वाडा : मनोर- वाडा व विक्रमगड – मनोर हे दोन्ही महामार्ग अवजड वाहतुकीमुळे अत्यंत खराब झाले आहेत. शिवाय पुलांना देखील मोठा धोका निर्माण झाल्याने हे मार्ग वाहन चालकांसाठी धोकादायक बनले आहेत.
याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने लक्ष वेधत दोन्ही महामार्गांवर अवजड वाहतुकीसाठी प्रतिबंधित करण्यासाठी पालघर अप्पर जिल्हादंडाधिकारी सुभाष भागडे यांनी अधिसूचनेद्वारे आदेश काढले आहेत.
“मनोर – वाडा” रस्त्यावर देहर्जे नदी (करळगाव) व पिंजाळ नदीवरील पुलाचा पृष्ठभाग खड्डा पडल्याने खराब झाला होता. त्यामुळे मागील मधल्या काळात (मागील वर्षी) त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. यानंतर मुंबई गुणदक्षता नियंत्रक अभियंता यांच्याकडून पुलाचे “स्ट्रक्चर ऑडिट” करण्यात येवून अहवालात पुलाच्या दोन्ही बाजूस वेगमर्यादा, भारवहन क्षमता निश्चितीबाबत फलक लावण्यात आले होते.
परंतु त्यानंतर सुद्धा दोन्ही पुलावरून ३४ मे. टन पेक्षा अधिक ७० ते ८० मे. टन असलेल्या अतिभार वाहनांची वाहतूक सुरू राहिली आहे.
वाडा औद्योगिक क्षेत्रास जोडणारा मनोर – वाडा हा एकमवे रस्ता असुन पुलावरून अवजड वाहतूक सुरू राहिल्यास पुलाच्या बांधकामास धोका निर्माण होऊ शकतो. पालघर पोलीस अधीक्षकांच्या अहवालानुसार या दोन्ही महामार्गावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करून अन्य मार्गाने वळविण्याचे आदेश नुकताच प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत.
वाहतुकीत बदल –
“मनोर – वाडा- भिवंडी” मार्गे जेएनपीटीकडे तर “भिवंडी वाडा- मनोर” मार्गे गुजरात दिशेकडे येणारी – जाणारी अवजड वाहतूक ही आता “मनोर – घोडबंदर- ठाणे” या महामार्गावरून ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंत सुरू राहील असे आदेशात म्हटले आहे.
विक्रमगड – मनोर महामार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद
विक्रमगड तालुक्यातील दगड खदाणींमधून मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून खडी, डबर भरलेल्या अती अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने या रस्त्यांची अधिकच दुरावस्था झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून विक्रमगड तालुक्यातील खदाणींमधून गौणखनिजांची अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विक्रमगड – मनोर या महामार्गावरून वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
विक्रमगड तालुक्यात सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे विक्रमगड –मनोर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सदर खड्डे पावसामुळे डांबराने भरता येत नाही त्यामुळे हे खड्डे खड़ीने भरण्याचे काम प्रगतीवर आहे.
परंतू भोपोली भागात असलेल्या खदानीमधुन निघालेल्या गौण खनिजाच्या अवजड वाहतुकीमुळे व वारंवार दिर्घकाळ होत असलेला पाऊस यामुळे सदर खडीने खड्डे भरताना जिकरीचे जात आहे व ते दिर्घकाळ टिकत नाही. त्यामुळे विक्रमगड – मनोर मार्गावरील भोपोली व बांगरचोळ भागातील खदानीची अवजड वाहतुक त्वरीत बंद करुन ती पर्यायी मार्ग भोपोली कोंडगाव-विलशेत-सोमटे मनोर) वा अन्य इतर पर्यायी मार्गाने वळवून वाळविण्याच्या सूचना अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या असून हा मार्ग आगामी येणारा दिवाळीचा सणाचा विचार करून ३१ ऑक्टोबर पर्यंत खंदाणींमधून निघणाऱ्या अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे.
दररोज खदानणींमधून निघणाऱ्या अवजड वाहनांची संख्या मोठी असल्याने तसेच रस्ता खराब झाल्याने रस्त्यांवर होणार्या वाहतूक कोंडीचा नागरिकांना मनस्ताप देखील सहन करावा लागत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये रोषाची भावना होती. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने जिल्हा प्रशासनाने अवजड वाहतुकीस मनाईची अधिसूचना काढली आहे. शासनाच्या या निर्णयाने या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनी सुटकेचा सोडला आहे.