मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय परिसरात पोलिसांचे प्रशिक्षण; विद्यार्थी व पालकांची प्रवेशासाठी मोठी गैरसोय
पालघर : जिल्ह्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षण संचालनालयाने बुधवारपासून दिले आहेत. मात्र पालघरमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी येत असल्याने जिल्हा पोलिसांमार्फत आयोजित केलेल्या पोलिसांच्या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थी व पालकांची प्रवेशासाठी मोठी गैरसोय झाल्याचे येथे दिसून आले. गर्दीमुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून माघारी परतावे लागले.
पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात मुख्यमंत्री सुरक्षा कार्यक्रम प्रशिक्षणासाठी सुमारे हजार पोलिसांचे प्रशिक्षण जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्यामार्फत घेण्यात येत होते. याच दरम्यान अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने पालक व विद्यार्थ्यांचीही गर्दी महाविद्यालय परिसरात होत होती. मात्र प्रवेशद्वार व महाविद्यालय परिसरात पोलिसांचा फौजफाटा पाहून पालकही संभ्रमात पडले.
काही पालकांनी प्रवेशासंदर्भात विचारणा न करताच एवढा मोठा बंदोबस्त पाहून भीतीने तेथून माघार घेतली, तर काही पालकांनी महाविद्यालयात जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना महाविद्यालयाच्या प्रवेशदारापासूनच परत पाठवण्यात आले. पोलिसांच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांच्या खासगी दुचाकी तसेच पोलिसांची शासकीय वाहने यांची मोठी वाहन कोंडी महाविद्यालय परिसरात झाल्याचे पाहावयास मिळाले. यामुळे अकरावी प्रवेशासंदर्भात चौकशी करण्यासाठी येणाऱ्या पालक व विद्यार्थ्यांना आपली वाहने दूरवर लावावी लागली. पोलिसांच्या वाहनांनी हा रस्ता पूर्णपणे व्यापून गेल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच वेळ वाहन कोंडी व वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.
या मोठय़ा कोंडीमध्ये पालकांसह विद्यार्थी संभ्रमात पडले व महाविद्यालयात न जाता महाविद्यालयाबाहेरील असलेल्या सूचनाफलकावरील प्रवेशाच्या सूचना वाचून त्यांना माघारी परतावे लागले. महाविद्यालयाच्या आत प्रवेश करणाऱ्या पालकांना तिथे असलेल्या काही व्यक्तींनी प्रवेश सध्या तरी सुरू झाला नसून पुढील सूचना आल्यावर कळवले जाईल किंवा सूचना फलकावरील सूचना वाचून प्रवेश प्रक्रिया जाणून घ्या असे सांगण्यात आले. त्यामुळे दांडेकर महाविद्यालयातील प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी संभ्रम निर्माण झाला.
सूचनाफलकावर दिलेल्या सूचनेनुसार संकेतस्थळावर नोंदणी केली असता नोंदणी सुरू झाले नसल्याचे तेथे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांंच्या पालकांमध्ये पहिल्याच दिवशी मोठा संभ्रम निर्माण झाला.
अकरावी प्रवेश बुधवारपासून ते सात दिवसांपर्यंतच मर्यादित असल्याने पहिलाच दिवस प्रवेशाचा या कोंडीमुळे वाया गेल्याचे काही पालकांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले आहे.
महाविद्यालयाची आर्जव तरी संभ्रम कायम
महाविद्यालयात पोलीस प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असताना प्रवेशासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना महाविद्यालयात प्रवेश द्यावा असे महाविद्यालय प्रशासनामार्फत पोलिसांना सांगण्यात आले होते. मात्र महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासह परिसरामध्ये मोठा फौजफाटा असल्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला व त्यांना माघारी परतावे लागले. प्रवेश प्रक्रियेसाठी काही पालक ग्रामीण भागातून विचारपूस करण्यासाठी आल्यामुळे त्यांची फेरी वाया गेली आहे.