scorecardresearch

महामार्गावर केवळ सूचना देणारे फलक ; सुविधांची मात्र वानवा

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष, वाहनचालकांसह प्रवाशांचा जीव धोक्यात

महामार्गावर केवळ सूचना देणारे फलक ; सुविधांची मात्र वानवा

कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ वरून सर्वाधिक वाहतूक होत असल्याने हा महामार्ग सहापदरी करण्यात आला आहे. महामार्गावर अपघात रोखण्यासाठी तो झाल्यानंतर त्यावर उपाययोजनेसाठी विविध सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु सुविधांची मात्र वानवा आहे. त्यामुळे अपघात घडल्यानंतर वेळीच उपाययोजना न मिळल्याने अनेक वाहनचालकांसह प्रवाशांना जीव गमावण्याची वेळ येत आहे.

सहापदरी महामार्ग झाल्याने मुंबई ते अहमदाबाद कमी वेळेत व जलद वाहतूक येथून होत असते. गेल्या वर्षभरात महामार्गावरील चारोटी ते अच्छाडपर्यंत महामार्गावर अनेक छोटेमोठे अपघात घडले आहेत. मनोर ते तलासरी आच्छाड दरम्यान महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण अधिक वाढले आहे. महामार्गावर नोव्हेंबर २०२१ ते जून २०२२ पर्यंत छोटे मोठे असे सुमारे ३४१ अपघात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अपघातात अनेकांना वेळेत उपचार न मिळाल्याने आपले जीव गमवावे लागले असून काहींना कायमचे अपंगत्व स्वीकारावे लागले आहे. महामार्गावरील अपघाताचे वाढते प्रमाण पाहता महामार्गावर मर्यादित अंतरावर सुसज्ज रुग्णालय उभारण्यात यावे, अशी जनतेची असलेली मागणी अजूनही पूर्ण झालेली नसताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी किती सुस्त आहेत याचे प्रमाणच महामार्गावर करोडो रुपये खर्च करून लावण्यात आलेल्या फलकांवरून आले आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामार्गाची देखभाल पाहणाऱ्या कंपनीकडे विचारणा करूनही कुठलीच माहिती उपलब्ध होत नसल्याने याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होत आहे. महामार्गावर सुसज्ज रुग्णालय आणि आपत्कालीन संपर्क यंत्रणा कार्यान्वित झाल्यास अपघातग्रस्तांना वेळेवर मदत आणि उपचार मिळाल्यास अनेकांचा जीव वाचू शकतो. या सुविधा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येत असून आपत्कालीन तांत्रिक सुविधा सुरू करण्याची मागणी होत आहे.

‘संपर्क क्रमांक अस्तित्वात नाही’
दिशादर्शक फलक असोत किंवा पोलीस नियंत्रण कक्ष, आपत्कालीन संपर्क फलकांवर असलेले नंबर बंद असल्याने अपघातावेळी तसेच आपत्कालीन परिस्थितीत अपघातग्रस्तांना व वाहतूकदारांना मदतीसाठी संपर्क करणे कठीण झाले आहे. महामार्गावर आपत्कालीन संपर्क फलकांवर ‘जीवन बचाओ, दुर्घटना कि स्थिती में डायल करे’ असे फलक काही मीटरच्या अंतरावर झळकत असले तरी त्यावरील संपर्क क्रमांक लावल्यावर हा नंबर अस्तित्वात नसल्याचे सांगितले जात आहे. शिवाय महामार्गावर मर्यादित अंतरावर पिवळय़ा रंगाचे दूरध्वनी बॉक्स लावण्यात आले आहेत. परंतु ही आपत्कालीन दूरध्वनी सुविधा अजूनही कार्यान्वित झालेली नाही.

मराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या