बोईसर : उत्पादन प्रक्रिया सुरू असताना रसायन बाहेर फेकल्याने कामगारांना बाधा होऊन जीवितास धोका निर्माण केल्या प्रकरणी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखाना व्यवस्थापनाविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक डी – २/३ वरील कॅम्लीन फाईन सायन्स लिमिटेड या रासायनिक कारखान्यात रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास डाय मिथाईल सल्फेट नावाचे रसायन चौथ्या क्रमांकाच्या प्लांट मधून १० व्या क्रमांकाच्या प्लांटमध्ये हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रक्रियेदरम्यान प्लांट चे झाकण बंद करण्यास उशीर झाल्याने डाय मिथाईल सल्फेट हे रसायन बाहेर येऊन जमिनीवर पडून त्याचा हवेशी संपर्क झाला. यामुळे त्या ठिकाणी उपस्थित दहा कामगारांना बाधा होऊन डोळ्यांना त्रास होऊ लागल्याने बाधित सर्व कामगारांना उपचारासाठी बोईसर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात दाखल सर्व कामगारांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कॅमलिन फाईन सायन्स कारखान्यातील रसायन बाधा प्रकरणी बोईसर पोलीस आणि औद्योगिक व आरोग्य संचालनालयाचे अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी करून घटना नेमकी कशी घडली याची माहिती घेतली. तसेच बाधित कामगार यांची विचारपूस करून त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.
कामगारांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी कॅमलीन फाईन सायन्स कारखान्याच्या व्यवस्थापना विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी औद्योगिक व आरोग्य संचालनालय देखील आपला अहवाल सादर करणार आहे.