पालघर: डहाणू चर्चगेट लोकलमध्ये बोईसर, पालघर व सफाळे येथून बसणाऱ्या महिलांना भाईंदर येथून चढणाऱ्या महिला दरवाजतच उभ्या राहून बोरिवली येथे उतरणाऱ्या महिलांकरिता अडचण निर्माण करतात. आज सकाळच्या लोकलमध्ये या महिलांनी शिवीगाळ, धक्काबुक्की व दांडक्याचा धाक दाखवल्यामुळे प्रवासी महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डहाणू येथून सकाळी ७.१० ला सुटणारी डहाणू चर्चगेट लोकल मध्ये बोईसर, पालघर, सफाळे येथून बोरिवली, अंधेरी येथे कामानिमित्त जाणाऱ्या महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. सकाळी सातच्या सत्रात ही एकमेव चर्चगेटला जाणारी गाडी आहे. ही गाडी विरार येथून जलद होत असल्याने पुढे वसई, भाईंदर, बोरिवली, अंधेरी, बांद्रा, दादर व चर्चगेट ला जाते. त्यामुळे या गाडीत वसईनंतर भाईंदर येथून चढणाऱ्या महिलांची गर्दी असते.
विरार येथून चर्चगेट ला जाण्याकरिता सतत लोकल सुरू असल्या तरीही जलद लोकलला प्रवासी पसंती देतात. मात्र भाईंदर येथून चढणारा महिलांचा गट अनेक वेळा चढल्यानंतर दरवाज्यातच उभे राहतात. यामुळे पालघर सफाळे येथून बोरिवलीला उतरणाऱ्या महिलांना अडचण निर्माण होते आणि आणि त्यामुळे त्यांना उतरणे कठीण होते. असाच प्रकार आज सकाळी भाईंदर येथून चढलेल्या महिलांनी दरवाज्यात गर्दी करून बोरिवलीला उतरणाऱ्या महिलांसोबत हुज्जत घातली.
या प्रकारादरम्यान भाईंदर स्थानकात गाडी थांबली असताना भाईंदरच्या महिलांनी हाताच्या कोपऱ्यांनी महिलांना पोटावर, छातीवर मारहाण व शिवीगाळ केला तसेच त्यांच्या हातात असलेल्या दांडक्याचा धाक त्यांनी सफाळ्याच्या महिलांना दाखवला. यावेळी स्थानकावर असलेल्या आरपीएफच्या अधिकाऱ्याने देखील या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. या महिलांनी बोरिवली येथे उतरून संबंधित भाईंदरच्या महिलांबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तसेच संबंधित प्रकार व असे अनेक गाड्यांमध्ये होणाऱ्या प्रकरण बाबत डहाणू वैतरणा प्रवासी संघटनेने खासदारांकडे तक्रार केली असून याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.
तातडीने हस्तक्षेप आवश्यक
आज घडलेल्या प्रकारासारखा प्रकार अनेक वेळा घडत असतो. आजच्या प्रकारात धक्काबुक्कीदरम्यान गाडी सुरू झाल्याने सफाळे येथील महिलेचा दरवाजातून तोल जात होता. मात्र वेळीच इतर महिलांनी सावरल्यामुळे दुर्घटना घडण्यापासून वाचली. असे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी महिला वर्गांकडून करण्यात येत आहे.
आक्रमक कृती
महिलावर्गांनी शिवीगाळ व धक्काबुक्कीसह लाकडी लाठी वादा दरम्यान दाखविल्यामुळे इतर प्रवासी महिलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एखाद्या छोट्याशा वादावरून मोठा अपघात घडण्याची शक्यता प्रवासादरम्यान होत असते.
आरपीएफ ची काठी महिलांच्या हाती
भाईंदर स्थानकात गाडी थांबली असताना भाईंदरच्या महिलांच्या हातात तेथे उभ्या असलेल्या आरपीएफ अधिकाऱ्याची काठी असल्याचे महिलांच्या लक्षात आले. तसेच आरपीएफ अधिकारी देखील यामध्ये हस्तक्षेप करताना दिसून आलेला नाही त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न उद्भवत आहे.
आजच्या प्रवासादरम्यान भाईंदर येथून चढलेल्या महिलांनी पालघर व सफाळे च्या महिलांसोबत धमकी व हिंसक वर्तन केले. असे वर्तन या गटाकडून अनेक वेळा यापूर्वी देखील झाले आहे. कोणतेही विपरीत प्रकार घडण्या अगोदर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
– आयुषा मोहिते, सफाळे, प्रवासी