लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : स्वतःच्या स्वार्थासाठी केलेली आघाडी देशातील तसेच राज्यातील जनतेला पसंद नसून स्वार्थावर आधारित राजकारणाचा अंत निश्चित आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर सोनिया गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य संपणार असून त्यांना पारिवारिक सुख उपभोगण्यास मोकळीक राहील असे उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री खासदार डॉ. दिनेश शर्मा यांनी पालघर येथे प्रतिपादन केले.

राज्यातील भाजपाच्या संघटनात्मक बांधणी व निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी डॉ. दिनेश शर्मा हे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. पालघर लोकसभा क्षेत्रातील भाजपा तसेच महायुती घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी आज मनोर येथे बैठक घेतली व वार्तालाप केला.

आणखी वाचा- महाविकास आघाडीचे ओम राजेनिंबाळकरांची उमेदवारी दाखल

केंद्रात सरकारच्या विविध योजनांचे गुणगान करताना या योजना पालघर जिल्ह्यात अपयशी ठरल्या बाबत पत्रकाराने छेडले असता त्याचा इन्कार करत देशपातळीवर या योजना यशस्वी झाल्याचे दावा डॉ. शर्मा यांनी केला. गेल्या १० वर्षात सत्तेमध्ये असताना नागरिकांच्या विविध दुर्लक्षित प्रश्नांचा समावेश संकल्प प्रथम मध्ये केल्याबाबत विचारणा केली असता त्याबाबत उत्तर देण्याचे टाळत संकल्प पत्रामधील विविध योजनांची माहिती दिली. घरगुती गॅसचे दर हे तुलनात्मक स्वस्त असून त्याची सहजगत उपलब्धता हे यश सांगत उज्जवला योजना ग्रामीण भागात अयशस्वी असल्याचा दावा त्यांनी खोडून काढला.

भाजपा व मित्रपक्षांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव करण्यासाठी कंबर कसली असून महाराष्ट्रात नवीन इतिहास रचला जाईल असा दावा केला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा तसेच जनतेच्या अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी गाडल्याचे सांगत गेल्या विधानसभा निवडणुकीचा जनादेश धुडकावल्याने त्यांच्या चुकीच्या त्यांना जनता दंड देईल असे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला तसेच पालघरच्या उमेदवारी व स्थानिक प्रश्नांना त्यांनी बगल दिली.

आणखी वाचा-माढ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते-पाटील यांची उमेदवारी दाखल

स्थानिक पदाधिकाऱ्यांची बोलती बंद

या निवडणुकीत विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्यास भाजपा कार्यकर्ते त्यांचे काम करणार नाही असे भाजपाच्या जिल्हाध्यक्ष यांनी यापूर्वी जाहीर केले होते. याबाबत विचारणा केली असता डॉ. दिनेश शर्मा यांनी भाजपा व मित्र पक्षांतर्फे नरेंद्र मोदी हेच प्रत्येक मतदारसंघात प्रति उमेदवार राहणार असून कोणत्याही स्थानीय पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध काम करण्याचे सांगितले तरीही कार्यकर्ते त्यांचे ऐकणार नाहीत असे ठणकावून सांगितले. यावर स्थानीय भाजपा कार्यकर्त्यांचा चेहरा बघण्याजोगे झाला होता.

बंदर प्रकल्पात जनतेचे हित लक्षात राहील

वाढवण येथे बंदर प्रकल्प उभारताना जनतेचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाहीत तसेच त्यांचे हित सरकारच्या लक्षात राहील असे प्रतिपादन डॉ. शर्मा यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.