वाडा : वाडा तालुक्यातील जमीन बाधित शेतकऱ्यांचे वाडा प्रांत कार्यालयाच्या बाहेर गेल्या सहा दिवसांपासून बिऱ्हाड, भजन ठिय्या आंदोलन सुरू आहे. विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी शेतजमिनीत मनोरे उभारले जात असूनही शेतकऱ्यांना अद्यापही योग्य मोबदला मिळालेला नाही. यामुळे बाधित शेतकरी एकवटला असून त्यांनी शासन व प्रशासनाकडे योग्य मोबदला देण्याची मागणी केली आहे. मात्र प्रशासनाकडून कुठलाही सकारात्मक तोडगा न काढल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, जव्हार या तालुक्यांसह अन्य विविध भागातून खासगी कंपन्यांकडून उच्चदाब विद्युत वाहिन्यांचे जाळे टाकण्यासाठी शेतजमिनींमध्ये बिनधास्तपणे मनोरे उभारले जात आहेत. याबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही शिवाय कोणतेही पूर्वसूचना दिल्या जात नाही. मनोरे उभारले जात आहेत तेथुन उच्चदाब वाहिन्या जात असल्याने शेतकरी बाधित होणार आहे. शेतकऱ्यांना कुठलेही पीक घेताना कायमची मोठी अडचण उद्भवणार आहे. त्यामुळे मोठे नुकसान होणार आहे. याबाबत जमीनधारक शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळत नाही. असा गंभीर आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे.
जवळपास ३५० ते ४०० शेतकऱ्यांचे बुधवारपासून बिऱ्हाड व भजन आंदोलन सुरू आहे.
लोकप्रतिनिधी यांनी मात्र आंदोलकांची भेट घेवून ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली आहे. तसेच प्रशासनाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याची विनंती केली आहे.
मुख्य मागण्या:
मनोरे उभारलेल्या जमिनींचे नुकसान भरपाई म्हणून एक जिल्हा एक भाव द्यावा. प्रत्येक एका गुंठ्यांला १० लाख रुपये भाव मिळावा.(सध्या अडीच लाख रुपये गुंठा भाव देणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. मात्र तो वाढीव मिळावा)
विद्युत वाहिनी मोबदल्याची मर्यादा ३० टक्क्यावरून १०० टक्के करणे.
ज्या शेतकऱ्याची जागा बाधित होते त्याचा कुटुंबातील एक सदस्य कामाला लावावा.
शेतकऱ्याला पाच पटीने मोबदला देण्यात यावा.
बाधित शेतकऱ्याला पूर्ण मोबदला दिल्या शिवाय काम सुरू करू नये.
कोणत्याही शेतजमिनीत काम सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांची परवानगी घ्यावी.
सहादिवसांपासून सुरू असलेल्या बिऱ्हाड, भजन आंदोलनामुळे प्रांत कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना काहीसा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. आंदोलकांच्या मागण्या ह्या धोरणात्मक बाब असल्याने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविल्या आहेत. डॉ. संदीप चव्हाण , उपविभागीय (प्रांत) अधिकारी, वाडा
“आमच्या जमिनींवर मनोरे उभे राहणार असल्याने जमीन कायमची बाधित होणार आहे. त्यामुळे त्या भागात आम्ही पेरणी करू शकत नाही. झाडं लावता येणार नाही. पण त्याचे नुकसान भरपाई म्हणून सरकार काहीच देत नाही. हे अन्यायकारक आहे,” असं मत जमीन बाधित शेतकरी प्रमोद पाटील यांनी व्यक्त केल. प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. अन्यथा हे आंदोलन सुरूच ठेवून जिल्हाभर पसरवले जाईल. मिलिंद पष्टे, अध्यक्ष -धर्मवीर विचार मंच संघटना