पालघर : आषाढ अमावास्येच्या निमित्ताने साजरी होणारी गटारी येत्या गुरुवारी (ता २४) रोजी साजरी होत असली तरीही आज रविवार व बुधवारी (ता २३) रोजी या निमित्ताने मांसाहारी विशेष बेत आखले जात आहेत. पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारी बंदी चा कालावधी ३१ जुलै पर्यंत असल्याने खवय्यांना परराज्यातील माशांवर अवलंबून राहावे लागत आहे. माशांचे दर सरासरी ३० ते ४० टक्क्यांनी वाढले असले तरीही माशांना मोठ्या प्रमाणात मागणी असून खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे दिसून येत आहे.
पश्चिम किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलै या दरम्यानच्या ६१ दिवसांची मासेमारी बंदी असून मासेमारी बंदी उठण्यापूर्वी गटारी अमावास्या येत असल्याने खवय्याना परराज्यातील माशांवर अवलंबून राहावे लागते. देशाच्या पूर्व किनारपट्टीवर १५ एप्रिल ते १५ जून दरम्यान मासेमारी बंदी कालावधी असल्याने त्या पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश व ओडीसा राज्यातून उपलब्ध होणारे मासे मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट येथे आणले जाऊन नंतर ठीक ठिकाणी त्याची वितरण होत आहे. यामुळे वाहतूक खर्च वाढत असल्याने त्याचा परिणाम माशांच्या दरावर झाल्याचे दिसून आले आहे.
श्रावण महिना शुक्रवारपासून सुरू होत असल्याने उपवास पाळणाऱ्या मंडळी बाजारात मिळणाऱ्या माशांचा आस्वाद घेण्यासाठी एकच गर्दी केल्याचे सर्वच प्रमुख बाजारांमध्ये दिसून येत आहे. तळ कोकणामधील काही बोटी मासेमारीसाठी गेल्याच्या बातम्या समाज माध्यमांवर काही दिवसांपूर्वी प्रसारित झाले होते. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर मिळणाऱ्या बोंबील (बॉम्बे डक) हा मासा देखील बाजारपेठेत उपलब्ध झाल्याचे चित्र आहे.
माशांच्या दरामध्ये उसळी
खवय्यांचा आवडता व राज्य माशाचा दर्जा प्राप्त झालेला ५०० ग्रॅम पेक्षा अधिक वजनाचा सुपर पापलेट सध्या स्थानिक बाजारपेठेत २२०० रुपये किलो पेक्षा अधिक दराने विकला जात असून सुमारे २५० – ३०० ग्राम चा पापलेट मासा १३०० – १४०० रुपये किलो या दराने उपलब्ध आहे. सरासरी दरापेक्षा हे दर ३०० ते ४०० रुपयाने महाग असल्याचे विक्रेत्यांची म्हणणे आहे.
या बरोबरीने अख्खा घोळ मासा १००० रुपये किलो, अख्खा दाडा मासा ११०० ते १२०० रुपये किलो तर तुकडे केलेला दाडा मासा १६०० ते १७०० रुपये किलो या दराने विकला जात आहे. सुरमई माशाची आवक कमी असून मोठ्या आकाराची सुरमई ९०० रुपये किलो दराने विकली जात आहे. तर २५ ते ३० नग प्रति किलो असणारी कोलंबी सध्या ६०० ते ७०० प्रति किलो दराने विकली जात आहे. सर्वसामान्य खवय्यांचा आवडता बोंबील माशाचे आठ ते नऊ नग १५० ते २०० रुपयाने विकले जात असून गटारी पूर्वीच्या दिवसात माशांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून येत आहे.
राज्यात ३१ जुलै पर्यंत मासेमारी बंदी कालावधी असून १ ऑगस्ट रोजी मासेमारी बोटीला परवाने देण्यात येणार आहेत. तत्पूर्वी वसई- उत्तन येथील दोन, अर्नाळा येथील एक व नवी मुंबई बेलापूर येथील पाच मासेमारी बोटीने मासेमारी बंदी कालावधीत समुद्रात मासेमारी केल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. सध्या बाजारपेठेत उपलब्ध होणारे मासे हे पर राज्यातील असून त्या मध्ये राज्यातील माशांचा समावेश नाही. – दिनेश पाटील, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभाग, पालघर – ठाणे.