जिल्हा परिषदेच्या आरोग्य तपासणी शिबिरात १८ हजार मजुरांची तपासणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर: पालघर जिल्ह्यात  रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांसाठी महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी आरोग्य शिबीर घेण्यात येते.  मात्र करोनामुळे या शिबिरांमध्ये खंड पडला होता. करोनाचा प्रादुर्भाव ओसरत चालल्यामुळे पुन्हा या शिबिरांना सुरुवात करण्यात आली आहे.  त्यानुसार गुरुवार, १६ डिसेंबर रोजी पार पडलेल्या शिबिरात १८ हजार मजुरांची तसेच त्यांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ७०४ जण आजारी असल्याचे आढळून आले आहे. 

सन २०२० मध्ये करोना पूर्वकाळात दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी स्थलांतरितांच्या ठिकाणी आरोग्य शिबीर घेण्याचे जिल्हा परिषदेने आयोजन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद लाभला होता. नोव्हेंबर २०२१ पासून जिल्हा परिषदेने त्याच धर्तीवर स्थलांतरित कुटुंबीयांच्या आरोग्य तपासणीची मोहीम हाती घेतली आहे, परंतु करोनामुळे स्थलांतराचे प्रमाण कमी असल्याने या शिबिराला मर्यादित प्रतिसाद लाभला.

या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याशी संपर्क साधला असता गेल्यावर्षी स्थलांतरित कुटुंबीयांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरामुळे कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण नियंत्रणात राहिले होते. त्याच दृष्टीने हे आरोग्य शिबीर पुन्हा आयोजन करण्याचे सुरू केले असून वेळेत उपचार मिळाल्याने स्थलांतरित कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. स्थलांतरित लहान मुलांना जवळच्या बालवाडीमधून मध्यान्ह भोजन देण्याची व्यवस्थादेखील करण्यात आल्याचे त्यांनी  सांगितले.

३०२ वीटभट्टय़ांवर आरोग्य तपासणी

जिल्ह्यात १६ डिसेंबर रोजी सर्व ठिकाणी राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत एकंदर ३०२ वीटभट्टय़ांवर आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीत १८ हजारपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सहा वर्षांपर्यंत २७७३ बालके, किशोरवयीन १११८,  गरोदर माता २३७, स्तनदा माता २९८ व इतर ९८४२ नागरिकांचा समावेश आहे.  तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांपैकी ७०४ नागरिकांना वेगवेगळय़ा आजारांची लागण झाल्याचे दिसून आले असून त्यामध्ये वाडा तालुक्यातील ४०५, विक्रमगड तालुक्यातील ११५, वसई तालुक्यातील ९३ तर पालघर तालुक्यातील ७६ नागरिकांचा समावेश आहे. या नागरिकांना जवळच्या प्राथमिक उपचार केंद्रामधून उपचार देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health hospital sick migrants ysh
First published on: 25-12-2021 at 00:08 IST