उपनगरीय क्षेत्र असूनही रेल्वे गाडय़ा मात्र मर्यादित ; नऊ वर्षांपासून डहाणू- वैतरणा भागांतील महिला प्रवाशांचे हाल

करोनाकाळात लांब पल्ल्याच्या गाडय़ा बंद करण्यात आल्या होत्या.

उपनगरीय क्षेत्र असूनही रेल्वे गाडय़ा मात्र मर्यादित ; नऊ वर्षांपासून डहाणू- वैतरणा भागांतील महिला प्रवाशांचे हाल

पालघर : पश्चिम रेल्वेने डहाणूपर्यंत उपनगरीय क्षेत्र जाहीर करून तब्बल नऊ वर्षांचा कालावधी उलटला असला तरीही उपनगरीय सेवा मर्यादित असल्याने तसेच ऐन गर्दीच्या वेळी गाडय़ांची कमतरता भासत असल्याने डहाणू ते वैतरणा परिसरात राहणाऱ्या महिला प्रवाशांचे हाल होत आहेत.
भाजीपाला, मासळी विक्री तसेच नोकरीनिमित्ताने अनेक महिला घोलवड-डहाणूपासून वैतरणापर्यंत कामानिमित्त मुंबईच्या दिशेने प्रवास करत असतात. पहाटेपासून दुपापर्यंत चर्चगेटपर्यंत जाणाऱ्या थेट उपनगरीय गाडय़ांची संख्या मोजकी असल्याने अशा गाडय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असते. तसेच महिलांच्या संख्येच्या तुलनेत उपलब्ध जागा कमी पडत असल्याने सर्व डब्यांमध्ये व विशेषत: महिलांच्या डब्यात तुफान गर्दी होत असते.

करोनाकाळात लांब पल्ल्याच्या गाडय़ा बंद करण्यात आल्या होत्या. या गाडय़ा पूर्ववत सुरू केल्यानंतर काही काळ त्यामध्ये महिलांसाठी आरक्षित डबा नव्हता. सध्या मुंबईकडे जाणाऱ्या आणि प्रमुख गाडय़ा असणाऱ्या वलसाड फास्ट पॅसेंजर या गाडीत महिलांसाठी दोन राखीव डबे, तर फ्लाइंग राणी सुपरफास्ट गाडीला महिलांसाठी एक डबा आरक्षित असला तरी महिला प्रवाशांची संख्या पाहता हा डबा महिलांसाठी अपुरा पडत आहे.

पूर्वी डहाणू रोड येथून विरारसाठी जाणारी सात वाजून पाच मिनिटांनी सुटणारी उपनगरी सेवा करोनाकाळात अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी पहाटे चार वाजून ४० मिनिटांनी रूपांतरित करण्यात आली होती, परंतु या गाडीच्या वेळेत पश्चिम रेल्वेने हमसफर गाडी चालवण्याचे प्रयोजन केले आणि उपनगरीय गाडय़ांचे रेक उपलब्ध नसल्याचे कारण सांगून त्या वेळेतील गाडी बंद करण्यात आली. परिणामी, सात वाजून वीस मिनिटांनी डहाणू रोड येथील सुटणाऱ्या चर्चगेट गाडीमध्ये तुफान गर्दी होत आहे. विशेष म्हणजे पालघरनंतर महिलांच्या डब्यात चढणे महिला प्रवाशांना अत्यंत बिकट होत असून ऐन कामावर जाण्याच्या वेळेला गाडी नसल्याने महिला प्रवाशांची गैरसोय होत आहे.

पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून विरार ते डहाणू दरम्यान तसेच डहाणू रोड येथून थेट अंधेरी, दादर व चर्चगेटपर्यंत थेट सेवा वाढवाव्यात, अशी मागणी येथील प्रवासी व प्रवासी संघटनांकडून केली जात आहे. पश्चिम रेल्वेला सहा वातानुकूलित रेक उपलब्ध होणार असून त्याची एखादी रेक सेवा डहाणू रोडपर्यंत सुरू करावी, अशी मागणीदेखील पुढे येत आहे.

लांब पल्ल्याच्या गाडय़ांना थांबा देण्याची मागणी
करोनानंतरच्या काळात नोकरदार प्रवाशांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली असून पश्चिम रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाडय़ांची वेळापत्रक बदलल्याने तसेच लोकशक्ती एक्सप्रेस व इतर काही गाडय़ांचे थांबे सफाळा, पालघर व बोईसर येथे रद्द केल्याने प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे. चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यास काही वर्षांचा कालावधी शिल्लक असताना उपनगरीय गाडय़ांची संख्या वाढवावी, अन्यथा लांब पल्ल्याच्या गाडय़ांना थांबा द्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Despite being a suburban area the number of trains is limited amy

Next Story
ठेकेदारांवर नगरपरिषद मेहेरबान; भविष्य निर्वाह, कामगार विमा निधी थकविणाऱ्यांना ठेके
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी