डहाणू : डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर शनिवार १६ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे दरड कोसळून सात दुकानांपैकी चार दुकाने दरीत कोसळली असून इतरांवर दगडी पडल्यामुळे नुकसान झालं आहे. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
महालक्ष्मी गडाच्या सुळक्यावरून मंदिर परिसरातील दुकानांवर दरड कोसळली असून दरडी सह चार दुकाने दरीत कोसळली आहेत. तसेच या घटनेमुळे मंदिरात जाणार अरुंद रस्त्यावर देखील परिणाम झाला आहे. सुदैवाने पावसामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांची वर्दळ कमी असल्यामुळे मोठी हानी टळली आहे. महालक्ष्मी सुळक्यावरून छोट्या मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याचे प्रकार काही वर्षांपासून सुरू असून २०२२ साली गडावर अश्याच प्रकारची मोठी दरड कोसळली असून यामध्ये तीन दुकानांचे नुकसान झाले होते.
महालक्ष्मी गडावर मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असून पावसाळ्यास विशेष सणासुदीच्या दिवशी आणि सुट्ट्यांच्या दिवशी भाविकांची गर्दी होते. अश्यात दरड कोसळल्यास मोठी घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. गडावर सातत्याने घडणाऱ्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महालक्ष्मी गडाच्या सुळक्यावर संरक्षण जाळी लावण्याची गरज व्यक्त होत आहे.
भाविकांना विनंती करण्यात येते की, महालक्ष्मी मंदिर गड येथे दरड कोसळली आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी व पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटक प्रेमींनी काही दिवस गडावर जाण्यासाठी टाळावे. पाऊस कमी झाल्यावर गडावर आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. – किरण पवार, पोलीस निरीक्षक, डहाणू पोलिस ठाणे</strong>