पालघर : पालघर जिल्ह्यात कुठल्याही प्रकारच्या भातशेतीचे नुकसान अतिवृष्टीमुळे झाली नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली होती. मात्र आता पालघर जिल्ह्यात वसई व वाडा तालुक्यामध्ये भात शेतीची नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागच देत आहे. त्यामुळे कृषी विभागाचा सावळागोंधळ कारभार समोर येत आहे. इतर तालुक्यांतही नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाडा तालुक्यामध्ये २५० हेक्टरपेक्षा जास्त तर वसई तालुक्यामध्ये एक हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. एक हजारपेक्षा जास्त शेतकरी नुकसानग्रस्त व बाधित आहेत.

अतिवृष्टीमुळे पालघर तालुक्यातील कोकणेर, विश्रामपूर, वसरे, कुकडे आदी पूर्व परिसरांमध्ये उभे असलेले व लागवड केलेले भात पीक आडवे झाले आहे, तर काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने पिकांची मुळे कुजून गेली आहेत. मात्र त्यानंतरही येथे नुकसानीचा पंचनामा करण्यात आलेला नाही असे शेतकरी सांगत आहेत. कृषी विभाग कार्यालयातच बसून अहवाल तयार करत आहे. बांधांवर येऊन त्यांनी पाहणी केलेलीच नाही असे आरोप शेतकरी वर्गाने केले आहेत.

गेल्या आठ-दहा दिवसांपूर्वी आलेल्या अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पूरपरिस्थितीमुळे शेतपिकांच्या मोठय़ा नुकसानीची शक्यता वर्तवण्यात आली होती. कृषी विभागाला या नुकसानीबाबत विचारले असता कृषी विभागाने अजून तरी कुठल्याही प्रकारची नुकसानी झाल्याचे अहवाल नसून तालुका कृषी अधिकाऱ्यांनी निरंक अहवाल दिल्याचे सांगण्यात आले होते. मात्र कृषी विभागाच्या या माहिती विरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली व त्यांनी कृषी विभागाविरोधात संताप व्यक्त केला. प्रत्यक्षात पाहणी न केल्यामुळे कृषी विभागाला नुकसानीचा अंदाज नाही. त्यामुळे कृषी विभागाने आधी शहानिशा करावी आणि त्यानंतरच अहवाल द्यावा, असे शेतकऱ्यांमार्फत सांगितले जात आहे.

आता वाडा व वसई तालुक्यांतील नुकसानीचा आकडा समोर आल्याने इतर तालुक्यांमध्येही भात पिकांचे मोठे नुकसान झाल्याची दाट शक्यता लक्षात घेता कृषी विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून त्याची माहिती व नुकसानभरपाईचा अहवाल शासनाकडे पाठवावा, अशी मागणी केली जात आहे.

११२५ शेतक ऱ्यांना फटका
वाडा तालुक्यात भात व नागली पिकांचे २८० हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त झाले आहे. ११२५ शेतकऱ्यांनी लावलेले पीक नुकसानग्रस्त झाल्याने ते बाधित झाले आहेत. तसेच वसई तालुक्यामध्ये सात शेतकऱ्यांचे एक हेक्टर २२ गुंठे भात पिकाच्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Damage to paddy crops in wada vasai taluka amy
First published on: 29-07-2022 at 00:04 IST