scorecardresearch

कासा: वरोली नदीत अचानक हजारो मासे मृत, नदी प्रदूषित झाल्याने जलचर व नागरिकांना मोठा धोका

नदीच्या पाण्यावर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका उधभावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कासा: वरोली नदीत अचानक हजारो मासे मृत, नदी प्रदूषित झाल्याने जलचर व नागरिकांना मोठा धोका
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

कासा: तलासरी तालुक्यातून गुजरात राज्याकडे प्रवाहित होणाऱ्या वरोली नदीपात्रात रासायनिक द्रव पदार्थ सोडल्यामुळे नदी प्रदूषित होऊन वडवली गाव हद्दीत हजारो मासे मृतावस्थेत आढळले आहेत. या नदीच्या पाण्यावर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका उधभावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कुर्झे धरणाचे पाणी वरोली नदीतून तलासरी तालुक्यातील विविध गावातून गुजरात राज्यात जाते. या नदीपात्रात दापचरी रबर बोर्ड, टोलनाका आणि शिव मंदीर या भागातच रासायनिक द्रव पदार्थ टाकल्याने पाणी दूषित झाले आहे. या जल प्रदूषणामुळे मासे आणि अन्य जीव मृत झाले असून पाण्याला दुर्गंधी येत आहे. 

महाराष्ट्र गुजरात सीमेवर तलासरी तालुका वसला असून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग येथून जातो. जवळच उंबरगाव, वापी, सेलव्हासा, बोईसर एमआयडीसी अशा मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत.  महामार्गाने जात असताना टँकर मधून रासायनिक पदार्थ वरोली नदीपात्रात टाकण्याच्या घटना पूर्वी देखील घडल्या आहेत. चोरट्या मार्गाने प्रदूषित रासायनिक द्रव पदार्थ अज्ञातांनी सोडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकारामुळे  पाणी दूषित झाले असून मासे मृत झाले आहेत व मृत माशांचा खच पाण्यावर तरंगत आहे. यामुळे जलचारांवर मृत्यूची टांगती तलवार आहे. 

वडवली येथून हे दुषीत पाणी सवणे येथे पोचले आहे.  नदीचा प्रवाह वडवली, सवणे, वंकास, धामणगाव, करजगाव, वसा, झरी, वेवजी, गिरगाव, घिमानिया या डहाणू व तलासरी तालुक्यातील आदिवासी बहुल गावातून गुजरात राज्यात संजाण शहरातून वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते. त्यामुळे हे प्रदूषित पाणी वाहून मोठा धोका उदभवू शकतो हे लक्षात घेत स्थानिक नागरिकांनी तलासरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देऊन जलप्रदूषण करणाऱ्यां विरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2023 at 11:35 IST

संबंधित बातम्या