पालघर: पालघरच्या जिल्हा नियोजन बैठकीसाठी नवी मुंबई येथून निघालेले पालकमंत्री गणेश नाईक हे वर्सोवा ते खानिवडा टोलनाका दरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडल्यानंतर अशा प्रकारची वाहतूक कोंडी उद्भवणार नाही याकरिता जिल्हा प्रशासनाने तसेच पोलिस यंत्रणेने कायमस्वरूपी उपाययोजना आखण्याचे सूचित केले. तुफान वाहतूक कोंडी दरम्यान ज्येष्ठ नागरिक व महिलांची होणारी गैरसोय पाहता या पट्ट्यात मोबाईल टॉयलेट तातडीने उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
नवी मुंबई येथून पालघर पर्यंतचा प्रवास करताना पालकमंत्री महामार्गावरील वसई तालुक्यातील तुफान वाहतूक कोंडीमध्ये सापडल्याने जिल्हा नियोजन समितीची बैठक तब्बल अडीच तास उशिराने सुरू झाली. या बैठकीत त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर कारणांची अधिकारी वर्गाकडून माहिती घेतली. गायमुख परिसरात घेतलेल्या ब्लॉकमुळे अवजड वाहन रस्त्याच्या एका बाजूला उभी करण्याऐवजी अशी वाहने मधोमध उभी झाल्याने दुतर्फा वाहतूक कोंडी झाल्याचे सांगत हा ब्लॉक काल रात्री संपल्याने परिस्थिती पूर्ववत होईल असे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र या अवजड वाहनांमुळे पालघर l, वसई तालुक्यातील वाहनांना फटका बसत असून अवजड वाहनांच्या वर्दळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळेचे निर्बंध ठेवावे अशी मागणी आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी या बैठकीत केली. आमदार राजेंद्र गावित यांनी महामार्ग पोलिसांकडून वाहतूक नियंत्रण होत असल्याचे दोषारोप केले.
याविषयी अधिकारी वर्गाला सूचना देताना या वाहतूक कोंडीला आपण सर्व दोषी असल्याचे सांगत नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी अशा सूचना दिल्या. वाहतूक कोंडी हे एका दिवसाचे रडगाणे नसून नागरिकांची नाराजी वाढणार नाही, त्यांच्याकडून उद्रेक होणार नाही यासंदर्भात काळजी घेणे व सतर्क राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रबोधन केले. महामार्गावरील व गायमुख रस्त्यावरील मेगाब्लॉकमुळे वाहतूक कोंडी होत असली तरी नव्याने उभारलेल्या काँक्रीट रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांची गति मंदावून प्रामुख्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे म्हणाले.
राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरणाच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून रस्ता अपेक्षित दर्जाचा होत नाही तोपर्यंत त्याचे हस्तांतरण करून घेण्यात येऊ नये अशा सूचना आपण जिल्हा प्रशासनाला दिल्याचे पालकमंत्री यांनी पत्रकारांना नंतर सांगितले. विविध शासकीय विभागांमधील समन्वयाचा अभाव, काँक्रीटीकरणाचे काम करताना व्यवस्थापन पद्धती मधील त्रुटी व चुकांमुळे (गैरव्यवस्थापन) मुळे वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असून संबंधित शासकीय घटकांमध्ये सुसंवाद प्रस्थापित होईल यासाठी प्रयत्न करायला हवेत अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.
