पालघर शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी आता थेट प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि रस्त्यांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधण्यासाठी हुतात्मा चौकात एकत्र येऊन नागरिकांनी निषेध नोंदवला. या आंदोलनातून पालघरकरांनी आपल्या कररूपी पैशातून होणारा भ्रष्टाचार आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा यावर तीव्र शब्दांत टीका केली.

‘मी जबाबदार पालघरकर’ या मोहिमेअंतर्गत शहरातील सामाजिक कार्यकर्ते निशांत धोत्रे आणि हिमांशू राऊत यांच्या नेतृत्वाखाली १४ सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. पालघर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना गंभीर दुखापती होत आहेत, तर वाहतूक कोंडी ही एक नित्याची समस्या बनली आहे. जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यावर कोणतीही ठोस कार्यवाही करत नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.

या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी नागरिकांनी खड्डेमय रस्त्यांवरच पथनाट्य सादर केले. या पथनाट्यातून त्यांनी खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि त्रासदायक प्रवास यांची व्यथा मांडली. तसेच ‘खड्डेमुक्त पालघर’च्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली, ज्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

उपरोधिक टीकेतून प्रशासनावर निशाणा

या आंदोलनादरम्यान नागरिकांनी हातात विविध बॅनर घेऊन प्रशासनावर उपरोधिक टीका केली. ‘पालघरचे रस्ते म्हणजे खड्डादर्शन यात्रा’, ‘कर भरतोय आम्ही, खड्डे का भरत नाही तुम्ही?’, ‘रस्त्यांच्या खड्ड्यात आमचे कर बुडाले’, ‘ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले, खड्ड्यांपासून केव्हा मिळणार?’ अशा घोषणांनी हुतात्मा चौक दुमदुमून गेला होता. नागरिकांच्या या तीव्र प्रतिक्रियांमधून प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दलचा राग स्पष्टपणे दिसून आला.

सोशल मीडियावरील टीकेची धार

या आंदोलनापूर्वीच सोशल मीडियावरही खड्ड्यांवरून प्रशासनाला लक्ष्य करण्यात आले होते. पालघरचा रहिवासी आणि रील स्टार सिद्धांत घरत याने काही दिवसांपूर्वी शहरातील कचेरी रोड, रिलायन्स मार्केट, टेंभोडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पालघर-बोईसर रस्त्यावरील खड्ड्यांवर एक व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि पालघरकरांच्या व्हॉट्सॲप आणि फेसबुक स्टेटसवर तो झळकत होता. या व्हिडिओला मिळालेल्या प्रतिक्रिया प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे दर्शन घडवत होत्या.

एकजुटीचे आवाहन

हे अभियान केवळ एका दिवसाचे नसून, यापुढेही पालघरच्या हितासाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने काम करण्याचे वचन आंदोलकांनी दिले आहे. समाज माध्यमांवरून सुरू झालेला हा लढा आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरला असून पालघरकरांनी आपल्या शहराच्या समस्यांवर आवाज उठवण्याचे एक मजबूत पाऊल उचलले आहे. प्रशासनाने यावर तातडीने दखल घेऊन शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.