जिल्हा परिषदेतील निरोप समारंभावर ठेकेदारांचा पगडा

पालघर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतांच्या निवृत्ती कार्यक्रमात ठेकेदारांनी आतषबाजी करून जणू जिल्हा परिषदेवर ठेकेदारांचाच पगडा असल्याचे दाखवून दिले.

जिल्हा परिषदेतील निरोप समारंभावर ठेकेदारांचा पगडा

पालघर: पालघर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतांच्या निवृत्ती कार्यक्रमात ठेकेदारांनी आतषबाजी करून जणू जिल्हा परिषदेवर ठेकेदारांचाच पगडा असल्याचे दाखवून दिले. या निरोप समारंभामध्ये ठेकेदारांची संख्या लक्षणीय असल्याने हा विषय सध्या जिल्ह्यात चर्चेचा ठरला आहे.

जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता माधव शंखपाळे यांच्या सेवानिवृत्तीप्रीत्यर्थ जिल्हा परिषद सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, विभागप्रमुख तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनात जिल्हा परिषद बांधकाम विभागात सक्रिय असणाऱ्या ठेकेदारांनी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात आले. समारंभाच्या काळात मोठय़ा प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. संपूर्ण जिल्हा परिषद कार्यालय परिसर दणाणून गेले होते. या कार्यक्रमात ठेकेदारांची संख्या लक्षणीय असल्याने जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या विकासामध्ये ठेकेदारांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याबाबतची चर्चा रंगली आहे.

जिल्हा परिषद कार्यालयामध्ये ठिकठिकाणी मधमाशांची पोळी असून फटाक्यांमुळे माशा बिथरण्याची भीती होती. असे झाले असता, मोठा अनर्थ झाला असता. फटाके फोडण्याचा कार्यक्रम वाहनतळावर झाला.

जिल्हा परिषद सदस्य व ठेकेदार
जिल्हा परिषदेतील बहुतांश सदस्य व ठेकेदारांमध्ये सलोख्याचे संबंध असल्याचे तसेच अनेक जिल्हा परिषद सदस्य आपल्या कार्यकर्त्यांच्या नावावर काम घेत असल्याचे आरोप याआधीपासूनच होत आहेत. त्यामुळे कार्यालयात आल्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांचे वास्तव्य बांधकाम विभागात अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद सदस्यांची विशेष जवळीक असल्याचे म्हटले जात आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
तालुक्यांत मुसळधार पाऊस ; जनजीवन विस्कळीत, जिल्ह्य़ात १०१ मिमी. पावसाची नोंद
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी