बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा!

नॅशनल हाय-स्पीड रेल कॉपरेरेशन लिमिटेडचा (एनएचएसआरसीएल) हा प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून भूसंपादनातील अडचणींमुळे महाराष्ट्रात पुढे सरकू शकलेला नाही.

जिल्ह्य़ातील ६० ग्रामपंचायतींची भूसंपादन ठरावाला मान्यता

पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाकरिता पालघर जिल्ह्यतून संपादित कराव्या लागणाऱ्या जमिनींपैकी ८५ टक्के जमीन ताब्यात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यतील ११ गावांच्या ग्रामपंचायतींनी नुकताच ठराव करून भूसंपादनाला मान्यता दिली आहे. त्यामुळे जवळपास ६० ग्रामपंचायतींच्या हद्दीतील भूसंपादन शक्य होणार असून आता या प्रकल्पाला विरोध करणारी ११ गावे उरली आहेत.

नॅशनल हाय-स्पीड रेल कॉपरेरेशन लिमिटेडचा (एनएचएसआरसीएल) हा प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून भूसंपादनातील अडचणींमुळे महाराष्ट्रात पुढे सरकू शकलेला नाही. जिल्ह्य़ाच्या वसई, पालघर, डहाणू व तलासरी या चार तालुक्यांतून बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे. यासाठी एकूण ७१ गावांची जमीन संपादित होणार आहे. यापैकी आतापर्यंत ५७ गावांमध्ये खासगी जमिनीची भूसंपादन प्रक्रिया पार पडली असून तीन गावांमध्ये शासकीय जमिनी असल्याने त्यांचीही भूसंपादन प्रक्रिया आधीच पार पडली आहे. या प्रकल्पासाठी जिल्ह्य़ातील चारही तालुके मिळून १८७.११ हेक्टर खासगी जागा संपादित होणार आहे. यापैकी थेट वाटाघाटीने आतापर्यंत २६.३३ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे.

अनुसूचित क्षेत्रात (पेसा) असलेल्या अकरा गावांनी १५ ऑगस्ट रोजी झालेल्या त्यांच्या ग्रामसभांमध्ये बुलेट ट्रेनच्या जमीन संपादनासाठी ठराव घेऊन सहमती दर्शविली. त्यामुळे आतापर्यंत पालघर जिल्ह्यतून या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ८५ टक्के भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

११ गावांचा विरोध कायम

बुलेट ट्रेनला विरोध असणाऱ्या गावांमध्ये तलासरी,वसई तालुक्यातील प्रत्येकी एक, डहाणू तालुक्यातील दोन व पालघर तालुक्यातील सात गावांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन होणाऱ्या ७१ ग्रामपंचायतींपैकी ४३ गावे ही अनुसूचित क्षेत्रअंतर्गत म्हणजे ‘पेसा’ गावे आहेत. यापैकी ३२ गावांनी संपादनासाठी सकारात्मकता तर  नऊ ग्रामपंचायतीने नकारात्मकता दाखवली आहे. तर दोन ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा प्रकल्पाच्या विरोधामुळे तहकूब झाल्या आहेत. भूसंपादनबाबतीत अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे भूसंपादन कायद्यान्वये संपादनाची कार्यवाही सुरू आहे.

पालघर जिल्ह्य़ातील बुलेट ट्रेन

  • मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पालघर जिल्ह्यतील अंतर १०९ किमी. ’ चार तालुक्यांतील ७१ गावांमधून मार्ग.
  • बोईसर आणि विरार ही दोन बुलेट ट्रेनची स्थानके.

प्रकल्पाला विरोध असलेली गावे

  • पालघर तालुका : कल्लाळे, मान, खानिवडे, वाळवे, शिगाव
  • डहाणू तालुका: दाभले, साखरे
  • तलासरी तालुका: वरवाडा
  • वसई तालुका: टीवरी

जिल्ह्यत ६० गावांनी बुलेट ट्रेन जमीन संपादनासाठी सकारात्मकता दाखवली आहे. त्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. जिल्ह्यत ११ गावांचा विरोध असला तरी या गावांमध्ये असलेले प्रकल्पाबाबतचे गैरसमज दूर करून ही गावे भूसंपादन करण्यासाठी प्रयत्न केली जातील, नागरिकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दयावा.

संदीप पवार, उप जिल्हाधिकारी, भूसंपादन

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Clear the way for the bullet train ssh

ताज्या बातम्या