पालघर जिल्ह्य़ासाठी कृती आराखडा तयार मात्र प्रशासकीय यंत्रणेची तयारी संथगतीने

निखिल मेस्त्री
पालघर : पालघर जिल्ह्यात करोनाची संभाव्य तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये येण्याची दाट शक्यता शासनाच्या आरोग्य विभागामार्फत वर्तवली गेली आहे. असे असतानाही पालघर जिल्ह्य़ात उपचार सेवा-सुविधांची कमतरता जाणवत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारीही संथगतीने सुरू असून लाट आलीच तर जिल्ह्य़ाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीसाठी नियोजन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. तरी जिल्हा प्रशासनाकडून  याची तयारी युद्धपातळीवर नसल्याचे दिसून येत आहे.  जिल्ह्यचा करोना कृती आराखडा तयार केला आहे. परंतु त्यादृष्टीने पालघर जिल्ह्यतील आरोग्य संस्था व त्यातील प्रणाली अजूनही तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी सज्ज नसल्याचे दिसून येत आहे.

पालघर जिल्ह्यत पहिल्या लाटेत सर्वाधिक रुग्णसंख्या सप्टेंबरमध्ये एक हजार ६८२ इतकी होती, तर दुसऱ्या लाटेत मे महिन्यात सात हजार ४८९ इतकी होती. याच महिन्यामध्ये वसई-विरार शहर, पालघर ग्रामीण भागामध्ये १९ हजार २२८ रुग्णांची नोंद झाली होती. या आकडेवारीच्या अनुषंगाने तिसरा लाटेमध्ये एकशेपन्नास टक्क्यांहून अधिक नियोजन करून सज्ज राहण्याचे निर्देश राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यादृष्टीने जिल्ह्यला २८ हजार ८४२ रुग्णांचे नियोजन करणे अपेक्षित आहे. मात्र त्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने पावले टाकलेली नाहीत. तिसऱ्या लाटेच्या कृती आराखडाप्रमाणे पालघर जिल्ह्यत आयसीयू, व्हेंटिलेटर,  खाटा, बालकांसाठी सुविधा अद्याप नाही.  सार्वजनिक रुग्णालये अपुरी पडली तर खासगी रुग्णालयांचा पर्याय सुचविण्यात आला आहे. मात्र खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना उपचार घेण्यासाठी ती अधिग्रहित करण्याचा कोणताही निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला नाही.

पालघर जिल्ह्यत सद्य:स्थितीत ५९ जीवरक्षक प्रणाली (व्हेंटिलेटर) असले तरी त्यातील २२ जिल्ह्य़ाबाहेरील रुग्णालयांना दिल्यामुळे ती यंत्रणा अपुरी पडणार आहे.  तसेच यासाठी लागणारे तज्ज्ञ उपलब्ध नाही. सद्य:स्थितीत उपलब्ध असलेले शासकीय आरोग्य अधिकारी यांनाही  प्रशिक्षण देण्याचे औदार्य प्रशासनाने दाखवलेले नाही. त्यामुळे व्हेंटिलेटर वापरण्यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ग्रामीण रुग्णालय, पालघर टीमा रुग्णालय येथे अजूनही बांधकाम सुरू असल्याने ही रुग्णालये तोवर सुरू होतील का , असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. जिल्ह्यत दुसऱ्या लाटेमध्ये ३१६ मनुष्यबळ उपलब्ध असले तरी तिसऱ्या लाटेत  मनुष्यबळ मोठय़ा प्रमाणात लागणार आहे. त्यातच दुसऱ्या लाटेसाठी नियुक्त आरोग्य अधिकारी-कर्मचारी यांना कमी केले आहे. या आधीच पालघर जिल्ह्यच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये ३० ते ४० टक्केच्या जवळपास पदे रिक्त आहेत.   तिसरा लाटेअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली असल्याचे पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांच्यामार्फत सांगण्यात येत असले तरी त्या दृष्टीने अजूनही जिल्ह्यत तयारी नाही. जिल्ह्यच्या तिन्ही सीमा र्निबधाच्या  बाहेर आहेत. लसीकरणाच्या बाबतीतही पालघर जिल्हा खूप मागे आहे. जिल्ह्यत २० लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट असले तरी आतापर्यंत तीन लाखांच्या जवळपास व्यक्तींना पहिली तर ९० हजारांच्या जवळपास व्यक्तींना दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

प्रकल्प अंमलबजावणी योजनेंतर्गत (प्रोजेक्ट इम्प्लेमेंटेशन प्लॅन) जिल्ह्यला आवश्यक असलेला निधी येथील लोकप्रतिनिधींनी शासनाकडून मागवून घेणे अपेक्षित आहे. दुसऱ्या लाटेतही जिल्ह्यला याच आराखडय़ांतर्गत खूप कमी निधी प्राप्त झाल्यामुळे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची ओढाताण झाल्याचे दिसून आले.

