पालघर: पालघर लोकसभा क्षेत्रातील मतदार संख्या २४ लाखांच्या पलीकडे गेली असून विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात सुमारे एक लाख १० हजार मतदारांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यापैकी तरुणांचे प्रमाण ४४ टक्के असून १९ वर्षांपर्यंतच्या मतदारांची संख्या ६० हजारच्या पुढे पोहोचली आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सन २०२३-२४ दरम्यान नव मतदार नोंदवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर तसेच त्यांच्यामार्फत मतदार नोंदणी करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या जागृतीमुळे त्यानंतर देखील पात्र ठरणाऱ्या नव तरुणांनी मतदार नोंदणीचा सपाटा सुरूच ठेवला असून विधानसभा निवडणुकीनंतर सुमारे १४ हजार विद्यार्थी व तरुणांनी मतदार म्हणून नोंदणी केल्याचे दिसून आले आहे.

जिल्हा निवडणूक विभागाने अधिकारी, कर्मचारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत मतदारांची पडताळणी व मतदार यादीचे शुद्धीकरण प्रक्रिया सुरूच ठेवली आहे. यामध्ये विशेष करून घरी मतदान करण्याच्या सुविधेस पात्र असणाऱ्या जेष्ठ नागरिक व मयत मतदारांची संख्या दुरुस्त करण्याकडे लक्ष देण्यात आले. या दरम्यान ७० ते ७९ वयोगटातील मतदार संख्या वाढली असली तरीही ८० पेक्षा अधिक वयोगटातील मतदारांची संख्या ८०० पेक्षा अधिक मतदारानी घटल्याचे दिसून आले आहे.

नवीन मतदार नोंदणी मध्ये १८ ते २९ वयोगटात नोंदवण्यात आलेल्या नवीन मतदारांची संख्या सुमारे ४४ टक्के इतकी आहे. तर नव्याने नोंदवण्यात आलेल्या मतदारांमध्ये ३० ते ३९ वयोगटात २६ टक्के, ४० ते ५९ वयोगटात २९ टक्के नवमतदार समाविष्ट झाल्याचे दिसून आले आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर ऑक्टोबर २०२५ पर्यंत झालेल्या मतदान वाढीत नालासोपारा विधानसभा संघात सुमारे ५० हजार मतदार वाढले असून बोईसर विधानसभा क्षेत्रात २७ हजार मतदार वाढले आहेत. डहाणू विधानसभा क्षेत्रात १० हजार, वसई विधानसभा क्षेत्रात नऊ हजार तसेच विक्रमगड व पालघर मतदार संघात प्रत्येकी साडे सहा हजार मतदार वाढल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यातील तरुण वर्ग हा मतदार नोंदणी प्रक्रियेत हीरहिरीने भाग घेत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी या नव्याने नोंदवण्यात आलेल्या मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल अशी शक्यता आहे.

वर्षभरात १६ हजार नावं वगळली

विधानसभा निवडणुकीसाठी १६ ऑक्टोबर २०२४ रोजी अंतिम झालेल्या मतदार यादीनंतर २९ ऑक्टोबर २०२५ मध्ये सुमारे वर्षभरात नवीन मतदार नोंदणीसाठी दोन लाख २५ हजार २४२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ९१ हजार ७४१ अर्ज नामंजूर केल्यानंतर मतदार यादीत एक लाख ३० हजार ३०७ नाव समाविष्ट करण्यात आली. याच बरोबरीने १६,०२८ मतदारांना वेगवेगळ्या कारणांवरून मतदार यादीतून वगळण्यात आली असून सुमारे ५८ हजार नागरिकांनी आपल्या राहण्याचा पत्ता व इतर तपशील बदल केल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून प्राप्त झाली आहे.

वयोगट निहाय मतदार संख्या दर्शवणारा तक्ता

वयोगट -:विधानसभा २४ – ऑक्टोबर २५

१८-१९  : ४६१९२       : ६०३२९

२०-२९  : ४७३३९२ :    ५१०८५४

३०-३९  : ५३७९०५      : ५६७९९९

४०-४९  : ५०९०९८      : ५२६०५०

५०-५९  : ३७५०३१ :    ३९१७१६

६०-६९ : २१४५०३ : २१६७७९

७०-७९  : ९८८२६       : ९९११५

८०-८९  : ३२१८०       : ३१९७६

९०-९९  : ७१३६ : ६९९८

१००-१०९      : ७९०  : ३२९

१०९ + : ६ : ५