पालघर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत अनेक त्रुटी आढळल्याने प्रमुख राजकीय पक्षांनी तसेच इतर नागरिकांनी त्याविषयी आक्षेप नोंदविले आहेत. देशात व राज्यात मतदार यादी मधील घोळ संदर्भात वेगवेगळी वक्तव्य होत असताना पालघर नगर परिषद हद्दीमधील मतदार यादीतील त्रुटींना जिल्हा प्रशासन तसेच बेसावध असणाऱ्या राजकीय पक्षांना तितकेच जबाबदार धरायला हवे.
पालघर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे दिसून आले आहे. अनेक मयत मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट असून एकाच प्रभागात मतदारांची दुबार नावे असणे, वेगवेगळ्या प्रभागांमध्ये एकच मतदाराचे नाव दोन किंवा तीन वेळा नाव प्रसिद्ध असणे, प्रभागात प्रत्यक्षपणे वास्तव्य करत नसणाऱ्या मतदाराचा मतदार यादी समाविष्ट असणे, प्रसिद्ध मतदार यादीमध्ये मतदाराचा पत्ता उल्लेखित नसणे, पालघर शहराबाहेरी गावांमध्ये रहिवासी पत्ता असणाऱ्या मतदारांची मतदार यादी समाविष्ट असते तसेच प्रत्यक्षात एका प्रभागात वास्तव्य करत असताना दुसऱ्या प्रभागाच्या मतदार यादीत नाव समाविष्ट असणे यासह इतर काही त्रुटी असल्याचे बहुतांश राजकीय पक्षांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. याच बरोबरीने प्रभागाच्या रचनेत समाविष्ट नसलेल्या भागातील मतदारांचा समावेश झाल्याच्या घटना अनेक प्रभागात दिसून आल्याने विविध राजकीय पक्ष व नागरिकांनी या बाबत आक्षेप नोंदविले आहेत.
मतदार यादी मध्ये दुबार नाव असणे, आपल्या शहराच्या हद्दीच्या पलीकडे असणाऱ्या ठिकाणांमधील पत्ते नमूद असणे, अथवा मतदारांसमोर मोघम पत्ते नमूद असणे किंवा कोणताही पत्ता नमूद नसणे याला मतदार नोंदणी करणारे अधिकारी जबाबदार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर पालघर जिल्ह्यात सुमारे एक लाख चार हजार मतदारांची वाढ झाली. प्रतिदिन सरासरी ३८० मतदार वाढले जात असताना शासकीय यंत्रणा अशी नोंदणी होताना त्याची पडताळणी कशाप्रकारे करत होती हे या मतदार वाढीच्यादरावरून स्पष्ट होते. विशेष म्हणजे नोंदविण्यासाठी विविध प्रमुख राजकीय पक्षांनी स्वतंत्र कक्ष उभारले होते. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेउन ही नोंदणी करण्यात आली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
विशेष म्हणजे मतदार यादी शुद्धीकरण प्रक्रियेत व नवीन मतदार नोंदणी प्रक्रियेत राजकीय पक्षांचे असणारे मतदान केंद्र स्तरीय प्रतिनिधी (बीएलए) यांची भूमिका देखील महत्त्वाची असते. मात्र अनेक राजकीय पक्षांकडे असे प्रतिनिधी निवडणुकीच्या प्रसंगी बूथवर बसण्यासाठी अथवा मतमोजणीसाठी हंगामी पद्धतीने नेमले जात असल्याने वॉर्ड क्षेत्रात लक्ष ठेवण्यासाठी, मतदार यादीच्या पडताळणी प्रसंगी देखरेख ठेवणे, सहकार्य करण्यासठी यंत्रणाच कार्यरत नाही. त्यामुळे काही राजकीय मंडळी आपल्याला हिताचे ठरावे अशा पद्धतीने फुगीर मतदार भरती करत असल्याचे तसेच त्रासदायक ठरू शकणाऱ्या मतदारांना इतरत्र हलवण्यासाठी अथवा त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. मतदार यादीत नाव समाविष्ट करणे अथवा वगळणे सध्या ऑनलाईन पद्धतीने करणे सहज शक्य असल्याने वेगवेगळ्या माध्यमातून मतदार यादीत अपेक्षित बदल घडवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित राहिली आहे. विशेष म्हणजे एखाद्या खाजगी संगणकाच्या आयपी ऍड्रेस वरूनच दररोज शेकड्यांनी अर्ज प्राप्त होत असल्यास त्याविषयी पडताळणी करणे शासकीय यंत्रणेला आवश्यक वाटले नाही यावरून संबंधित विभागातील सतर्कता व दक्षता किती आहे याबाबतच्या मर्यादा स्पष्टपणे दिसून आल्या आहेत.
शहराच्या निवडणुकीसाठी वॉर्ड निहाय मतदार यादी तयार करताना विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीचा आधार घेण्यात आला. मात्र मूळ मतदार यादीची प्रभाग फोड करताना प्रगणकाची लोकसंख्या ध्यानी ठेवण्यात आली. मात्र भौगोलिक सलगता राखण्यात आली आहे का? तसेच यादीमध्ये समाविष्ट होणारा भाग हा त्या प्रभागात आहे का? हे खातरजमा करण्यास यंत्रणेला अपयश आले. त्यामुळे एकाच कुटुंबातील अथवा एकाच लोकवस्तीमधील मतदार हे वेगवेगळ्या प्रभागाच्या यादीत समाविष्ट झाल्याचे दिसून आले. प्रभाग रचनेच्या या त्रुटींविषयी अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. याविषयी निर्णय घेताना जिल्हा प्रशासनाची तारेवरची कसरत राहणार आहे.
विशेष म्हणजे आपले नाव एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात स्थलांतरित करण्यासाठी करण्यात आलेल्या अर्जांमध्ये देखील गैरप्रकार झाल्याचे आरोप होऊ लागले आहेत. बनावट विद्युत बिल, खोट्या स्वाक्षऱ्या तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे निवासाचे पुरावे दिल्याचे आरोप करण्यात आले आहेत. अशा फर्जी कागदपत्रांच्या आधारे प्रभाग बदल अमलात आले तर आणखी मोठ्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पालघर शहराबाहेर निवास करणाऱ्या किंवा मतदार यादीत मतदारांच्या अशा प्रकारचे पत्ते दर्शवणाऱ्या मतदारांना मतदार यादीतून वगळणे सद्यस्थितीत कायदेशीर दृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे अशा मतदाराने मतदानाचा हक्क बजावला अतितटीच्या लढतीमध्ये निवडणुकीच्या निर्णयावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पालघरच्या ३० सदस्यांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक प्रभागात अनेक इच्छुक असल्याने बहुरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे. अशावेळी ५० ते १०० मतांचा फरक महत्त्वपूर्ण ठरणार असून निवडणूक निर्णय अधिकारी यांची आगामी काळात कसोटी लागणार आहे असे एकंदरीत पालघरच्या चित्रावरून दिसून येते. पालघरसह डहाणू, जव्हार नगरपालिका व इतर नगरपंचायतीमध्ये देखील मतदार यादीमध्ये काही प्रमाणात त्रुटी असल्याचे आक्षेप पुढे आले आहेत. जिल्हा प्रशासनाने या मतदार यादी सुसूत्र काढण्यासाठी विशेष लक्ष देऊन ३१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणारी अंतिम यादी परिपूर्ण राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे.
