पालघर: पालघर जिल्ह्यामधील मासेमारीचे प्रमाण राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अवघे सात टक्के इतके असून गेल्या काही वर्षांमध्ये माशांच्या उपलब्धतेच्या प्रमाणात लक्षणीय प्रमाणात घट झाली आहे. मासेमारी बंदीचा कालावधी वाढविणे, प्रतिबंधित असणाऱ्या यांत्रिकी पद्धतीने मासेमारीवर आळा घालणे आवश्यक झाले असून ऑगस्ट ते एप्रिल पर्यंत सुरू राहण्याऱ्या मासेमारी हंगामात शाश्वत मासेमारी निरंतर सुरु राहण्यासाठी शासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक झाले आहे.

मासेमारी हंगामाच्या आरंभी सर्वाधिक उत्पन्न देणारा पापलेट (सरंगा) या माशावर लक्ष केंद्रित करण्यात येते. सरासरी ७५० ते ८०० रुपये प्रति किलो असा दर या माशांना त्यांच्या वजनानुसार दिला जातो. पूर्वीच्या काळी पापलेट माशाची मासेमारी दिवाळीपर्यंत व काही प्रसंगी डिसेंबर पर्यंत केली जायची मात्र गेल्या काही वर्षांपासून हंगाम सुरु झाल्यानंतर अवघ्या काही फेऱ्यानंतर पापलेट मासा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील मच्छीमारांना इतर माशांवर अवलंबून राहावे लागत आल्याचे दिसून आले आहे.

सातपाटी येथील मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेमध्ये नोंद झालेल्या पापलेट माशाच्या उत्पन्नाचा आढावा घेतल्यास सन २०११ ते २०१७ वर्ष दरम्यानच्या मासेमारी हंगामात काही अपवाद वगळता दरवर्षी सुमारे १०० टन पेक्षा अधिक पापलेट माशाचे उत्पन्न मिळाल्याचे दिसून येते. मात्र गेल्या पाच वर्षांपासून करोना काळ वगळता पापलेट उत्पन्न अवघ्या ५० टनाच्या जवळपास किंवा त्यापेक्षा कमीवर येऊन ठेपले आहे. पापलेट माशांना त्यांच्या वजनाप्रमाणे दर मिळत असून मोठ्या आकाराच्या मिळणाऱ्या पापलेटची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर पापलेट माशांची आवक कमी झाल्याने मच्छिमारांच्या उतपन्नावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

मासेमारी बंदी कालावधी वाढवण्यासंदर्भात मच्छीमारांची प्रलंबित मागणी असून ट्रॉलर, एलईडी फिशिंग व पर्ससीन नेटद्वारे होणाऱ्या मासेमारी मोठ्या प्रमाणात फटका बसत असून अशा यांत्रिकी पद्धती बंद करून पारंपरिक मासेमारीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी केली जात आहे.

जिल्ह्यात राज्याच्या सहा टक्के मत्स्य उत्पादन

सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात राज्यात ४.३५ लक्ष टन मत्स्य उत्पादनाची नोंद झाली असून त्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये २९ हजार ६९६ टन (६.८४ टक्के) इतका सहभाग राहिला आहे. सन २०२४ – २५ मध्ये राज्यात ४.६४ लक्ष टन इतके मत्स्य उत्पादन नोंदवण्यात आली असून त्यामध्ये पालघर जिल्ह्याचा सहभाग फक्त ३१ हजार १८१ टन (६.७२ टक्के) इतका राहिला आहे. राज्यात मुंबई शहर, मुंबई उपनगर व रत्नागिरी जिल्हे हे मत्स्य उत्पादनात सातत्याने अग्रेसर राहिल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाकडून प्रकाशित आकडेवारीवरून दिसून आले आहे.

जिल्ह्यातील मच्छीमारांचे अर्थकरण प्रामुख्याने पापलेट (सरंगा) यांच्या उत्पादनावर अवलंबून आहे. सरंगा या माशाच्या संवर्धनाच्या दृष्टिकोनातून त्याला राज्य मासाच्या दर्जा देण्यात आला. लहान आकाराचे पापलेट पकडले जाऊ नये म्हणून शासनाने नियम बनवले असून त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. – विवेक नाईक, चेअरमन, मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था (सातपाटी)