विकास आघाडीची शिवसेना-राष्ट्रवादी लढत; भाजप स्वबळावर

रमेश पाटील

वाडा :  विक्रमगड नगरपंचायत निवडणुकीत विक्रमगड विकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी-शिवसेना आघाडी अशी लढत होणार आहे. भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. जिजाऊ प्रणीत व श्रमजीवी संघटना यांच्या विक्रमगड विकास आघाडीने निवडणुकीपूर्वीच तीन उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यात यश मिळविले. त्यामुळे १४ जागांकरिता ४८ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

१७ प्रभागातील एकूण मतदारांची संख्या ५५१९ इतकी आहे.    सर्वांत अधिक मतदार संख्या (४९१)प्रभाग क्रमांक पाचमध्ये असुन या ठिकाणी पाच उमेदवारांमध्ये लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांची या निवडणुकीत आघाडी झालेली असली तरी या प्रभागात या दोन्ही पक्षांचे उमेदवार  एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.फक्त २३७ मतदार संख्या असलेल्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये भाजप, शिवसेना व विक्रमगड विकास आघाडी यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे.  विकास आघाडीकडून उमेदवारी नाकारल्याने  भाजपमध्ये प्रवेश केलेल्या विद्यमान नगराध्यक्षा प्रतिभा पडवळे ह्या प्रभाग क्रमांक ८ मधून  निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांची लढत विकास आघाडीच्या भारती बांडे यांच्याविरुद्ध  आहे. याच प्रभागात राष्ट्रवादी व शिवसेना या दोन्ही पक्षांचे उमेदवार उभे आहेत.

 सर्वाधिक प्रतिष्ठेच्या असलेल्या प्रभाग क्रमांक चार मध्ये  विकास आघाडीचे विद्यमान उपनगराध्यक्ष निलेश पडवळे व भाजपचे माजी सरपंच डॉ. सुधाकर पाटील यांच्यात लढत  आहे. या प्रभागात शिवसेनेचे प्रकाश वरठा व अपक्ष उमेदवार देवेंद्र गवळी निवडणूक रिंगणात आहेत.

सन २०१६ च्या निवडणुकीतील बलाबल

विक्रमगड विकास आघाडी – ७

श्रमजीवी संघटना – ६

भारतीय जनता पक्ष – २

शिवसेना – १

राष्ट्रवादी काँग्रेस – १

राष्ट्रवादी – शिवसेना आघाडीत बिघाडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 नगरपंचायत निवडणुकीत  राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी आघाडी केलेली असली तरी प्रभाग क्रमांक ५, ८, व १६ या तीन प्रभागात या दोन्ही पक्षांचे उमेदवार एकमेका विरोधात उभे ठाकले आहेत. या तिन्ही ठिकाणी आमची मैत्रीपूर्ण लढत होत असल्याचा खुलासा या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी करीत आहेत.  काँग्रेसने फक्त तीन प्रभागात तीन उमेदवार उभे केले आहेत. तर मनसेने दोन प्रभागात दोन उमेदवार उभे केले आहेत.