरज लक्षात घेऊन सजग, संवेदनशील, विचारी नागरिकांनी या विषयावर जाणीव जागृती करायला हवी. राजकीय पक्ष कोणताही असला तरी ‘पैशातून सत्ता व सत्तेतून पैसा’ हेच त्यांचे धोरण असते. हे धोरण राबवताना हतबल झालेल्या सामान्य जनतेला जणू गृहीत धरले जाते. मात्र, माहिती अधिकार कायद्याच्या सुयोग्य वापराने या साऱ्यावर अंकुश ठेवून खरी लोकशाही अमलात आणता येईल.

– मधुकर घारपुरे, सिंधुदुर्ग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2018 1:03 am

Web Title: letters from lokrang readers 9
Next Stories
1 माहिती अधिकार कायदा हा लोकशाहीचा पराभवच!
2 जपान्यांपेक्षा ब्रिटिश राजवट बरी!
3 अनुदानाच्या कुबडय़ा टाळा!
Just Now!
X