पालघर : पालघर जिल्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने १ जानेवारी ते ३० जून २०२५ या केवळ सहा महिन्यांत १२३ रुग्णांना तब्बल ९८ लाख ५० हजार रुपयांची वैद्यकीय मदत वितरित केली आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये कार्याभिमुख दृष्टिकोन, गरजूंपर्यंत प्रभावी पोहोच आणि निधी व्यवस्थापनातील पारदर्शकता यामुळे हा कक्ष पालघर जिल्ह्यासाठी विशेषतः ग्रामीण आदिवासी भागासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
पालघर हा आदिवासी जिल्हा असून या भागात आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावतात. अनेक वेळा आजारांसाठी लाखो रुपयांचा खर्च येत असल्याने आर्थिक दृष्ट्या कमकुवत रुग्ण उपचार घेण्याचे टाळतात. या कक्षाने गरजू रुग्णांना आर्थिक मदत पुरवण्यात आणि त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
अंतिम अवस्थेतील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेली मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना आता जिल्हा स्तरावर प्रभावीपणे कार्यान्वित होत असून, गरजूंना दिलासा देणारे यश मिळवत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या जिल्हा कक्षामुळे रुग्णांना वैद्यकीय मदतीसाठी थेट मंत्रालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. या उपक्रमामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वेळेची आणि पैशाची मोठी बचत होत आहे, तसेच उपचारात होणारा विलंबही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी: अर्ज प्रक्रिया आणि पात्रता
गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवण्यासाठीची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे. अर्जदार www.cmrf.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात किंवा जिल्हा कक्ष कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहूनही अर्ज सादर करू शकतात. अर्जासोबत आधार कार्ड, रेशन कार्ड, वैद्यकीय अहवाल, उत्पन्नाचा दाखला आणि खर्चाचा अंदाजपत्रक ही आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹१.६० लाखांपेक्षा कमी असावे हा प्रमुख निकष आहे. तसेच, फक्त सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांनाच मदत दिली जाते; उपचार पूर्ण झाल्यानंतरचा अर्ज स्वीकारला जात नाही. अर्ज मंजूर झाल्यानंतर, संबंधित रुग्णालयाच्या बँक खात्यात थेट निधी जमा केला जातो, ज्यामुळे लाभ प्रक्रिया जलद आणि पारदर्शक होते.
सामाजिक उपक्रम आणि आरोग्य चळवळ
मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा पालघर जिल्हा कक्ष केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नाही, तर जनजागृती आणि सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रमही राबवत आहे. त्यांनी रक्षाबंधन आणि गणेशोत्सव या सणांच्या निमित्ताने विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच यापूर्वी पाच रक्तदान शिबिरे घेऊन त्यात ९५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. याशिवाय आषाढी एकादशीला “चरणसेवा व आरोग्य तपासणी” हा अभिनव उपक्रम राबवून १३३ वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली आणि ४५ जणांना चरणसेवेचा लाभ दिला.
निधी संकलन आणि समन्वय
जिल्हा कक्षाने जनतेमध्ये योजनेबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि निधी उभारणीसाठी सक्रिय प्रयत्न केले आहेत. यासाठी त्यांनी ९ रुग्णालये आणि १२ सेवाभावी संस्थांना भेटी दिल्या. या प्रयत्नांतून १,०६,००० इतका निधी संकलित झाला. शासन, रुग्णालये आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये समन्वय साधून अधिकाधिक रुग्णांना योजनेचा लाभ मिळवून देण्याचे कार्य अविरत सुरू आहे. सध्या योजनेअंतर्गत नोंदणीकृत ५ रुग्णालयांची माहिती पोर्टलवर अद्ययावत करण्यात आली असून भविष्यात आणखी रुग्णालये जोडण्याचे नियोजन आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.