याविषयी माहिती देताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी १२१ किलोमीटर लांबीच्या काँक्रिटीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सातीवली येथील उड्डाणपूल कार्यरत होणार असल्याची माहिती दिली. ज्या ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत त्या अशा ठिकाणी इपॉक्सी रेझीन चे आवरण देण्यात आले असून उर्वरित ठिकाणी मायक्रोसर्फेसिंगचे काम दिवाळीनंतर हाती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
ऐपती इतकेच काम करावे
पालघर जिल्ह्यात आदिवासी उपाययोजना व सर्वसाधारण विकास निधी मधून सुमारे ४८ कोटी रुपयांची देयके संबंधित ठेकेदारांना देण्याचे बाकी असल्याकडे लक्ष वेधत जिल्ह्यात उधारीवर काम करण्याच्या पद्धतीमुळे दर्जा राखला जात नाही अशी टिपणी पालकमंत्री गणेश नाईक यांनी केली. रस्त्यांच्या ठेकेदारांची प्रलंबित देयके अदा केल्यानंतरच नवीन कामाला प्रशासकीय मान्यता देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट करत अशा पद्धतीने उर्वरित विकास कामांच्या प्रशासकीय मान्यता व निविदा कार्यक्रम काढण्यासंदर्भात दक्षता घेण्याचे त्यांनी सूचित केले.
जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती मधील अंतर्गत रस्ते व पायाभूत सुविधांचा स्तर उंचावण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून तरतूद करावी अशी मागणी उद्योजकांकडून आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले. या व इतर विकास कामांना मंजुरी देण्यासाठी आवश्यक प्रस्ताव करून आपल्याकडे पाठवण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. जिल्ह्यातील विविध देवस्थानांना शासकीय निकषांच्या अनुसार त्यांचे तीर्थक्षेत्र वर्गीकरण करण्याचे देखील या बैठकीत निश्चित करण्यात आले. अवकाळी व मुसळधार पावसामुळे वेळोवेळी झालेल्या नुकसानीची मदत दिवाळीपूर्वी देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून बाधित शेतकऱ्यांच्या ईकेवायसी बाबत दैनंदिन पाठपुरावा घेतला जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
लोकप्रतिनिधी यांचे बहिष्काराचे अस्त्र ?
आपल्याला जिल्हा नियोजन विकास निधीचा पुरेशा प्रमाणात लाभ मिळत नसल्याचे सांगून आमदार हरिश्चंद्र भोये, दौलत दरोडा, शांताराम मोरे व विनोद निकोले यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बहिष्कार टाकण्याचे अस्त्र उभारले होते. त्यांची समजूत काढून या बैठकीत सर्व लोकप्रतिनिधीला प्रत्येकी किमान पाच कोटी रुपये देण्याचे जाहीर करत मोठे मतदारसंघ असणाऱ्या आमदार विनोद निकोले व आमदार हरिश्चंद्र भोये यांना अतिरिक्त निधी देण्याचे पालकमंत्री यांनी आश्वासित केले.
सुरंगी नंतर सप्तरंग फुलझाडे
पालघर जिल्ह्यात फुल शेतीमध्ये यापूर्वी मोगरा व चाफा च्या लागवडीकडे भर दिला जात असताना पालकमंत्री यांनी जिल्ह्याची धुरा सांभाळल्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरंगी या सुगंधी फुलांच्या झाडांच्या लागवडीवर भर दिला होता. राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा सुशोभीकरण करताना सप्तरंगांच्या फुल झाडांची लागवड करण्याच्या त्यांनी सूचना करत आगामी काळात महामार्गाचे रुंदीकरण व विस्तारीकरण ध्यानी ठेवून अशा झाडांची लागवड करावी असे त्यांनी वनविभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सूचित केले. तसेच दुभाजकांच्या ठिकाणी असणाऱ्या सुशोभीकरणाच्या झाडांचा दर्जा वाढवून त्यांना पाणी देण्यासाठी ड्रीप पद्धत अमलात आणावे असेही त्यांनी सांगितले.
पोलीस वाहनांसाठी निधी
पालघर पोलिसांचा वाहन खरेदीसाठी २.०८ कोटी रुपये मंजूर झाले असून वायरलेस यंत्रणेसाठी एक कोटी रुपये, पोलीस चौकी सुधारण्यासाठी सव्वा कोटी रुपये निधीची आवश्यकता असून अतिरिक्त गस्ती व पायाभूत सुविधांसाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली. शिवाय दरवर्षी जिल्ह्यातील किमान एका पोलीस स्टेशनचे नूतनीकरण करण्यात यावे अशी विनंती त्यांनी केली.