धोकादायक पद्धतीने कचरा वाहतूक

कचरा संकलित केल्यानंतर या वाहनातून दुर्गंधीयुक्त द्रव व सांडपाणी रस्त्यावर सांडत आहे.

पालघर नगर परिषदेमध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर; दुर्गंधीने नागरिक त्रस्त

पालघर : पालघर शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न गंभीर असताना कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराच्या वाहनांमधून धोकादायक पद्धतीने कचरा वाहतूक केली जात आहे. कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची मुदत उलटून गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कचरा वाहतूक धोकादायक असल्याचे आरोप केले जात आहेत.

पालघर नगर परिषद हद्दीमध्ये निघणारा ओला-सुका कचरा लहान वाहनांमधून सकाळच्या सुमारास गृहसंकुलातील गृहनिर्माण संस्थांकडून संकलित केला जातो. त्यानंतर शहरातील सार्वजनिक ठिकाणी गोळा केलेला कचरा, हॉटेल्स, रेस्टॉरंट, खाटीक व्यावसायिकांकडील जैविक कचरा व इतर दुकाने, आस्थापना यांच्यासाठी कचरा संकलित करणारे मोठे वाहन (उघडा ट्रक) ठेवण्यात आले आहे. हे वाहन सकाळी व संध्याकाळच्या सुमारास संपूर्ण शहरात फिरून शहरातील द्रवरूप ओला व इतर सुका कचरा एकत्रित संकलित करत आहे. कचरा संकलित केल्यानंतर या वाहनातून दुर्गंधीयुक्त द्रव व सांडपाणी रस्त्यावर सांडत आहे. यामुळे ज्या ठिकाणी हे घाणेरडे दुर्गंधीयुक्त पाणी सांडले जाते तेथे मोठय़ा प्रमाणात दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिक, दुकानदार त्रस्त झाले आहेत.

कोटय़वधी रुपये खर्च करून कचरा संकलनासाठी नगर परिषद ठेकेदार नेमत असताना ठेकेदारामार्फत धोकादायक पद्धतीने कचरा वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. अनेक वेळेला जुने झालेले व मुदतबाह्य असलेले हे वाहन नादुरुस्त होऊन वाहतूक कोंडी झाल्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. नगरसेवकांसह प्रशासनाला ही बाब माहिती असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. ओला-सुका कचरा वर्गीकरण करून तो वाहतूक करताना सुरक्षितरीत्या वाहतूक करणे नियमावलीत आहे. मात्र कचरा वाहतुकीच्या नियमावलीला बगल दिली जात आहे. अशा धोकादायक पद्धतीच्या वाहतुकीला नगर परिषद प्रशासन अभय देत असल्याचा आरोप केला जात आहे.

ठेकेदाराला वारंवार तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर त्याला नोटीस बजावण्यासही सांगण्यात आले आहे. आता राबवत असलेल्या नवीन निविदा प्रक्रियेमध्ये कचरा व्यवस्थापनाचे काम चांगले व व्यवस्थित होईल असा प्रयत्न आहे व त्याची पुरेपूर अंमलबजावणी होईल असा विश्वास आहे.

– अक्षय संखे, सभापती, आरोग्य समिती, पालघर नगर परिषद

कोटय़वधीचे कचरा संकलनाचे काम दिलेला ठेकेदार काय करीत आहे, याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होते. धोकादायक कचरा वाहतुकीबाबत निष्काळजीपणा केला जात आहे. हे तातडीने थांबले पाहिजे.

– भावानंद संखे, विरोधी पक्षनेता, पालघर नगर परिषद

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Garbage issue is serious in palghar municipal council zws

Next Story
शासकीय निधीची उधळपट्टी?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी