वाडा : वाडा येथे २० जुलै रोजी रात्री एका तरुणावर मिरची पूड टाकून धारदार शस्त्राने हल्ला करत मोबाईल फोन आणि स्कुटी जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या तिन्ही आरोपींना वाडा पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने घडवून आणली असून, यासाठी पीडित तरुणाच्या सख्ख्या काकीनेच १ लाख रुपयांची सुपारी दिली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या मुख्य सूत्रधार महिला फरार असून पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत.
२० जुलै २०२५ रोजी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास ऋषिकेश नितीन मनोरे (२७, रा. वाडा) हे त्यांचे दुकान बंद करून घरी जात असताना गणेश मैदान येथील जैन मंदिराजवळ तीन अनोळखी इसमांनी त्यांना थांबवले. मोबाईलवर कॉल करण्याच्या बहाण्याने एकाने त्यांचा मोबाईल घेतला तर दुसऱ्याने ऋषिकेशच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. उर्वरित दोघांनी धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर, हातावर आणि पायावर गंभीर दुखापती केल्या. यात ऋषिकेश स्कुटीसह खाली पडले असता तिन्ही आरोपींनी त्यांची स्कुटी आणि मोबाईल फोन चोरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या ऋषिकेश यांना वाडा सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी ठाणे येथे हलवण्यात आले. त्यांच्या जबाबावरून वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे, सपोनि भगवंत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सागर मालकर, यांच्यासह सहा.पोउपनिरीक्षक गुरुनाथ गोतारणे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर रक्त आणि मिरची पावडरचे पाकीट सापडल्याने फॉरेन्सिक तज्ञ आणि अंगुली मुद्रा तज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांनी आवश्यक नमुने गोळा केले.
सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण महत्त्वाचे ठरले. साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी वाणी आळीकडे पळून गेल्याचे निष्पन्न झाले. वाडा शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका स्कुटीवरून तीन संशयित व्यक्ती जाताना दिसले. जखमीच्या मोबाईलचे लोकेशनही वाडा शहरातच दिसत होते. चोरलेली स्कुटी वाडा अशोक वन येथे एका इमारतीखाली सापडली. आरोपींनी भिंतीवरून उडी मारून पळ काढल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले.
गुन्ह्याचा कोणताही पुरावा मागे ठेवलेला नसतानाही, पोलिसांनी अथक परिश्रमाने आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला. आरोपी १८, १९ आणि २० जुलै रोजी वाड्यात फिरत असल्याचे एस.टी. स्टँड आणि भाजी मार्केट येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. १९ जुलै रोजी ते ऋषिकेशवर हल्ला करण्याच्या तयारीत होते, परंतु त्यांचे वडील सोबत असल्याने त्यांना संधी मिळाली नाही. रोहिदास नगर येथील इंद्रप्रस्थ बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत तेथे मद्यपान करत असल्याचे दिसले आणि ते नांदगाव, नाशिक येथील असल्याची माहिती मिळाली.
नाशिक येथे पथक पाठवून तपास केला असता, पोलिसांनी सुशांत सोमनाथ चिडे, तुषार संजय मनवर आणि यश अजय करंजे यांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
सुपारी देणारी सख्खी काकी फरार
आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार राधिका मनीष मनोरे उर्फ राधिका अविनाश जाधव ( रा. वाडा) या महिलेने त्यांना १ लाख रुपयांची सुपारी दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे, ही महिला ऋषिकेशची सख्खी काकी असून त्यांच्यात कौटुंबिक अंतर्गत कारणांवरून वाद होता. ही महिला ठाणे येथे वारंवार राहण्याचा पत्ता आणि मोबाईल नंबर बदलत असल्याने तिचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हान बनले आहे. ताब्यात घेतलेले आरोपी नाशिक येथील सराईत गुन्हेगार असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे हे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
हि कामगिरी पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालीपोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे, सपोनि भगवंत चौधरी, पोलिस उपनिरीक्षक सागर मालकर, पोउनि राजकुमार मुंढे, सफौ. दयानंद पाटील, सफौ. गुरुनाथ गोतारणे, पो.शि.गजानन जाधव, पोशि. संतोष वाकचौरे, पोशि.संजिव सुरवसे, मपोशि वाघमारे यांनी ही यशस्वी कामगिरी केली आहे.