इतर रुग्णांबाबत नियोजन नाही

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करोना कृती आराखडा तयार केला गेला आहे. असे  असले तरी याव्यतिरिक्त सामान्य रुग्ण, गरोदर व स्तनदा माता, माता व बालकांचे लसीकरण, सर्वसामान्य आजारासाठी आरोग्य सुविधा, प्रसूतिकागृह, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार, कुपोषण निर्मूलन कार्यक्रम याबाबतचे कोणतेही शासकीय नियोजन तयार केलेले दिसून येत नाही.

पालकमंत्री संपर्क क्षेत्राबाहेर

तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी याबाबतीत जिल्ह्यचे पालकमंत्री दादा भुसे यांना अनेकवेळा त्यांच्या मोबाइलवर संपर्क केला असता ते संपर्क क्षेत्राबाहेर होते. पालकमंत्री संपर्क क्षेत्राबाहेर तसेच अनेक वेळा प्रतिसाद देत नसल्याचा अनुभव असल्याचे काही पत्रकारांनी सांगितले आहे. राज्याच्या आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांनाही जिल्ह्यतील तिसऱ्या लाटेतील रुग्ण खाटांच्या  नियोजनाबाबत अनेकवेळा संपर्क करून संदेशही पाठविले, मात्र त्यांनीही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा ढिसाळपणा समोर येत आहे.

प्राणवायू, खाटांची टंचाई

पालघर जिल्ह्यत वसई-विरारसह हवेतून प्राणवायूनिर्मितीचे १३ प्रकल्प प्रस्तावित आहेत. यापैकी काही प्रकल्प कार्यान्वित आहेत तर काहींचे काम सुरू आहे. तिसऱ्या लाटेमध्ये संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेता ५३ मेट्रिक टन प्राणवायूची गरज या प्रकल्पांमधून भागवली जाणार असली तरी जिल्ह्यसाठी या लाटेमध्ये १११ मेट्रिक टन द्रव प्राणवायूची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत दहा मेट्रिक टन इतका उपलब्ध आहे. त्यामुळे तिसरा लाटेत या द्रव प्राणवायूची मोठी कमतरता भासणार आहे. तिसऱ्या लाटेत पालघर जिल्ह्यला ६४६ प्राणवायू खाटांची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यमध्ये विविध आरोग्य संस्थांमध्ये निम्मे म्हणजेच ३०७ खाटा उपलब्ध आहेत. जिल्ह्यमध्ये ग्रामीण रुग्णालय पालघर येथे ४५, उपजिल्हा रुग्णालय जव्हार येथे २५,  ग्रामीण रुग्णालय मोखाडा येथे ३० खाटा वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. मनुष्यबळाची याआधीच कमतरता आहे त्यात या खाटा वाढवल्यास रुग्णालयावर अतिरिक्त ताण येणार आहे.

रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता

जिल्ह्यत तिसऱ्या लाटेत दुसऱ्या लाटेच्या कैकपट रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.  ती २८ हजार ८६४ सर्वाधिक रुग्णसंख्या असेल असे म्हटले जाते.  यातील ६५ टक्के रुग्ण उपचारासाठी गावात तयार केलेल्या विलगीकरण कक्षात ठेवणे, तर ३५ टक्के रुग्णांना विविध आरोग्य संस्थेमार्फत  उपचार करणे गरजेचे आहे. मात्र याबाबत  कोणत्याही  हालचालीला अजूनही सुरुवात झालेली नाही.  शासकीय आरोग्य संस्थांमध्येही तयारी नसल्याचे सांगण्यात येते.

राज्यामध्ये करोना स्थिती हाताळण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. पुढेही हेच होणार आहे. पालघर जिल्ह्यकडे सरकारने पूर्ण दुर्लक्ष केल्याने दुसऱ्या लाटेत रुग्ण भडका उडाल्याचे दिसून आले. पुढे आपत्ती उद्भवू नये यासाठी आतातरी शासनाने पालघरकडे लक्ष देऊन समस्या सोडवाव्यात ही अपेक्षा आहे.

– प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

करोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातील वस्तुस्थिती जिल्हा प्रशासनाकडून जाणून घ्यावी लागेल. त्यानंतरच या विषयावर चर्चा करणे रास्त व उचित ठरेल.

– डॉ. संजय चहांदे, अप्पर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग  पालघर जिल्हा