डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील विवळवेढे उड्डाणपुलावर रविवार ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास प्रवासी आराम बस आणि एका अज्ञात ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील ८ प्रवासी जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका लक्झरी बसने समोरून जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाला धडक दिली. समोरील वाहनाने अचानक वेग कमी केल्यामुळे अनावधानाने अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. ही धडक इतकी जोरदार होती की अपघातानंतर लगेचच प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग मदत केंद्र चारोटी पोलीस अधिकारी अमोल जाधव, उपनिरीक्षक बसवत आणि इतर पाच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. महामार्ग प्रशासनाची सुरक्षा टीम आणि क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त बस रस्त्याच्या बाजूला करण्यात आली असून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. बसमधील इतर प्रवाशांसाठी बस मालकाने पर्यायी व्यवस्था केली असून, पुढील बस लवकरच पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी कासा पोलीस पुढील कारवाई करत आहेत