डहाणू : पालघर जिल्ह्यात सोमवार पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावली. दुपापर्यंत पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे बळीराजा सुखावला असून परंतु आरोग्याची चिंता वाढली आहे. वातावरणातील बदलामुळे अनेक भागात दवाखान्यात सर्दी, ताप खोकल्याचे रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येते आहे. आरोग्य विभागाकडून त्यासाठी दक्षता घेतली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९ जूनपर्यंत पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. पालघरसह डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वसई आदी तालुक्यातील शेतकरी पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून होते. सोमवारी दमदार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात शेतीच्या कामाला पुरेसा पाऊस पडल्याने खोळंबली शेतीची कामे पूर्वपदावर आली आहेत. सखल भागात पाणीच पाणी झाल्याने रस्ते आणि रेल्वे मार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. तर अचानकपणे पावसाने जोर धरल्याने जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवला.

पावसामुळे अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला होता. सोमवार कामाच्या दिवशी खंडित विजेचा फटका अनेक व्यावसायिकांना बसला.त्यामुळे अधिकारी व लाईनमन यांच्याकडून काही भागात दुरुस्तीचे काम सुरू होते.डहाणू परिसरातही दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच असल्याने नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. दुपारी समुद्राला भरती आल्याने डहाणूची कंक्राटी नदी आणि खाडीच्या पाण्याची पातळी वाढली होती. जोरदार पडलेल्या पावसामुळे धरणातील साठय़ातही वाढ झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धामणी, साखरे, तसेच इतर धरण पूर्ण क्षमतेने नक्कीच भरेल, अशी आशा आहे.

दिवसभरच्या पावसाचा जोर पाहता मुसळधार सावधानता म्हणून काही भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना लवकर सोडण्यात आले. वातावरणातील बदलामुळे अनेक भागात दवाखान्यात सर्दी, ताप खोकल्याचे रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येते आरोग्य विभागाकडून त्यासाठी दक्षतेचा उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्यसेवक, आरोग्य कर्मचारी आणि प्राथमिक उपचार केंद्र, उपजिल्हा रुग्णालयाकडून दिल्या जात आहेत.

जनजीवन विस्कळीत
मुसळधार पावसाचा मोठा फटका पश्चिाम रेल्वेला बसला. पश्चिाम उपनगरीय रेल्वे वाहतूकही काहीशी संथगतीने सुरू होती. शहरातील मोठे रस्तेही पाण्याखाली गेल्याने त्यांचा मोठा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला होता. काही ठिकाणी वाहतुकीचे मार्ग बदलले होते. दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहतूक खोळंबली होती. अनेक ठिकाणी झाडे पडून किरकोळ दुर्घटनाही घडल्या आहेत.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rains in the district baliraja was relieved but worried about illness amy
First published on: 21-06-2022 at 00:01 IST