बंद असलेल्या नगर परिषदेच्या कार्यालयाच्या मोकळ्या जागेत फेरीवाले, रिक्षा थांबे

पालघर: पालघर नगर परिषदेच्या जुन्या आणि बंद असलेल्या कार्यालयासमोर  असलेल्या  जागेत  फळ-भाजी विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. तर रिक्षा चालकांचाही बेकायदा थांबा उभा केल्यामुळे कार्यालयासमोर असलेल्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ   वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. 

पालघर नगरपरिषदेच्या इमारतीसमोर सुमारे ५० मीटर जागा नगरपरिषदेने रिकामी करून त्या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी तसेच कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहन सुविधेसाठी वाहनतळ कार्यरत केले होते. त्याठिकाणी मुख्य अधिकारी तसेच नगरसेवकांची वाहने देखील उभी केली जात असत. मात्र पालघर नगरपरिषदेची इमारत धोकादायक असल्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर नगरपरिषदेचे कार्यालय हे अग्निशमन दलाच्या कार्यालयाच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. परिणामी नगरपरिषदेतर्फे जुन्या इमारती समोर ठेवण्यात येणारा सुरक्षारक्षक हटविण्यात आला.

त्यामुळे मोकळ्या झालेल्या जागेवर फळ, भाजी व इतर वस्तू विक्रेत्यांनी कब्जा केला आहे.   त्या बाजूला तीन आसनी रिक्षाचा नवा थांबा उभा राहिला आहे. पूर्वी याच ठिकाणी बोईसरकडे जाणाऱ्या सहा आसनी वाहनांचा थांबा कार्यरत होता. मात्र वाहतूक कोंडीच्या कारणावरून हा थांबा मागे घेण्यात आला होता.  सद्यस्थितीत पालघर रेल्वे स्थानकालगत असलेली मोकळी जागा रिक्षाने व्यापलेली असून त्यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी आहे. तसेच या ठिकाणी असणारे वाहतूक नियंत्रण पोलीस क्रियाशील नसल्याने वाहतूक रेल्वेने प्रवास करू इच्छिणारे किंवा बाजारात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.

तोतया पोलिसाचा वावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालघर येथील शहराच्या मध्यवर्ती भागात रिक्षा संघटनेने थांब्यावरील रिक्षांचा क्रम ठरवण्यासाठी एका खासगी व्यक्तीची नेमणूक केली असून वेळप्रसंगी वाहतूक कोंडी झाल्यास या व्यक्तीकडून कोंडी सोडवण्यासाठी मदत केली जाते. मात्र हा व्यक्ती स्वत: पोलीस असल्याचा दावा करत असून गणवेशात नसतानादेखील अनेक सर्वसामान्य माणसांना दमदाटी करणे व कारवाईची धमकी देत असल्याचे दिसून आले आहे.