पालघर : जिल्ह्यात रविवार पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाने दिवसभरात रिमझिम व काही ठिकाणी मुसळधार सरी सुरू राहिल्याने जिल्ह्यातील शेतकरी तसेच वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. या पावसामुळे लग्नसराईमध्ये अनेक ठिकाणी खोळंबा व गैरसोय निर्माण झाली असून या पावसामुळे शेतकरी, गवत, पावळीचे व्यापारी, मच्छीमार आणि विट उत्पादक यांचे नुकसान झाले.

भारतीय हवामान विभागाने २६ आणि २७ नोव्हेंबर असे दोन दिवस पालघर जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. रविवारी पहाटे पासून विजांच्या गडगडाटासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा शिडकावा सुरु झाला. बहुतांश ठिकाणी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिला तर रात्री अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याची माहिती पुढे आली आहे.

हेही वाचा : “वाडा कोलम”चे विक्रमी उत्पादन, ४२ हजार टन वाडा कोलमचे उत्पादन झाले

सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी २३.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून वसई तालुक्यात ३८.६ मिलिमीटर, वाडा तालुक्यात ३१ मिलिमीटर, मोखाडा तालुक्यात ३०.१ मिलीमीटर, विक्रमगड तालुक्यात २५.७ मिलिमीटर, जव्हार तालुक्यात १५.३ मिलीमीटर, डहाणू तालुक्यात १३.७ मिलिमीटर, पालघर तालुक्यात १३.३ मिलीमीटर तर तलासरी तालुक्यात ११.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज दुपारपर्यंत काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरु राहिला होता, तर काही ठिकाणी सुर्प्रकाश आल्याने नागरिक सुखावले.

शेतकऱ्यांचे नुकसान

ढगाळ वातावरणासोबत सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे बागायतदारांसह भात शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाताची कापडी जवळपास पूर्ण झाली असून काही ठिकाणी जोडणी, मळणी सुरु असून अशा ठिकाणी शेतकऱ्यांना धान्य सुरक्षित ठिकाणी तातडीने हलवावे लागले. तर कापणी करून ठेवलेले भाताच्या उडव्यांमध्ये पाणी शिरू नये तसेच दाण्याला बुरशी येऊ नये म्हणून अशा उडव्यांवर प्लास्टिक, ताडपत्री अंथरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली. अवकाळी पावसामुळे भाजीपाला उत्पादनावर बुरशीजन्य रोग पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून झाडावर तयार व परिपक्व होत असलेल्या चिकू फळाला देखील मोठ्या प्रमाणात फटका बसले असे अंदाजित करण्यात येत आहे. या पावसाचा आंब्याच्या मोहोरावर देखील विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून शेतकरी वर्ग धास्तावला आहे.

हेही वाचा : पालघर, डहाणू तालुक्यात पावसाचा तडाखा; शेतकरी, गवत पावळीचे व्यापारी आणि विट उत्पादक धास्तावले

इतर व्यवसायिक, व्यापारी यांचे नुकसान

भाताची पावली कापून त्याची खरेदी विक्री सुरू असून उघड्यावर साठवून ठेवण्यात आलेल्या पावली व गवत व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वीट भट्ट्या उभारण्याचे काम सुरू असून या विटा भाजण्यापूर्वीच पावसाचा प्रभाव झाल्याने वीट उत्पादकांचे नुकसान झाले आहे. उगडयावर मासळी सुकत ठेवलेल्या मच्छिमारांची मासळी कुजण्याची परिस्थिती निर्माण झाली असून समुद्रात वादळी वातावरण निर्माण होईल या शक्यतेने अनेक बोटींनी किनाऱ्यावर येणाचे पसंद केल्याचे सांगण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लग्नसराईमध्ये पावसाचा अडथळा

आज लग्नाच्या मुहूर्त असून लग्नाच्या पूर्वसंध्येला आयोजित हळदी समारंभावर पावसाचे सावट पसरल्याने आयोजकांची तारांबळ उडाली. त्यामुळे नियोजित मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करावे लागले. हळदीच्या कार्यक्रमाला येणाऱ्या निमंत्रितांना साचलेल्या पाणी व निर्माण झालेल्या चिखलमय परिस्थितीतून मार्ग काढावा लागली.