मुख्यालयाकडे येणाऱ्या  रस्त्याची  दयनीय अवस्था

पालघर : जिल्ह्यातील अन्य भागांतून मुख्यालयाकडे येण्यासाठी असणारा मनोर-पालघर रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून रूपांतरित झाल्याने या रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी  महामार्ग प्राधिकरणाकडे सोपवण्यात आली आहे.  प्राधिकरणाचे पालघर जिल्ह्यात कार्यालय नसल्यामुळे  मुख्यालयाकडे येणारा हा रस्ता दुर्लक्षित राहिला आहे. रस्त्याची अनेक ठिकाणी दयनीय अवस्था झाली आहे.  सन २०१६ मध्ये पालघर- जव्हार- त्र्यंबकेश्वर- घोटी- सिन्नर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग १६०अ म्हणून घोषित करण्यात आला. सन २०१७-१८ मध्ये या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने डागडुजी केल्यानंतर हा रस्ता २०१८ च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे  (एनएचएआय)  सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर या रस्त्यांवर काही ठिकाणी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते.

यंदाच्या वर्षी पाऊस लांबल्याने पालघर ते मनोर या रस्त्यावरील अनेक ठिकाणी डांबरीकरणाचा थर निघून गेला व खड्डे पडले आहेत. त्याचबरोबरीने रस्त्याच्या बाजूला असणारा साइडपट्टी भराव वाहून गेला असून रस्त्याच्या बाजूला सहा इंच ते एक फुटापर्यंतचे अंतर निर्माण झाले आहे. परिणामी  काही ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र निर्माण झाले आहे. या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी पूर्वी संपर्क साधला असता लांबलेल्या पावसाळय़ामुळे दुरुस्तीचे काम विलंबाने सुरू झाले असल्याचे सांगण्यात आले होते. या मार्गावरून प्रमुख सनदी अधिकारी दररोज प्रवास करीत असताना  रस्त्याची दुरवस्था कायम राहिली आहे. या संदर्भात एनएचएआय प्राधिकरणाकडे पुन्हा चौकशी केली असता रस्त्यावरील झालेल्या कामाचा दोषदायित्व कालावधी शिल्लक असल्यामुळे ठेकेदाराने स्वत:हून रस्त्याची डागडुजी करणे अपेक्षित आहे. या संदर्भात संबंधित ठेकेदाराला यापूर्वी लेखी कळवण्यात आले असून पुन्हा या पट्टय़ातील दुरुस्तीसंदर्भात पाठपुरावा केला जाईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ठाणे कार्यालयातून सांगण्यात आले.

पालघर जिल्ह्यात कार्यालय नाही

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पालघर- त्र्यंबकेश्वर- घोटी तसेच मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचा मोठा भाग येतो. स्थानिकांना भेडसावणाऱ्या तक्रारी नोंदवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पालघर जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय नाही. या प्राधिकरणाचे अधिकारी या भागात येत असल्याची माहिती स्थानिकांना मिळत नसल्यामुळे ठेकेदार मोकाट आहेत.

पालघर रेल्वे उड्डाणपुलालगतचा रस्ता धोकादायक

पालघर शहरात पूर्वेकडे जाण्यासाठी असणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलावर एका बाजूला मातीचा ढीग गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून ठेवण्यात आला असून त्यामुळे मनोरहून पालघरकडे येणाऱ्या वाहनांना विरुद्ध दिशेच्या मालिकेवरून काही प्रमाणात प्रवास करावा लागतो. हा ढीग उचलण्यासाठी अनेकदा तक्रारी करण्यात आल्या असून सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता आपल्या ताब्यात नसल्याचे सांगून जबाबदारी झटकली आहे. या ठिकाणी अनेकदा लहान-मोठे अपघात झाले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याकडे लक्ष द्याावे, अशी मागणी करण्यात येत आहे.