आरोग्य विभागातील अनागोंदीला विराम; औद्योगिक पट्टय़ातील काही उद्योगांमधील कामगारांना प्राधान्याने लसीकरण केल्याचे आरोप

पालघर : गेल्या काही वर्षांपासून पालघर तालुक्यातील दांडी, तारापूर, दहिसर तर्फे मनोर तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी अशा महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रतिनियुक्तीवर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना नवीन अधिकाऱ्यांनी पदभार सांभाळल्यानंतर कार्यमुक्त करणार असल्याने गेल्या काही वर्षांपासून प्रतिनियुक्तीच्या फेऱ्यात अडकलेले पालघर आरोग्य विभाग त्यामधून मुक्त होण्याच्या मार्गावर आहे.

पालघरचे तालुका वैद्यकीय अधिकारीपदी तसेच दांडी, तारापूर व दहिसर तर्फे मनोर या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असणारे डॉक्टर यांची डहाणू तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामधून प्रतिनियुक्तीवर नेमणूक करण्यात आली होती. विशेष म्हणजे यापैकी अनेक अधिकाऱ्यांनी प्रतिनियुक्त होण्यापूर्वी त्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा केली होती. या पार्श्वभूमीमुळे बोईसर- तारापूर या औद्योगिक पट्टय़ातील काही उद्योगांमधील कामगारांना प्राधान्याने लसीकरण केल्याचे आरोप होऊ लागले होते. यामुळे सर्वसामान्य नागरिक लसीपासून वंचित राहात असल्याने तसेच लस घेण्यासाठी पहाटेपासून नागरिक रांगेत उभे राहात असल्याचे दिसून येत होते.

तारापूर व दांडी येथे नव्याने वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक झाली असून सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पालघरच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचा कार्यभाग मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता नव्याने नेमणूक करण्यात आलेले या अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिनियुक्तीवर असलेल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात येईल असे त्यांनी लोकसत्ताला सांगितले.

दरम्यान पालघर जिल्ह्यत दहा- बारा वर्षे अनुभव असलेले वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी इतर ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत असताना मर्जीतल्या काही मंडळींना तालुक्यातील काही महत्त्वपूर्ण पदांवर नियुक्ती करण्यात आल्याचे आरोप खाजगीत होत आहेत. या संदर्भात जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी त्याचे उत्तर देण्याचे टाळले. पालघर तालुक्यात लसीचा होणाऱ्या काळाबाजारामध्ये काही वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे हे आरोप होत असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बोईसर भागातील लसीकरण वादात

  • बोईसरजवळील एका ग्रामपंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांचे लसीकरण नावाखाली २०० लशी देण्यात आल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात ४० कर्मचाऱ्यांचे लसीकरण केल्यानंतर परिसरातील उद्योगातील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
  • तारापूर औद्योगिक वसाहतीमधील पाच मोठय़ा उद्योगांमध्ये तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी यांनी कंपनीच्या आवारात जाऊन लसीकरण केल्याचे देखील आरोप होत आहेत.
  • या सर्व आरोपांचे तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी खंडन केले होते. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना लस घेण्यासाठी १२ ते १४ तास रांगेत उभे राहावे लागत असताना औद्योगिक कामगारांना तुटपुंज्या रकमेच्या मोबदल्यात त्यांच्या कारखान्यात शासकीय पुरवठय़ातील लस मिळत असल्याचे हे आरोप होत आहेत.
  • पालघरमधील लसींच्या काळाबाजाराबाबत चौकशी करण्याची मागणी पालघरच्या नगरसेवकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.