अवकाळी पावसामुळे हरभरा, कलिंगड पिकांचे नुकसान; शेतकरी, बागायतदार हवालदिल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर/वाडा : पालघर जिल्ह्य़ात बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्य़ातील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याचे संकट  उभे राहिले आहे. अनेक तालुक्यांत शेतकरी, बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कलिंगड व हरभरा पिकांना पावसाचा मोठा फटका बसला असून अलीकडेच लागवड केलेल्या कलिंगडाच्या रोपांचा अक्षरश:  चिखल झाल्याचे दिसून आले.

पालघर जिल्ह्य़ात बुधवारी दिवस-रात्र पावसाची संततधार सुरू होती. ढगाळ वातावरण, गारवा यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुरुवारी पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी ढगाळ   वातावरण आणि जाणवणारा गारवा यामुळे संकट कायम असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते. अवकाळी पावसामुळे फळे भाजीपाला पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविण्यात येते. त्यामुळे  मोहोर येण्याच्या स्थितीत असणाऱ्या आंबा झाडांवर बुरशीजन्य रोग प्रतिबंधात्मक फवारणी करणे आवश्यक झाले आहे. जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी भाजीपाल्याची नव्याने रोपे लावण्यात आली होती. परंतु त्यात पाणी साचल्यामुळे काही प्रमाणात भाजीपाल्यावर रोग किंवा रोप कुजण्याची भीती संभवत आहे. तूर लागवडीवर अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून तूर पिकावर देखील प्रतिबंधात्मक फवारणी करणे गरजेचे झाले आहे. जिल्ह्य़ात हरभरा लागवडीचे अवस्थेत असून या पावसामुळे हरभऱ्यावर काही प्रमाणात पादुर्भाव होण्याची शक्यता असला तरीही हरभरा लागवडीसाठी हा पाऊस काही प्रमाणात पूरक ठरण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांकडून उपलब्ध झाली आहे.

फळ पिकांना संरक्षण

आंबा व चिकू या फळपिकांसाठी १ डिसेंबरपासून संरक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्य़ातील अनेक शेतकऱ्यांनी ३० नोव्हेंबपर्यंत आंबा पिकासाठी विमा रक्कम जमा करून या योजनेत सहभागी झाले होते. १ डिसेंबर रोजी झालेल्या पावसात आंबा फळ पिकाला झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

निम्मे रब्बी पिके उद्ध्वस्त

वाडा तालुक्यात रब्बी पिकाचे चार हजार हेक्टर क्षेत्र असून या क्षेत्रातील निम्मे पीक उद्ध्वस्त झाली आहेत.   हरभरा, मूग, वाल या रब्बी पिकांना पावसाचा सर्वात जास्त फटका बसला आहे.  काही दिवसांपूर्वीच  तालुक्यातील विविध गावांमध्ये ३० ते ३५ हेक्टर क्षेत्रावर कलिंगड पिकाची लागवड केली आहे.  शेतांमध्ये एक ते दीड फूट उंचीपर्यंत पाणी बारा ते पंधरा तास भरून राहिल्यान  रोपे मरून गेली.  कलिंगड पिकासाठी प्रति एकरी केलेला ४० ते ४५ हजार रुपये वाया गेले  आहेत. मौजे सांगे येथील शेतीनिष्ठ शेतकरी अनिल पाटील यांनी तीन एकर क्षेत्रावर केलेली कलिंगडाची लागवड  उद्ध्वस्त झाली आहे. मौजे अंबिस्ते बुद्रुक येथील संजय पाटील या शेतकऱ्याच्या दोन एकर क्षेत्रावरील कलिंगड पीक जमीनदोस्त झाले आहे. हरभरा, मूग, वाल या पिकांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजीपाला  तसेच वीट उत्पादन करणारे व्यावसायिकांना पावसाचा फटका बसला आहे.

८२ मिलीमीटर पाऊस

पालघर जिल्ह्य़ात ८० ते १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्य़ात सरासरी ८२ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. पालघर, वसई तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्य सरकारतर्फे नोंदवण्यात आलेल्या पर्जन्यमानात वसई व पालघर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद  झाली आहे. मोखाडा व विक्रमगड तालुक्यात तुलनात्मक कमी पाऊस झाला आहे.  यंदाच्या हंगामात जिल्ह्य़ाच्या २,३८३ मिलिमीटर सरासरी पावसाच्या तुलनेत १२३ टक्के पाऊस झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सव्वातीनशे मिलिमीटर पाऊस अधिक झाला आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crisis disease outbreak crops ysh
First published on: 03-12-2021 at 00:50 IST