पालघर : पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद पालघर अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या “निपुण पालघर – गुणवत्ता विकास अभियान” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा १५ जुलै रोजी पालघर मधील जिल्हा परिषद शाळा वेवूर येथे शुभारंभ झाला.

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्ये दृढ करण्याकरिता शिक्षण विभागाकडून निपुण अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर, गटविकास अधिकारी बापूराव नाळे, डाएटचे प्राचार्य संभाजी भोजने, जिल्हा समन्वयक डाएट तानाजी डावरे, गटशिक्षणाधिकारी माधवी तांडेल, शाळेचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते ‘विनोबा ॲप’चे उद्घाटन करण्यात आले. हे ॲप ‘निपुण पालघर’ अभियानाच्या यशस्वितेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतांची ओएमआर शीटच्या माध्यमातून पडताळणी करण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया ‘विनोबा ॲप’द्वारे ऑनलाइन नोंदवली जात आहे, ज्यामुळे गुणवत्तेचे विश्लेषण शाळा, केंद्र आणि तालुका पातळीवर करणे शक्य होणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी स्वतः दुसऱ्या इयत्तेच्या एका विद्यार्थिनीच्या मूल्यांकन प्रक्रियेचे निरीक्षण केले. त्यांनी शिक्षकांना १०० टक्के गुणवत्तेच्या दिशेने विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

वेवूर शाळा “निपुण पालघर” उपक्रमात कायम वरच्या क्रमांकावर राहील. विद्यार्थ्यांमध्ये केवळ वाचनच नव्हे, तर अर्थ समजणे, वाक्यरचना करणे, विचारशक्ती वाढवणे आणि जीवनोपयोगी कौशल्यांचा विकास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच, शिक्षकांनी विद्यार्थ्यांची तयारी नियोजनबद्ध आणि गंभीरपणे करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘निपुण पालघर’ची खरी फलश्रुती

आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थी हा आदर्श, सुसंस्कृत आणि सक्षम नागरिक व्हावा, हीच ‘निपुण पालघर’ची खरी फलश्रुती असल्याचे शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर यांनी सांगितले. ‘निपुण पालघर’ अभियानामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात महत्त्वपूर्ण बदल घडून येतील अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे त्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल असा आशावाद व्यक्त केला.