पालघर : दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह होत असलेल्या अवकाळी पावसाने सर्वांचीच तारांबळ उडवली आहे. यामध्ये शेतकरी, पावली (पेंढा) व्यापारी, विट उत्पादक यांचे अतोनात नुकसान झालेच पण विजेवर चालणारी उपकरणे दोन दिवसांपासून खंडित झालेल्या विजेमुळे बंद पडल्याने काही कामे ठप्प पडली आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाडा आगारातील विद्युत पुरवठा रविवारपासून २० तास खंडित झाला होता. सोमवारी (२७ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजेपर्यंत येथील इन्व्हर्टरचा बॅकअप होता, तोपर्यंत गाड्यांमध्ये डिझेल टाकणे, प्रवाशी तिकीट मशीन चार्जिंग करणे ही कामे झाली होती. मात्र त्यानंतर गाड्यांमध्ये डिझेल टाकणे, तिकीट मशीन चार्जिंग करणे ही कामे खोळंबल्याने येथील गड्यांचे वेळापत्रक बिघडले. उपलब्ध असलेल्या इंधनात व तिकीट मशीनच्या आधारे बस सेवा सुरू राहिल्याने बस सेवेवर परिणाम झाला. दुपारी साडेतीन वाजता विद्युतपुरवठा सुरळीत झाल्यानंतर गाड्यांचे वेळापत्रक पुर्ववत सुरू झाले.

हेही वाचा – वादळी वाऱ्याने प्रवाशांचे मेगा हाल; झाडे कोसळल्याने अनेक रस्त्यावरील वाहतूक काही तास ठप्प

गावोगावच्या नळपाणी योजना बंद…

वादळीवाऱ्यासह पाऊस झाल्याने जंगलपट्टी भागातून गेलेल्या विद्युत लाइनवर झाडे पडली आहेत. ही झाडे काढण्याचे काम सुरू आहे. मात्र वाडा तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा शनिवारी (२५ नोव्हेंबर) रात्रीपासून खंडित झाल्याने सोमवारी सायंकाळपर्यंत सुरु झालेला नाही. यामुळे या भागातील पीक, मानिवली, गारगांव, पिंजाळ अशा अनेक गावांमधील नळपाणी पुरवठा योजना विद्युत पुरवठा अभावी बंद पडल्या आहेत.

हेही वाचा – वाढवण बंदर उभारणीसाठी लावलेल्या फलकांवरून ग्रामस्थांमध्ये नाराजी; रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरातील फलक हटवण्याची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाडा बस आगारात पुरवठा करण्यात आलेला विद्युत पुरवठा हा परळी या ग्रामीण फिडरचा असल्याने आगारात नेहेमीच विद्युत पुरवठा खंडित होतो. – समीर केंबुलकर – आगार व्यवस्थापक, वाडा बस आगार.