कासा: प्रशासनाकडून देण्यात आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, डहाणू तालुक्यात सुमारे २३० घरे पूर्णतः किंवा अंशतः उध्वस्त झाली आहेत. विशेषतः धाकटी डहाणू येथील मच्छीमार वसाहत या वादळामुळे सर्वाधिक बाधित झाली आहे. येथील समुद्रात असलेल्या ८६ बोटिंचे नुकसान झाले आहे, वादळी वाऱ्यामुळे बोटी एकमेकांवरआदळून तुटल्या असून ५ ते ६ बोटी पूर्ण तुटल्या आहेत तर अर्ध्या पेक्षा अधिक बोटिंचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे, मत्स्यव्यवसाय खात्याचे परवाना अधिकारी कुरकुटे यांनी सर्व बोटिंचे पंचनामे केले.

परिणामी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या बोटी स्थानिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असल्यामुळे आता त्यांच्या आर्थिक स्थितीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली असून, प्रशासनाने रात्रीपासूनच तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू केले आहे. आज सकाळपासून पंचनाम्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. मत्स्य व्यवसाय विभाग, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त पथकांमार्फत नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेतला जात आहे. प्रशासनाकडून तातडीची मदत लवकरात लवकर पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

वादळाचा फटका केवळ मच्छीमारांपुरता मर्यादित राहिलेला नाही. परिसरातील शेतकरी, वीटभट्टी व्यावसायिक आणि गवताचे व्यापारी यांनाही या आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचे नुकसान, विटांचे ढिगारे कोसळणे आणि गवताच्या गंजी भिजल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे स्थानिक व्यावसायिक आणि शेतकऱ्यांचीही मोठी आर्थिक घसरण झाली आहे.

महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती कार्याध्यक्ष व नॅशनल फिशवर्कर्स फोरमचे NFF अध्यक्ष रामकृष्ण तांडेल, ठाणे जिल्हा अध्यक्ष मानेंद्र आरेकर, ठाणे जिल्हा मच्छिमार सहकारी संघांचे अध्यक्ष जयवंत तांडेल, उपाध्यक्ष. नंदकुमार विंदे तेथील संस्थेचे पदाधिकारी,सदस्य व बोट मालक उपस्थित होते.आकस्मित आलेल्या वादळी वाऱ्याची हवामान खात्याने तसेच मत्स्यव्यवसाय खात्याने कुठलीही पूर्व सूचना न दिल्याने मच्छमारांना नुकसानीस सामोरे जावे लागले आहे असा आरोप मच्छीमार संघटनेने केला आहे.

तेव्हा शासनास तसेच संबंधित खात्याने नाममात्र भरपाई न देता बोटीच्या झालेल्या नुकसानीची पूर्ण रक्कम मदत रूपाने द्यावी अशी आम्हची मागणी आहे. आम्हाला माहित आहे की या अगोदर ही जि वादळे झाली त्या मध्ये लाखो रुपयांच्या बोटिंच्या रक्कमेच्या फक्त काही हजाराने मदत दिली, ती हास्य स्पद होती. नियमा प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी.

रामकृष्ण तांडेल कार्याध्यक्ष, महाराष्ट्र मच्छिमार कृति समिती

डहाणू तालुक्यामध्ये २३० घरांचा नुकसान झालं आहे. तर डहाणू खाडीलगत नांगरलेल्या ८६ बोटी एकमेकांवर आदळल्यामुळे मोठ्या नुकसान झाला आहे. सकाळपासूनच तलाठ्यांमार्फत पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

सुनील कोळी, तहसीलदार डहाणू.