पालघर : शेतकऱ्याची ओळख प्रस्थापित करण्यासाठी तसेच शेत जमिनीची आधार कार्ड सोबत सांगड घालण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वकांक्षी ॲग्रीस्टॅक योजना आणली असून या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी आपला ओळख क्रमांक मिळवला आहे. असे असताना नुकसान भरपाई, अनुदान, व विमा भरपाई करिता शेतकऱ्यांना पुन्हा विविध कागदपत्रांची प्रत द्यावी लागत असल्याने आदिवासी व अल्पभूधारक शेतकरी त्रस्त झाले आहेत.

राज्य शासनाने आधार कार्ड व शेत जमीन संदर्भातील कागदपत्रांची सांगड घालण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजना आणून शासकीय अनुदान मिळवण्यासाठी या योजनेअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतकरी अप क्रमांक प्राप्त केला असून त्या संदर्भात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना विविध प्रकारची नुकसान भरपाई अथवा अनुदान घेण्यासाठी व वेगवेगळ्या शासकीय योजनां चा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना त्याला आधार कार्ड, ७/१२ उतारा, ८ अ, ॲग्री स्टॅक नोंदणी प्रमाणपत्र, स्वतःचा फोटो, शेतात जीपीएस फोटो, बँक खात्याचा तपशील व इतर कागदपत्र द्यावी लागत आहेत. ही कागदपत्र गोळा करून त्याच्या छायांकित प्रत काढून देण्यासाठी सर्वसामान्य व विशेषतः ग्रामीण भागातील आदिवासी शेतकरी यांना त्रासदायक ठरत असून अनेकदा कागदपत्रांची पूर्तता न केल्याने ते शासकीय लाभांपासून वंचित राहत असल्याचे दिसून आले आहे.

या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांच्याशी संपर्क साधला असता ॲग्रीस्टॅक प्रमाणपत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ई केवायसी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची प्रत देण्याची गरज नसून स्वतःचे छायाचित्र व बँक खात्याचा तपशील देणे गरजेचे असल्याचे त्यांनी लोकसत्ताला सांगितले. या संदर्भात नुकसान भरपाई अथवा अनुदान देणाऱ्या विभागांना सूचित करण्यात येईल असे ते पुढे म्हणाले.

गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांकडून अनुदान व नुकसान भरपाई साठी विविध कागदपत्र देण्यासाठी ओढावलेले प्रसंग :

१) मे महिन्याच्या २०२५ मध्ये अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाई.
२) जून महिन्यात कृषी विभागाने नुकसान भरपाई च्या याद्या करताना केलेला चुकांची दुरुस्ती करण्यासाठी तहसील कचेरी येथे कागदपत्रांची पूर्तता.
३) विमा कंपनीकडून विमा मिळवण्यासाठी व २०२४ खरीप हंगामातील नुकसान भरपाईची रक्कम मिळवण्यासाठी जुलै महिन्यात कागदपत्राची पूर्तता.
४) सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी मध्ये झालेल्या नुकसान बाबतीत सर्वेक्षण करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता.
५) १ जून ते ३० सप्टेंबर या काळात पंतप्रधान हंगामी पीक विमा कवच मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्र पूर्तता.

या व्यतिरिक्त किरकोळ कामासाठी कृषी व महसूल खात्याकडून सातत्याने आधार कार्ड बँक पासबुक ७/१२ उतारे, ८ अ उतारे, जीपीएस फोटो लाभधारकाचा किंवा शेतकऱ्याचा पासपोर्ट साईज फोटो, भावंडाचे ना हरकत दाखले ग्रामपंचायतीचे दाखले अशा अनेक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्याची ससेहोलपट झाल्याचे शेतकरी बांधवांकडून सांगण्यात आले.