पालघर: शिवसेनाप्रमुखाने स्थापन केलेल्या शिवसेनेला नकली म्हणणाऱ्या भाजपाच्या नेत्यांची शैक्षणिक पदी (डिग्री) नकली असल्याचे प्रतिउत्तर उद्धव ठाकरे यांनी बोईसर येथे दिले. देश हुकूमशाही कडे वाटचाल करत असताना देशाची मजबुती कायम ठेवण्यासाठी इंडिया आघाडीच्या माध्यमातून संमिश्र सरकार आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. तसेच महा विकास आघाडी प्रणित इंडिया सरकार सत्तेत आल्यास वाढवण बंदर कायमचे रद्द करून पालघर जिल्ह्यात चांगले उद्योग आणून विकास साधला जाईल असे त्यांनी आश्वासन दिले.

महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ बोईसर (पास्थळ) येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला खासदार संजय राऊत, आमदार विनोद निकोले, आमदार सुनील भुसारा, कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. अशोक ढवळे, आदिवासी एकता परिषदेचे काळूराम धोदडे तसेच महा विकास आघाडी घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा…जिजाऊ विकास पार्टी भिवंडी व पालघर लोकसभा लढवणार

वाढवण बंदरामुळे नेमका कोणाचा विकास होणार आहे असा सवाल उपस्थित करत मोदी परिवार सांगणाऱ्या पंतप्रधान यांनी जनतेशी आपले नाते जपावे असा सल्ला दिला. दोन व्यक्तींचा हा परिवार सूटबुटातील मित्रांचे हित जपतो अशी टीका केली. पोलिसांचा मोठा फौजफाटा लावून वाढवण बंदरा संदर्भात जन सुनावणी पार पडल्याचे सांगत ते पुन्हा निवडून आले तर रणगाडे घेऊन हे बंदर उभारणी साठी प्रयत्न करतील असे उपस्थित नागरिकांना सांगत भाजपाला गाडण्याची हीच वेळ असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

निसर्गरम्य समुद्र किनारा व जव्हार सारखे पर्यटन स्थळ लाभलेल्या पालघर जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी जिल्ह्याचे वैशिष्ट्य राखून रोजगार निर्मिती केली जाईल असे सांगितले. तसेच पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून विमानतळ, उद्योग आणले जातील असे ते म्हणाले. मोदी सरकारने चांगले उद्योग गुजरात मध्ये देऊन विध्वंस करणारे उद्योग महाराष्ट्र मध्ये आणण्याचे सांगत यापुढे केंद्र सरकारला महाराष्ट्राच्या हक्काचे ओरबाडायला दिले जाणार नाही असे ठणकावून सांगितले.

हेही वाचा…पालघर : उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी खासदारांचा प्रचार

सध्या भाजपाच्या स्थितीबद्दल टिपणी करताना अस्सल भाजप कोणता असा सवाल उपस्थित करत उपऱ्याची भरती केल्याचे त्यांनी लक्ष वेधले. भाजपा हा पक्ष भाडखाऊ, भेकड व भ्रष्ट असल्याचे आरोप करत पालघर मधून यापुढे गद्दारांना गुजरात मध्ये जाऊ देणार नाही असे सांगितले.

चीन, पाकिस्तान आदी देशांकडून देशात होणाऱ्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करत त्यांना मोकाट सोडून देण्यात आले असून त्यांच्यासमोर शेपट्या घालून राहणाऱ्या भाजपाला मत देणार का असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला. तसेच आपल्याला भारत सरकार हवे की मोदी सरकार असे विचारात एक माणूस १४० कोटी जनतेला गुलाम बनवण्यापासून रोखण्यासाठी त्यांना तडीपार करण्याची सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा…बहुजन विकास आघाडीमुळे पालघरमध्ये तिरंगी लढत होणार

देशात सुमारे आठ हजार कोटी रुपयांची निवडणूक घोटाळे व पीएम केअर फंडाचा गैरव्यवहार दुर्लक्षित असून विरोधकांच्या विरुद्ध ईडी, सीबीआय व इन्कम टॅक्स अशी अस्त्र वापरली जात असल्याचे त्यांनी लक्ष वेधले. अचानक पणे नोटबंदी करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे ऐवजी आगामी निवडणुकीत ठाकरे व पवार यांचे नाणे वाजणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार संजय राऊत यांनी मोदी, शहा यांचे नाव न घेता गुजरात मधला डुप्लिकेट माल आम्हाला डुप्लिकेट कसे सांगतो अशी खिल्ली उडवली. माल घेऊन पाहिल्यानंतर नकली कोणता याची प्रचिती जनतेला मिळेल असे सांगत बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची टक्कर घेतली तर त्यांना महाराष्ट्रात गाढले जाईल असा दम भरला.

हेही वाचा…पालघर मध्ये बविआ निवडणूक लढवणार, हितेंद्र ठाकूर यांची घोषणा

उपनगर गाडीतून परतीचा प्रवास

दुपारी ४.३० वाजता च्या सुमारास बोईसर येथे हेलिकॉप्टरने आगमन झालेल्या उद्धव ठाकरे हे सायंकाळी ५.२० वाजता जाहीर सभेत उपस्थित झाले. त्यानंतर मुंबईकडे परतताना राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा धसका घेत, साडेसात वाजता डहाणू चर्चगेट लोकल मधून प्रवास करण्याचे पसंद केले.