पालघर :  ‘सर्वांसाठी घर’ या शासनाच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाकडे पालघर जिल्हा वेगाने वाटचाल करत आहे. जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने ३० आणि ३१ जुलै रोजी जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या ‘घरकुल लाभार्थी संवाद अभियान टप्पा-२’ ला लाभार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या अभियानमुळे केवळ प्रशासकीय भेट न राहता लाभार्थी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील विश्वासाचा पूल बांधण्याचे काम करत आहे, ज्यामुळे घरकुल प्रगतीला नवे बळ मिळत आहे.

घरकुल लाभार्थ्यांचे विश्वासार्ह मार्गदर्शन करणे, त्यांच्या मनात सकारात्मकता निर्माण करणे आणि घरकुलांची कामे विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी त्यांचे मनोबल वाढवणे या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रत्यक्ष सहभागासह हे अभियान जिल्हाभरात प्रभावीपणे राबवले जात आहे. ३० जुलै मनोज रानडे यांनी नंडोरे ग्रामपंचायतीतील काही घरकुलांची पाहणी करून लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ. रूपाली सातपुते, पालघरचे गटविकास अधिकारी राहुल काळभोर, सहाय्यक गटविकास अधिकारी बापुराव नाळे, नंडोरेचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

प्रत्येक लाभार्थ्याचा अनुभव समजून घेत, मोकळ्या वातावरणात त्यांच्या अडचणी, आर्थिक टप्पे व इतर अडथळ्यांविषयी माहिती घेतली. यावेळी लाभार्थ्यांचे सर्व मुद्दे ऐकून घेत, तात्काळ उपाय सुचवले आणि शासनाच्या वतीने आवश्यक सहकार्य दिले जाईल याची खात्री मनोज रानडे यांनी दिली. तसेच हे केवळ घर नाही, तर तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठीची पायाभरणी आहे. शासन तुमच्यासोबत खंबीरपणे उभं आहे, तुम्ही केवळ प्रामाणिकपणे पूर्णत्वाकडे वाटचाल करा, असे प्रोत्साहन लाभार्थ्यांना दिले.

प्रशासनाने लाभार्थ्यांच्या दारापर्यंत जाऊन साधलेला हा संवाद पालघर जिल्ह्याच्या ‘घरकुल’ निर्मिती प्रगतीला निश्चितच गती देईल आणि ‘सर्वांसाठी घर’ हे स्वप्न लवकरच साकार होईल अशी आशा जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

अभियानाचे स्वरूप आणि व्याप्ती:

या अभियानांतर्गत पालघर जिल्ह्यात सध्या छतस्तर पर्यंत बांधकाम पूर्ण झालेल्या तब्बल २९,१०४ घरकुल लाभार्थ्यांना भेटी देण्यात येत आहेत. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (टप्पा १ व २) अंतर्गत २४,०८२ घरकुले, प्रधानमंत्री जनमन अंतर्गत ४०७८ घरकुले, तर रमाई आवास योजना ५८, शबरी आवास योजना ७९२, आदिम आवास योजना ८ आणि मोदी आवास योजना ८६ अशा एकूण ९४४ घरकुलांची राज्य पुरस्कृत योजनांमध्ये नोंद आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बारा हजार लाभार्थ्यांच्या भेटी

या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा परिषद स्तरावरील सर्व वर्ग १ व वर्ग २ अधिकारी, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग असून लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांना प्रेरणा देण्याचा व त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. या भेटीदरम्यान गुगल लिंकमधील फॉर्म भरणे व लाभार्थ्यासोबत ‘सेल्फी’ घेणे बंधनकारक असून त्याद्वारे दस्तऐवजीकरण व मूल्यांकन प्रक्रिया सुलभ केली जात आहे. ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचाऱ्यांनी १२,००० लाभार्थ्यांच्या भेटी घेतल्याची गुगल शीटवर नोंद झाली आहे.

जिल्ह्याचे घरकुल योजनेत राज्यस्तरीय यश

पालघर जिल्ह्याने घरकुल योजनेत राज्यस्तरीय यश संपादन केले आहे. जिल्ह्याने प्रथम हप्ता वितरणात राज्यात तृतीय, द्वितीय हप्ता वितरणात राज्यात प्रथम, तर घरकुल मंजुरीमध्येही राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.