पालघर: पालघर जिल्ह्यात असणाऱ्या विविध धरणातून पावसाळ्यात पाण्याचा निचरा करण्यापूर्वी सर्व संबंधितांना सूचित व्हावे या दृष्टीने जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधणे अनिवार्य करण्यात आले असून विविध पर्यटन स्थळी होणारे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी प्रशासनाने सज्ज व्हावे असे निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपण बचाव कार्यातील सैनिक असल्याप्रमाणे एकत्रितपणे समन्वय साधून सामुदायिक मदतीसाठी उपलब्ध राहावे असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.जिल्ह्यातील मान्सून पूर्व आढावा, पाणी टंचाई व जलजीवन मिशन यासंदर्भात आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याच बरोबरीने जिल्ह्यातील स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ त्यांच्या उपस्थिती आज करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये, आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे पंडित व जिल्ह्यातील अधिकारी वर्ग उपस्थित होते.
मान्सून पूर्वतयारी बाबतची माहिती जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी देताना जुलै महिन्यात अधिकतर प्रमाणात होणारी अतिवृष्टी, पूरप्रवण व दरडप्रवण क्षेत्रातील माहिती देऊन आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासनाच्या सज्जते विषयी माहिती दिली. यापूर्वी विज कोसळून झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ८४ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून पावसाळ्या दरम्यान घनकचरा व्यवस्थापन, नालेसफाई, धोकादायक इमारती मधील रहिवाशांना नोटीस व रिकामी करण्याची कारवाई बाबत माहिती दिली.मान्सूनच्या दृष्टीकोणातून विशेष नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय तसेच आरोग्य विभाग कार्यरत करणार असून विविध रस्त्यांवरील खड्ड्याची डागडुजी व नवे रस्ते बनवण्याचे काम १५ जून पूर्वी पूर्ण व्हावे अशी अपेक्षा पालकमंत्री यांनी व्यक्त केली. आपत्कालीन परिस्थितीत विविध अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात यावे असे सांगत रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी पावसाच्या पाण्याचा निचरा मार्ग खुला ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक मदत करण्याचे सूचित केले.
जिल्ह्यातील नागरिकांना भरती-ओहोट वेळापत्रक उपलब्ध करून देणे तसेच अतिवृष्टी किंवा मुसळधार पावसाच्या प्रसंगी धरण क्षेत्रातून पाणी सोडण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे नदी किनारी, शहरी भागात अथवा जिल्ह्याच्या खोलगट भागात नागरिकांना सतर्क करणे शक्य होईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.अतिवृष्टी किंवा वादळी परिस्थितीमुळे नागरिकांच्या घराचे नुकसान झाल्यास तातडीने पंचनामे करून मदत कार्य पोहोचवण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी असे पालकमंत्री यांनी सांगून महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी असेही सुचित केले.
शाळांमधील छप्पर गळणार नाही या दृटीने दुरुस्ती करून घेण्यासोबत शाळांच्या परिसरात दलदल राहणार नाही, साप-विंचू येणार नाही या दृष्टीने सभोवताली स्वच्छता राखणे, आवश्यक फवारणी करून विद्यार्थ्यांची सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्याचे सूचित केले. विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे, शाळेच्या परिसरातील विद्युत जोडणी तपासून घ्यावी तसेच आश्रम शाळेतील राहणीमानाची पाहणी अधिकारी वर्गाने करून घ्यावी असेही शिक्षण विभाग तसेच आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी यांना सुचित केले.
जलजीवन मिशनचा आढावा
जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असणाऱ्या कामाबाबत अनेक तक्रारी पुढे आल्याचे सांगत झालेल्या कामाचा दर्जा राखला गेल्या नसल्याचे तसेच अनेक ठिकाणी योजनेच्या आरंभीच गळती होत असल्याचे किंवा पाण्याचे स्त्रोत उन्हाळ्यात कोरडे पडत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. संबंधित ठेकेदाराने झालेल्या चुका दुरुस्त करण्याची संधी देण्यात यावी असे पालकमंत्री यांनी अधिकारी वर्गाला सांगितले. गटविकास अधिकारी यांनी या योजनांची प्रत्यक्षात पाहणी करून आढावा घ्यावा असे सांगत दोषी असणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असेही पालकमंत्री यांनी सांगितले. झालेल्या कामाचा दर्जा सुमार असल्यास ते शासकीय अधिकाऱ्यांनी स्वीकारू नये असेही गणेश नाईक यांनी सांगितले. तसेच पाणीपुरवठा योजना सुरु झाल्या त्या ठिकाणी नागरिकांनी पाणी गाळून व उकळून घावे असे सूचित केले.
आरोग्य अधिकाऱ्याने मुख्यालयी राहावे
मान्सूनच्या अनुषंगाने सर्व आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक साठा उपलब्ध करावा याबाबत दक्षता घेण्यासोबत आरोग्य अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे जिल्हा प्रशासनाने सुचित केले आहे. जिल्ह्यात १०८ प्रणालीच्या रुग्णवाहिकांसोबत १०२ प्रणालीच्या रुग्णवाहिका उपलब्ध असाव्यात या दृष्टीने देखील आढावा घेण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीत औषध उपचार व इतर मदत पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर करावा असेही सांगण्यात आले.
पर्यटन स्थळी दक्षता
पावसाळ्यात धबधबे किंवा अन्य ठिकाणी जाऊन बुडण्याचे किंवा अपघात होण्याचे प्रकार टाळण्यासाठी पर्यटकांसाठी सुरक्षिततेबाबत सूचना देणारे फलक प्रसिद्ध करण्यात यावे. त्याच बरोबरीने पर्यटन स्थळी पोलिसांसोबत वन विभागाने विशेष सुरक्षा रक्षक सैन्यात ठेवावेत असे वनमंत्री यांनी सूचित केले. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या जाळ्या व उपाययोजना राबवण्यासाठी त्यांनी निधीला मान्यता दिली.