बोईसर : रेल्वे रुळालगत रील बनवणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अवैधपणे पैशांची वसुली करणाऱ्या रेल्वे पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्यात येऊन पुढील कारवाई केली जाणार आहे. सोमवारी बोईसरच्या अवधनगर परिसरातील १६ ते १८ वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थी बोईसर स्थानकाजवळील रेल्वे रुळालगत मोबाईल मधून रील बनवत होते. यावेळी बोईसर रेल्वे स्थानकात कार्यरत रेल्वे पोलीस दलातील देवेंद्र कुमार, अरविंद सिंग आणि देवेंदर सिंग या तीन कर्मचाऱ्यांनी रिल बनवणाऱ्या तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन रुळालगत विनापरवानगी रील बनवण्याचे कारण देत कारवाई करायची नसेल तर पाच हजार रुपयांची मागणी केली. मात्र विद्यार्थ्यांकडे इतके पैसे नसल्याने त्यांना जवळपास तीन ते चार तास थांबवून ठेवण्यात आले. हेही वाचा : पालघर: पाऊस सर्वत्र मात्र अतिवृष्टी विक्रमगड विधानसभा क्षेत्रातच ! अखेर रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये दिल्यानंतर विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली. यातील एका विद्यार्थ्याने पैसे देतानाची चित्रफित आपल्या आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केली होती. विद्यार्थ्यांकडून रेल्वे पोलिसांनी पैसे घेतानाची चित्रफित समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली. या प्रकरणाची रेल्वे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत तिन्ही कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली असून चौकशीनंतर त्यांच्यावर आवश्यक कारवाई केली जाणार आहे.