१९ मार्चच्या  ‘लोकरंग’मधील श्रुतीपेटीविषयीचा प्रिया आचरेकर यांचा ‘सुकन्या स्वगृही!’ हा लेख वाचला. मूळ पं. गंगाधर आचरेकरांची श्रुतीपेटी योगायोगाने तुळशीदासजी बोरकर यांच्याकडे आली आणि त्यांनी ती पेटी पं. मुकुल शिवपुत्र यांना भेट दिली. असं असताना ‘सुकन्या स्वगृही!’ कशी काय आली? पं. गंगाधरपंत आचरेकर यांचा यथायोग्य मान आणि आदर ठेवून यासंदर्भात काही तपशील द्यावासा वाटतो.

या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे पं. गंगाधरपंत आचरेकर यांनी प्रदीर्घ संशोधनानंतर ‘हिंदुस्थानातली पहिली २२ श्रुतींची पेटी’ १९२७ साली सिद्ध केली, पण बरेच प्रयत्न करूनही त्यांना त्या पेटीचे पेटंट मिळू शकले नाही. १९३९ साली आचरेकरांचे निधन झाल्यानंतर काही वर्षांनी त्यांचे चिरंजीव बाळासाहेब आचरेकर यांनी ती पेटी तुळशीदास बोरकर यांना दिली आणि बोरकरांनी तीच श्रुतीपेटी अलीकडे एका मफिलीत (२६ मार्च) पं. मुकुल शिवपुत्र यांना समारंभपूर्वक प्रदान केली.

तत्पूर्वी, १९११ साली- म्हणजे पं. गंगाधरपंत आचरेकरांच्या १९२७ सालच्या पेटीच्या १६ वर्षे आधी २२ श्रुतींच्या पेटीच्या संशोधनाचं लंडनचं पेटंट  कृष्णाजी बल्लाळ देवल यांना मिळाल्याची माहिती गुगलवर मिळते. त्यामुळे प्रिया आचरेकरांनी या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे पं. आचरेकर यांनी तयार केलेली (पण पेटंट न मिळालेली) २२ श्रुतींची पेटी ही ‘हिंदुस्थानातील पहिली श्रुतीपेटी’ आहे असं म्हणता येणार नाही.

१९११ नंतर अलीकडे २००७ साली ठाण्याच्या डॉ. विद्याधर ओक यांनीही अनेक वष्रे संगीतशास्त्रातल्या कंपनसंख्यांचं शास्त्रशुद्ध गणिती संशोधन करून २२ श्रुतींची पेटी तयार करून तिचे पेटंट  (Indian Patent No. २५०१९७) घेतले आहे, असा गुगलवर स्पष्टपणे उल्लेख आहे.

ही दोन पेटंटस् लक्षात घेता जर २२ श्रुतींच्या पेटीच्या श्रेयाचा नामोल्लेख करायचा असेल तर  देवल आणि डॉ. ओक या संशोधकांचाही करायला हवा. शिवाय, १९११ सालची देवलांची पेटी, १९२७ सालची आचरेकरांची पेटी आणि २००७ सालची डॉ. ओक यांची पेटी या तीनही श्रुतीपेटींमध्ये काही फरक आहे का, तसेच हिंदुस्थानातल्या पहिल्या २२ श्रुतींच्या पेटीचे जनक कोण आहेत, यावरही जाणकारांनी प्रकाश टाकावा.

 सुभाष जोशी, ठाणे  

चांगल्या गोष्टी अनुकरणीयच!

२६ मार्चच्या पुरवणीत ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवलकर यांच्यावरील अंबरीश मिश्र यांचा ‘व्रतस्थ आणि वृत्तस्थ’ आणि गिरीश कुबेर यांचा ‘अग्रलेखाबाहेरचे गोविंदराव’ हे दोन्ही लेख गोविंदरावांचे व्यक्तिचरित्र, व्यासंग आणि शैली शब्दबद्ध करणारे आहेत. जुन्या पिढीच्या लोकांवर इंग्रजांचा खूप मोठा प्रभाव जाणवतो. अशांपैकी एक गोविंदराव तळवलकर! यानिमित्ताने इंग्रजांच्या चांगल्या गोष्टींचे सर्वानी अनुकरण करण्यास हरकत नाही.

