लोकसत्ता वार्ताहर
बोईसर : हनुमान जयंती उत्सवानिमित बोईसर शहरात शनिवारी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक मार्गात बदल करत पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
बोईसर शहरात शनिवारी साजऱ्या होणारया हनुमान जयंती उत्सवानिमित हिंदुत्ववादी संघटनामार्फत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहेत. या मिरवणुकीत देवी-देवता व महापुरुष यांच्यावरील विविध चित्ररथ, ढोल पथक, लेझीम पथक आणि हजारो नागरिक सहभागी होणार असून मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेत प्रशासनाने मिरवणूक मार्गावरील वाहतूक मार्गात बदल केले आहेत.
शनिवारी संध्याकाळी चार वाजेपासून मध्यरात्री बारा वाजेपर्यंत मिरवणूक सुरू राहणार असून यादरम्यान वाहतूक मार्गात बदल केले आहेत. नवापूर रस्त्यावरील टीमा सभागृहापासून मिरवणुकीला प्रारंभ होऊन मधुर नाका, यशवंतसृष्टी मार्गे नवापूर नाका, स्टेशन रोड मार्गे सर्कस मैदान येथे मध्यरात्री बारा वाजता मिरवणुकीची सांगता होणार आहे. एमआयडीसीच्या वतीने सध्या टाकी नाका ते मधुर नाका या रस्त्याचे कॉंक्रीटीकरणाचे काम सुरु असून दोन्ही मार्गीकांरील वाहतूक एकेरी मार्गीकेवरून सुरु आहे. मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेऊन शनिवारी चार वाजेपासून मध्यरात्री बारा वाजेपर्यंत टाकी नाका- मधुर नाका ते बोईसर हा मार्ग वाहतुकीकरता बंद करण्यात येणार आहे.
या रस्त्यावरून होणारी वाहतूक मुकुट नाका ते एमआयडीसी रोड-तुंगा रुग्णालय- टाकी नाका ते चित्रालय -तारापूर रोड व मुकुट नाका ते एमआयडीसी रोड- गोगटे नाका- शिवाजी नगर- सालवड-नवापूर या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याची वाहतूक नियंत्रण अधिसूचना जिल्हा प्रशासनामार्फत जारी करण्यात आली आहे. या अधिसुचनेतून जीवनावश्यक वस्तू, पोलीस, अग्नीशमन दल, रुग्णवाहिका, भाविक, एस.टी. बस आणि अत्यावश्यक सेवेतील सर्व वाहनांना वगळण्यात आले आहे. हनुमान जयंतीची मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी बोईसर पोलीस ठाण्याचे प्रमुख अधिकारी व १०० कर्मचारी, राज्य राखीव दलाची एक तुकडी, अतीशीघ्र दलाची एक तुकडी व जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचारी असा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
एकाच वेळेस सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
तारापूर एमआयडीसीला जोडणारे बोईसर-नवापूर, बोईसर-कुंभवली या मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण, मधुर चौक ते मुकुट नाका रस्त्याचे चौपदरीकरण व दुभाजक सोबतच भूमिगत गटारे, कामगारांना चालण्यासाठी पदपथ निर्मिती इत्यादी कामे एकाच वेळेस सुरु आहेत. पावसाळयापूर्वी मुख्य रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे एमआयडीसीचे नियोजन असल्याने औद्योगिक परिसरातील जागोजागी रस्ते खोदण्यात आले असून या रस्त्यावरून होणारी वाहतूक पर्यायी किंवा एकेरी रस्त्यावरून सुरु आहे.
एकाच वेळेस सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे मुख्य रस्त्यांवर सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेस प्रचंड वाहतूक कोंडी होऊन त्याचा वाहन चालक व नागरीकाना त्रास सहन करावा लागत आहे. कंत्राटदाराने रस्त्यांच्या दोन्ही बाजूकडील गटारांची कामे सुरु केली आहेत. सोबतच बोईसर नवापूर रस्त्यावरील टाकी नाका ते अवधनगर पर्यंत बोईसरकडे येणाऱ्या एका वाहिनीचे कॉंक्रीटीकरणाचे काम पूर्ण करून धोडीपूजा पर्यंतचे काम सुरु केले आहे. बोईसर मार्गिकेवरील कॉंक्रीटीकरणाचे काम सुरु असल्यामुळे नवापूर मार्गिकेवर दोन्ही बाजूंना ये-जा करणारी वाहतूक वळविण्यात आली आहे.
सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेस कामगारांची मोठी गर्दी होत असल्याने अवधनगर भागात वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. रस्त्यांच्या सुरु असलेल्या कामांमुळे वाहतुकीचे नियोजन करताना वाहतूक शाखेला तारेवरची कसरत करावी लागत असून व वाहतूक सुरळीत सुरु राहावी यासाठी जिल्हा वाहतूक शाखेने रस्त्याची कामे टप्प्याटप्प्याने करण्याचे निर्देश एमआयडीसीला दिले असल्याची माहिती उपअभियंता अविनाश संखे यांनी दिली. वाहतुकीचे योग्य नियोजन करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविल्यास सध्या सुरू असलेली कामे जलद गतीने पूर्ण करण्याची तयारी एमआयडीसी ने दर्शवली आहे.