बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून बाहेर निघणारा रासायनिक घनकचरा परिसरातील निर्जन जागी बेकायदेशीरपणे विल्हेवाट लावण्याचे प्रकार सुरूच आहेत. उच्चेळी येथील नैसर्गिक तलावाजवळ टाकण्यात आलेल्या रासायनिक घनकचऱ्यामुळे तलावातील मासे मृत होण्याचा प्रकार उघड झाला असून तलावातील पाणी वापरास अयोग्य बनले आहे. याबाबत उच्चेळी ग्रामपंचायतीने रासायनिक घनकचरा उघड्यावर टाकून प्रदूषण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून बाहेर निघणारा रासायनिक घनकचरा आणि औद्योगिक सांडपाण्याची परिसरातील निर्जन ठिकाणी बेकायदेशीरपणे विल्हेवाट लावण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. दोन महिन्यांपूर्वी पंचाळी ग्रामपंचायत हद्दीत स्मशानभूमी जवळ रासायनिक घनकचरा जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी तीन व्यक्तींवर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक सांडपाण्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या टँकर्सवर पोलिसांनी कारवाई केली. मात्र या कारवाईनंतर देखील रासायनिक घनकचऱ्याची बेकायदा विल्हेवाट लावण्याचे प्रकार सुरूच आहेत.

औद्योगिक क्षेत्रजवळील उच्चेळी येथील निर्जन परिसरात असलेल्या नैसर्गिक तलावाजवळ आठवडाभरापूर्वी रात्रीच्या अंधारात अज्ञात वाहनातून रासायनिक घनकचरा भरलेल्या गोण्या बेकायदेशीरपणे टाकण्यात आल्या. पावसामुळे या गोण्यांमधील रासायनिक घनकचरा तलावाच्या पाण्यात मिसळून शेकडो मासे मृत झाले. त्याचप्रमाणे तलावाच्या काठावरील हिरवे गवत देखील जळून गेले. उच्चेळी येथील तलावातील पाण्याचा परिसरातील शेतकरी उन्हाळ्यात वापर करीत असून पाळीव जनावरांना धुण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी या तलावाचा उपयोग होतो.

स्थानिक ग्रामस्थांना तलावाजवळ रासायनिक घनकचरा भरलेल्या गोण्या टाकण्यात आल्याची माहिती मिळताच त्यांनी पालघरचे जिल्हाधिकारी व तारापूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात लेखी तक्रार करीत तलावाजवळ रासायनिक घनकचरा टाकून प्रदूषणास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तारापूर औद्योगिक परिसरातील गावांच्या हद्दीत रासायनिक घनकचरा व औद्योगिक सांडपाण्याची बेकायदा विल्हेवाट लावण्याचे प्रकार वाढीस लागल्याने शेती, बागायती, पिण्याचे पाण्याचे स्त्रोत, नाले, तलाव, खाडी आणि समुद्र प्रदूषित होऊन पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप :

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून होणारे प्रदूषण, रासायनिक घनकचरा आणि औद्योगिक सांडपाण्याची बेकायदा विल्हेवाट इत्यादी गैरप्रकार रोखण्यात तारापूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागाला अपयश येत असल्याची परिसरातील नागरिकांची भावना आहे. उच्चेळी येथील तलावाजवळ टाकण्यात आलेल्या रासायनिक घनकचरा बाबत तक्रार केल्यानंतर तातडीने पाहणी करणे आवश्यक असताना दोन दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर देखील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देण्यास वेळ मिळाला नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

उच्चेळी येथील तलावाजवळ आठवडाभरापूर्वी रासायनिक घनकचरा फेकण्यात आला असून दोन दिवसांपूर्वी हा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी कारवाईसाठी जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात लिखित तक्रार देण्यात आली आहे.जितेंद्र खटाळे सरपंच, उच्चेळी ग्रामपंचायत

उच्चेळी येथील तलावाजवळ गोण्यांमध्ये भरलेला रासायनिक घनकचरा टाकण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. याप्रकरणी क्षेत्र अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देऊन घनकचऱ्याचे नमुने ताब्यात घेण्यास सांगितले असून पुढील आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. वीरेंद्र सिंह उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर-2