पालघर : राज्यातील शिक्षण पद्धतीचे बळकटीकरण करण्यासाठी स्टार्स कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणीच्या वेळापत्रकात पालघर जिल्ह्यासाठी बदल करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले असून याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे करण्यात आला आहे. नारळी पौर्णिमेनिमित्त ८ ऑगस्ट रोजी स्थानिक सुट्टी जाहीर झाल्याने त्या दिवशी होणारी इंग्रजी विषयाची परीक्षा आता ११ ऑगस्ट रोजी घेण्याचे प्रस्तावित आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ६ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या काळात दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा, गणित आणि इंग्रजी विषयांची पायाभूत मूल्यमापन चाचणी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ६ ऑगस्ट रोजी मराठी, ७ ऑगस्ट रोजी गणित व ८ ऑगस्ट रोजी इंग्रजीचा पेपर होणार होता. या पायाभूत चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीचे मूल्यांकन केले जाते. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीचा योग्य स्तर निश्चित करण्यासाठी ही चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे. पालघर जिल्ह्यात २१२० जिल्हा परिषद शाळा व सुमारे १५० अनुदानित शाळांमधील तीन लाख पेक्षा अधिक विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होणे अपेक्षित आहेत.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), पालघरचे प्राचार्य संभाजी भोजने यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला पत्र पाठवून या अडचणीकडे लक्ष वेधले असून ठाणे व रायगड जिल्ह्यांनी केलेल्या मागणी प्रमाणे परीक्षा पुढे ढकलण्याची अनुमती मागितली आहे. ८ ऑगस्टला नारळी पौर्णिमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी यांनी सुट्टी जाहीर केली आहे. तर ९ ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने शिक्षण विभागाने शाळांना सुट्टी दिली आहे. या अनुषंगाने ८ ऑगस्ट रोजीची परीक्षा ११ ऑगस्टला घेणे सोयीस्कर होईल असे या विनंती पत्रामध्ये नमूद करण्यात आले होते. पालघर जिल्हा प्रशासनाने ८ ऑगस्टची परीक्षा ११ ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णयांच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन व जिल्हा प्रशासनाने सुटटी जाहीर केली आहे. हा बदल शिक्षण संचालक कार्यालयाने स्वीकारल्यास पालघर जिल्ह्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांना नियोजनात मदत होणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याच्या प्रस्तावाला अनुमती मिळाल्यास पालघर जिल्ह्यातील अधिकतर शाळा शुक्रवार व शनिवारी बंद राहू शकतील.