पालघर : सर्वपित्री अमावस्येसारख्या महत्त्वाच्या दिवशीही शिक्षणाचे महत्त्व ओळखून पालघर जिल्ह्यातील सुमारे १९,९३४ नवसाक्षरांनी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा (FLNAT) उत्साहात दिली. यामुळे ‘अडचणींवर मात करून ज्ञान मिळवण्याचा ध्यास’ दिसून आला.

केंद्रशासन पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत २१ सप्टेंबर रोजी आयोजित या परीक्षेसाठी पालघर जिल्ह्यात एकूण २६,४५५ नवसाक्षर प्रविष्ट झाले होते. मात्र सर्वपित्री अमावस्या असल्याने अनेक महिला आणि ज्येष्ठ नागरिक आपल्या धार्मिक आणि कौटुंबिक कामांमध्ये व्यस्त असणार, त्यामुळे परीक्षार्थींची उपस्थिती घटेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती.

या आव्हानाला न जुमानता सुमारे ७५ टक्के परीक्षार्थींनी परीक्षेला उपस्थित राहून शिक्षणाची आपली तळमळ सिद्ध केली. यामध्ये १४०२२ महिला व ५९१२ पुरुषांचा सहभाग होता. तसेच ९ अपंग देखील या परीक्षेत सहभागी झाले होते. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिक ज्यांच्यावर घरकामांची अधिक जबाबदारी असते, त्यांनी परीक्षेला उपस्थित राहून एक सकारात्मक संदेश दिला आहे.

शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी सर्वे करून गावातील साक्षर किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी यांची स्वयंसेवक म्हणून उल्लास ॲपवर नोंदणी केली होती. यातून प्रत्येक स्वयंसेवकाला १५ वर्षांपेक्षा मोठे १० निरक्षर व्यक्ती निवडून देण्यात आले. पायाभूत साक्षरता वाचन, लेखन व संख्याज्ञान विकसित करून जीवन कौशल्य विकसित करण्याची जबाबदारी त्या स्वयंसेवकांवर सोपविण्यात आली. याकरिता प्रत्येक स्वयंसेवकाला वाचन, लेखन व गणित क्रियेसाठी उल्लास ॲपवर चार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. कार्यक्रमाद्वारे उल्लास ॲपवर परीक्षेच्या वेळेपर्यंत आलेल्या परीक्षार्थींना नोंदणी करून परीक्षेला बसविण्यात आले. या परीक्षेचे हे तिसरे वर्ष होते.

जिल्हा पूर्ण साक्षरतेकडे

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे आणि शिक्षणाधिकारी (योजना) शेषराव बडे यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्हा प्रशासन २०२७ अखेर जिल्हा पूर्ण साक्षर करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना प्रतिसाद देत, नवसाक्षरांनी दाखवलेल्या या उत्साहामुळे जिल्ह्याच्या या संकल्पाला आणखी बळ मिळाले आहे. या परीक्षेची तयारी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील घटकांना सोबत घेऊन विशेष मोहिम राबवली होती. या प्रयत्नांना मिळालेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे.

कसे होते परीक्षा केंद्रांवरचे वातावरण

प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सकाळी नऊ वाजता पासूनच नवसाक्षरांनी गर्दी केली होती. यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी व शिक्षक, पर्यवेक्षक उपस्थित होते. परीक्षा केंद्रांवर पुष्प देऊन नवसाक्षरांचे स्वागत करण्यात आले. दिव्यांगांकरिता ३० मिनिटे वाढीव वेळ देण्यात आली होती. तसेच वेळेवर येणाऱ्या नवसाक्षरांची नोंदणी करून त्यांना १० ते पाच या वेळेत येतील त्या वेळेपासून पुढील तीन तास परीक्षेला देण्यात आले होते. नियमांचे काटेकरपणे पालन करून व कोणताही अनुचित प्रकार न घडता परीक्षा यशस्वीरित्या पार पडली.