पालघर: नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) ने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या महाराष्ट्र विभागातील डहाणू तालुक्यातील साखरे गावात ४० मीटर लांबीचा बॉक्स गर्डर यशस्वीरित्या बसवला आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच पूर्ण लांबीचा प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट (पीएससी) बॉक्स गर्डर लावण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु असून डहाणू तालुक्यातील साखरे गावात ४० मीटर लांबीचा बॉक्स गर्डर बसविण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. या मार्गाचा महाराष्ट्रातील विभाग १५६ किलोमीटर लांब असून यामध्ये वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (मुंबई) येथे एक भुयारी स्थानक, मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आणि ठाण्याच्या शिळफाटा दरम्यान २१ किलोमीटर लांबीचा बोगदा, शिळफाटा ते झरळी गाव (महाराष्ट्र-गुजरात सीमा) पर्यंत १३५ किलोमीटर उंचावरील मार्गिकेचा व १२४ किलोमीटर लांबीचा व्हायाडक्टचा समावेश आहे.
तसेच १०३ किमी लांबीचा व्हायाडक्टमध्ये २५७५ एफएसएलएम गर्डर्सचा समावेश आहे. १७ किमी लांबीचा भाग सेग्मेंटल गर्डर्सने तयार करण्यात आलेला आहे, राष्ट्रीय महामार्ग, डीएफसीसी, भारतीय रेल्वे आणि उल्हास नदीवर बांधल्या जाणाऱ्या २.३ किलोमीटर लांबीचा स्टील पुल, ठाणे, विरार आणि बोईसर येथील बुलेट ट्रेनच्या तीन स्थानकांमध्ये एकूण १.३ किलोमीटर लांबीच्या भागाचा यामध्ये समावेश आहे. ११ किलोमीटर लांबीच्या भागामध्ये सहा किलोमीटर लांबीचे सात डोंगरी बोगदे व पाच किलोमीटर लांबीच्या विशेष मातीच्या संरचना चा यामध्ये समावेश आहे.
गर्डर विषयी तपशील
प्रत्येक ४० मीटर लांबीचा पीएसकी बॉक्स गर्डर सुमारे ९७० मेट्रिक टन वजनाचा असतो, ज्यामुळे तो भारताच्या बांधकाम क्षेत्रातील सर्वात जड गर्डर ठरतो. हे गर्डर्स कोणतेही बांधकाम सांधे न ठेवता एकसंध स्वरूपात घडवले जातात. प्रत्येक गर्डरसाठी ३९० घनमीटर काँक्रीट आणि ४० मेट्रिक टन स्टील वापरले जाते.
फुल-स्पॅन गर्डर्सना बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी प्राधान्य दिले जाते, कारण ते सेग्मेंटल गर्डर्सपेक्षा सुमारे १० पट जलद गतीने बांधकाम पूर्ण करण्यास मदत करतात.
पूर्ण लांबीचे प्री-कास्ट बॉक्स गर्डर्स विशेष स्वदेशी अवजड यंत्रसामग्रीद्वारे बसवले जात आहेत, ज्यामध्ये स्ट्रॅडल कॅरिअर्स, ब्रिज लॉन्चिंग गॅन्ट्रीज, गर्डर ट्रान्सपोर्टर्स आणि लॉन्चिंग गॅन्ट्रीज यांचा समावेश आहे. अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हे गर्डर्स आधीच तयार करून समर्पित कास्टिंग यार्डमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने साठवले जात आहेत.
शिळफाटा ते गुजरात-महाराष्ट्र सीमेपर्यंतच्या मार्गिकेवर एकूण १३ कास्टिंग यार्ड्स नियोजित करण्यात आले आहेत, त्यापैकी सध्या पाच यार्ड्स कार्यान्वित आहेत.ही सिद्ध तंत्रज्ञान प्रणाली एप्रिल २०२१ पासून बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वापरात आहे आणि गुजरातमध्ये एकूण ३०७ किमी लांबीचा व्हायाडक्ट पूर्ण करण्यात यामुळं मोठा वाटा उचललेला आहे. अलीकडील महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये विरार आणि बोईसर स्थानकांवरील पहिल्या स्लॅबच्या कास्टिंगचा समावेश आहे.