विवेक जोशी, औरंगाबाद.

बहुपेडी व्यक्तिमत्त्व

गोविंदराव तळवलकरांवरील सर्व लेख वाचले. तळवलकर हे एक बहुपेडी व बहुरंगी व्यक्तिमत्त्व होते, हे त्यातून प्रतीत होते. अंबरीश मिश्र व गिरीश कुबेर यांच्या लेखांतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनोखे दर्शनघडले. अनंतराव भालेराव यांचा तळवलकरांच्या ‘अग्रलेख’  पुस्तकावरील लेख त्यांच्या अग्रलेखांचा साक्षेपी वेध घेणारा होता. कमलाकर नाडकर्णी यांच्या लेखात गोविंदरावांची नाटकांबाबतची भूमिका कळली. मुकुंद तळवलकरांच्या गोविंदरावांवरील लेखातून तळवलकर कुटुंबीयांची ओळख झाली. ही पुरवणी संग्राह्य़ अशीच होती.

नारायण खरे, पुणे</strong>

वाचनीय  काव्यनजराणा

१२ मार्चच्या पुरवणीतील ‘होली है..’ हा काव्यरूपी नजराणा वाचनीय होता. कवी अशोक नायगावकर यांच्या ‘अफवांवर विश्वास ठेवू नका!’ या कवितेत आजच्या राजकीय परिस्थितीची खोचकपणे केलेली मांडणी मार्मिक होती. तसेच ‘अध्यक्ष महोदय’ हे बालाजी सुतार यांचे काव्य म्हणजे मुख्यमंत्री आपल्याशी प्रत्यक्षात संवाद साधत आहेत असाच भास होत होता. होळीनिमित्त हा नजराणा खरोखर आवडला. या अंकातील द. ना. धनागरे यांच्या जीवनकार्याचे विश्लेषण करणारा न्या. नरेंद्र चपळगावकर यांचा ‘उदारमनस्क समाजवेत्ता’ या लेखातून त्यांच्याविषयी माहिती मिळाली. ‘व्रती समाजशास्त्रज्ञ’ या श्रुती तांबे यांच्या लेखामुळे धनागरे सरांच्या निरीक्षणाबाबत ज्ञान झाले. आगामी काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन उभारू इच्छिणाऱ्यांनी त्यांचे लेखन वाचले पाहिजे.

संतोष राऊत, लोणंद, सातारा.

हीच खरी विनम्रता!

‘विनम्रतेशी मराठी माणसाचा संबंध काय?’ हा  मंदार भारदे यांचा लेख वाचला. या लेखात एका अर्थी मराठी माणसाचे गुणगानच केले आहे. मराठी माणूस खोटी प्रतिष्ठा, नाटकीपणा, संस्कृतीशी प्रतारणा यांसारख्या गोष्टींसमोर कधीच मान तुकवत नाही. त्याची भाषा विनम्र नसेल, पण रांगडी असूनही रसाळ आहे. त्यात सह्य़ाद्रीचा कणखरपणा असला तरी कोकणाची नजाकतही आहे. उगाच विनम्र होऊन दुसऱ्याला आपल्या फायद्यासाठी जाळ्यात पकडणारा मराठी माणूस क्वचितच सापडेल.  बालपणापासून त्याला ‘अतिथी देवो भव:’ असं सांगितलं गेल्यामुळे महाराष्ट्राची दारे सर्वासाठी सताड उघडी असतात. यात तो फसला जाऊन त्याच्या हक्काच्या जागेवरून दूर फेकला गेला तरी तो गप्प बसतो. ‘मोडेन पण वाकणार नाही’ हे बाळकडू तो जन्मापासून प्यायला आहे. निष्कपट, निष्कलंक, निराग्रहता व सरलता या गुणांवर तो परिस्थितीशी झगडतो. आणि हीच खरी विनम्रता होय.

– सूर्यकांत भोसले, मुलुंड, मुंबई.